घरच्यांनी रागावले म्हणून १५ वर्षांच्या मुलाने सोडले घर; मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातून गाठले सरळ नागपूर
By नरेश डोंगरे | Updated: December 29, 2025 19:27 IST2025-12-29T19:25:56+5:302025-12-29T19:27:12+5:30
अस्वस्थ बालकाला आरपीएफ जवानाने हेरले : सुखरूप घरवापसी

15-year-old boy leaves home after family members get angry; reaches Nagpur straight from Chhindwara district of Madhya Pradesh
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरच्यांनी रागावले म्हणून एका अल्पवयीन मुलाने घर आणि गावच नव्हे तर प्रांतही सोडला. तो थेट नागपुरात पोहचला. मात्र, रात्रीच्या वेळी त्याची रेल्वे स्थानकावरच्या फलाटावरची अस्वस्थता रेल्वे सुरक्षा दलाने हेरली. त्याला विश्वासात घेतले आणि नंतर स्थानिक नातेवाईकांच्या हवाली केले.
सुमंत (नाव काल्पनिक, वय १५) हा छिंदवाडा (मध्य प्रदेश) जिल्ह्यातील रहिवासी आहे. पालकांनी त्याला कुठल्याशा कारणावरून रागावले म्हणून त्याने घरून निघून जाण्याचा निर्णय घेतला. तो गावातून छिंदवाडा रेल्वे स्थानकावर आला आणि नागपूरला येणाऱ्या एका गाडीत बसला. गाडी नागपूर स्थानकावर पोहचली.
रात्री १० च्या सुमारास येथील फलाट क्रमांक एक वर तो ईकडे तिकडे फिरू लागला. त्याची ती अवस्था रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) आरक्षक विनोद कहार यांनी हेरली. तो अल्पवयीन आणि एकटाच असल्याचे लक्षात आल्याने विनोदने सुमंतला विचारपूस सुरू केली. तो रागाच्या भरात घरून पळून आल्याचे लक्षात आल्याने त्याला पुढील चौकशीसाठी आरपीएफ पोलिस ठाण्यात नेण्यात आले. येथे एएसआय अहिरवार आणि चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी विक्की डहारे यांनी या मुलाची चाैकशी केली. तो छिंदवाडा जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांशी संपर्क केला. नंतर त्याला पाटणकर चाैकातील शासकीय बाल सुधार गृहात रवाना करण्याचे ठरले.
अखेर नातेवाईक पोहचले
बालसुधार गृहात पाठविण्याची कागदोपत्री तयारी झाल्यानंतर सुमंतचे नातेवाईक मानेवाडा भागात राहत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करून त्याच्या मामेभावाला बोलवून घेण्यात आले. शहानिशा केल्यानंतर सुमंतला किशोर यांच्या हवाली करण्यात आले.