पैसे कमावण्यासाठी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी पळाली थेट नेपाळमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 11:14 IST2025-05-13T11:13:03+5:302025-05-13T11:14:45+5:30
कळमना पोलिस ठाण्याच्या पथकाने घेतला शोध : शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर मिळाली 'लिंक'

15-year-old minor girl runs away to Nepal to earn money
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरातील आर्थिक स्थिती ठीक नसल्याने कंटाळून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने घर सोडले व पैसे कमविण्यासाठी थेट नेपाळमध्ये पोहोचली.
पोलिसांनी मध्य प्रदेश, बिहार या राज्यांतील शेकडो सीसीटीव्ही फुटेजेस तपासल्यानंतर नेपाळमध्ये जाऊन तिचा शोध लावला व तिला पालकांच्या हवाली केले. कळमना पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
संबंधित १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही शिक्षण घेत आहे. तिच्या घरची स्थिती हलाखीचीच आहे. इतर मैत्रिणींना पाहून तिलादेखील आपल्याकडे पैसे असावेत, असे वाटत होते. नेपाळमध्ये कमी वेळात जास्त पैसे मिळू शकतात, अशी तिला माहिती मिळाली. त्यावरून तिने २ मे रोजी घर सोडले. घरातून निघताना तिने ट्युशनला जाते, असे सांगितले होते. बराच वेळ झाला तरी ती न आल्याने घरच्यांनी अखेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी विविध परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता ती रेल्वेस्थानकावर गेल्याचे कळाले. तेथून ती रेल्वेने तिरोडी, मध्य प्रदेशात पोहोचल्याची बाब स्पष्ट झाली. पोलिसांचे पथक तिरोडीला गेले व तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेथून ती मुलगी बिहारमधील पटना रेल्वेस्थानकावर गेली आणि बसने नेपाळ सीमेवरील बिट्टामोर येथे गेल्याची बाब सीसीटीव्हीतून समोर आली. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. तेथेदेखील पोलिसांनी सीसीटीव्हीतून शोध घेतला. तसेच परिसरात तिचा फोटो दाखवून विचारणा केली. ती मुलगी सीताबढी बसने गेल्याचे कळाले. पोलिसांनी त्या हिशेबाने शोध सुरू केला व ती नेपाळमधील जनकपूर येथील रहिवासी महिला देवी विनोद पाठककडे असल्याची माहिती मिळाली. पोलिस तेथे गेले असता ती मुलगी महिलेकडेच होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन समुपदेशन केले. मुलीला जनकपूरमधून नागपुरात आणून तिच्या पालकांच्या हवाली करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण काळे, दत्ता घुगल, संजय राठोड, उमरबेग मिर्झा यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वडिलांची नोकरी गेल्याने उचलले पाऊल
पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने वडिलांची नोकरी गेल्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले. घरची आर्थिक स्थिती खराब झाली होती व पैसे कमविण्यासाठीच नेपाळला गेल्याचे तिने सांगितले. ती सीतामढी बसमध्ये बसली असता देवी पाठक या महिलेला ती दिसली. ती एकटी असल्याने तिची विचारपूस केली असता ती घरातून निघून आल्याची बाब समोर आली. ती भटकू नये किंवा तिचा कुणी गैरफायदा घेऊ नये, यासाठी पाठक या महिलेने तिला सोबत घरी नेले. महिलेने तिच्या घरी संपर्क करण्याअगोदरच पोलिसांनी तिचा शोध घेतला.