२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 23:49 IST2025-11-14T23:48:26+5:302025-11-14T23:49:28+5:30
संघासोबतच अभाविपचाही मोठा सहभाग : नवमतदारांसह २२ लाख तरुण मतदारांवर केले होते लक्ष केंद्रीत

२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा व रालोआला घवघवीत यश मिळाले असून, महिला रोजगार योजनेला त्याचे श्रेय दिले जात आहे. मात्र, तळागाळातील मतदारांसोबतच नवमतदारांना मतदान केंद्रांपर्यंत खेचून आणण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी भूमिका राहिली. संघाच्या ‘शत - प्रतिशत’ मतदानाच्या मोहिमेसोबतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचाही यावेळी सक्रिय सहभाग दिसून आला. निवडणुकीच्या दृष्टीने मागील काही महिन्यांपासून तेथे या संघटनांनी नवमतदारांसह २२ लाख तरुण मतदारांवर लक्ष केंद्रीत केले होते.
सन २०१५च्या निवडणुकीत भाजपला कमी मते मिळण्याचे खापर अनेकांनी संघावरच फोडले होते. मात्र, १० वर्षांतच भाजपच्या जागांचा ग्राफ प्रचंड वेगाने वर गेल्याचे वास्तव आहे.
सन २०१५मध्येबिहार निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्याचा विरोधकांनी मुद्दा केला होता. त्या निवडणुकीत संघाचे स्वयंसेवक मतदान मोहिमेतही सक्रिय नव्हते. त्याचा फटका भाजपला बसला व एका वर्षाअगोदर देशात सत्तेवर येऊनही भाजपच्या ३८ जागांचे नुकसान सहन करत ५३ जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र, २०२० व २०२५ या दोन्ही निवडणुकीत संघ परिवारातील संघटना सक्रिय राहिल्या. त्याचा फायदा पक्षाला झाल्याचे दिसून आले.
कुठे कॅम्पस ॲम्बेसेडर, तर कुठे यूथ क्लब
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निवडणूक घोषित होण्याअगोदरच तयारीला सुरुवात करण्यात आली होती. २४३ जागांवर परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हजारो बैठका घेतल्या. त्याचप्रमाणे कॅम्पस ॲम्बेसेडर, यूथ क्लब इत्यादींच्या माध्यमातून नवमतदारांशी संपर्क साधण्यावर भर देण्यात आला. अगदी क्रीडा स्पर्धा, रथयात्रा, निबंध स्पर्धांच्या माध्यमातूनही तरुणाईशी संपर्क करण्यात आला.
संघाच्या मतदानवाढीच्या आवाहनाला प्रतिसाद
संघाकडून सर्वच मतदारसंघांत मतदानवाढीसाठी गृहसंपर्क मोहीम चालविण्यात आली होती. विरोधकांनी त्याला त्रिशूल मोहीम असेदेखील नाव दिले होते. यादरम्यान स्वयंसेवकांनी घरोघरी जात मतदारांशी संपर्क साधला होता व त्यांना भाजपचे नाव न घेता राष्ट्रीय विचारांच्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. कुणालाही मतदान करा, मात्र मतदान करायला घराबाहेर निघा, असे प्रत्येक घरी स्वयंसेवक सांगत होते. २०१९मध्ये ५७.०७ टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदा तो टक्का ६६.९१ टक्क्यांवर पोहोचला. भाजपचे लोकदेखील याचे श्रेय पटना येथील संघाच्या विजय निकेतन या कार्यालयात झालेल्या मतदान वाढीच्या नियोजन बैठकांना देत आहेत.