18 years Same age for marriage is incorrect | लग्नासाठी १८ वर्षे समान वयाची अट अयोग्यच
लग्नासाठी १८ वर्षे समान वयाची अट अयोग्यच

ठळक मुद्देचर्चासत्रातून उमटला सूर : भारतीय स्त्री शक्तीचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नासाठी वय महत्त्वाचे नसून सक्षमता महत्त्वाची आहे. ही मानसिक, शारीरिक सक्षमता येण्यासाठी १८ वर्षे ही समान वयाची अट संयुक्तिक नाही. त्याऐवजी २१ वर्षे केलेली एकदा मान्य करण्यासारखी राहील, असा सूर भारतीय स्त्री शक्तीच्या नागपूर शाखेच्या व्यासपीठावरून व्यक्त झाला.
लग्नाकरिता मुलामुलीचे वय सारखेच असावे, यासाठी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर महिला बाल विकास मंत्रालयाच्या वतीने स्टेक होल्डर्सकडून मते मागविली आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय स्त्री शक्ती नागपूर शाखेच्या वतीने मंगळवारी सायंकाळी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू धर्म संस्कृतीच्या कार्यालयात पार पडलेल्या या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी भारतीय स्त्री शक्तीच्या संघटनमंत्री डॉ. मनीषा कोठेकर होत्या. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर, लिंगशास्त्रतज्ज्ञ डॉ. संजय देशपांडे आणि कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. रेणुका शिरपूरकर यांनी मते व्यक्त केली.
डॉ. संजय देशपांडे म्हणाले, १८ पेक्षा २१ वर्षाचे वय सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. दोघांनीही अर्थार्जन करावे, ही काळाची गरज आहे. त्यामुळे जबाबदार सामाजिक आणि वैवाहिक वर्तनासाठी काळजी घ्यायला हवी. मुले १८ वर्षांची होतपर्यंत वडिलांच्या पॉकेटमनीवर अवलंबून असतात. या वयात मुलांची लगे्न झाली तर न कमावणाऱ्या मुलांचा भार पालकांवरच पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दोघांचेही वय २१ पर्यंत मर्यादित केलेले अधिक उत्तम ठरू शकेल.
डॉ. शेंबेकर म्हणाले, मुलींच्या मोनोपॉजचे वय ठरलेले असते. पुरुषांत मात्र अ‍ॅट्रोपॉजचे वय निश्चित नाही. अलीकडे ताणतणाव, बदललेली जीवनशैली, आहार यामुळे पुरुषांमध्ये अ‍ॅट्रोपॉजचे वय ४५ ते ५० व्या वर्षातच जाणवायला लागले आहे. अलीकडे मुली ९ ते ११ व्या वर्षी तर मुले १३ व्या वर्षात वयात येतात. हा पौगंडावस्थेचा काळ प्रजननासाठी अयोग्य वयाचा असतो. पुरुषाच्या शरीरापेक्षा स्त्रीचे प्रजनन अंग गुंतागुंतीचे असते. शारीरिक सक्षमतेसाठी १८ ते २१ पर्यंतचे वय मुलींच्या दृष्ष्टीने योग्य आहे. अलीकडे उशिरा लग्न-उशिरा मुलं अशी प्रवृत्ती समाजात मूळ धरत आहे. सामाजिकदृष्ट्या त्याचे दूरगामी परिणाम चांगले नसल्याने २१ व्या वर्षीच लग्न होणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
अ‍ॅड. शिरपूरकर म्हणाल्या, कायद्याचा उद्देश मानवी जीवन डोळ्यापुढे ठेवून केलेला आहे. बालविवाह प्रथा हा सामाजिक गुन्हा आहे. अलिकडे फार कमी प्रमाणात असे विवाह होतात. लग्नासाठी समानतेच्या नावाखाली १८ वर्षाचे वय करणे चुकीचे आहे. या वयातील लग्नानंतर संबंधविच्छेद झाले तर देशात मोठ्या प्रमाणावर सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतील. १८ वर्षांचा मुलगा पोटगीसाठी सक्षम असेल का, याचाही विचार व्हावा. लैंगिक शिक्षणामुळे निर्माण होणाऱ्या उत्सुकतेमधून विवाहबाह्य संबंधातून जन्मास आलेली मुले व त्यासाठी न्यायालयात चालणारे खटले हा सुद्धा उद्या सामाजिकदृष्ट्या चिंतेचा विषय ठरू शकतो. पालकांच्या दृष्टीनेही विचार करता दोघांचेही वय २१ असले तर सामजिकदृष्ट्या नाकारण्यासारखे राहणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. मनिषा कोठेकर यांनी विविध दाखले देत प्रारंभी या विषयाची मांडणी केली. भारत, पाश्चात्त्य राष्ट्रातील सामाजिक व्यवस्था त्यांनी सांगितली. चर्चासत्रानंतर प्रश्नोत्तरे झाली. कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: 18 years Same age for marriage is incorrect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.