१२५ वर्षे जुना वाद तडजोडीने काढला निकाली; नागपुरातील मेहंदीबाग व चिमठानावाला गटामध्ये आपसी सहमती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:14 IST2025-11-13T15:11:26+5:302025-11-13T15:14:27+5:30
Nagpur : शहरातील मेहंदीबाग व चिमठानावाला गटामध्ये संपत्ती वाटपासह विविध मुद्यांसंदर्भात गेल्या १२५ वर्षापासून सुरू असलेला वाद अखेर आपसी सहमती आणि तडजोडीमुळे निकाली निघाला.

125-year-old dispute resolved through compromise; mutual agreement reached between Mehndibaug and Chimthanawala groups in Nagpur
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील मेहंदीबाग व चिमठानावाला गटामध्ये संपत्ती वाटपासह विविध मुद्यांसंदर्भात गेल्या १२५ वर्षापासून सुरू असलेला वाद अखेर आपसी सहमती आणि तडजोडीमुळे निकाली निघाला. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केवळ दोन सुनावणीत दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणला.
१८४० मध्ये दाऊदी बोहरा जमातचे ४६ वे दाई सैयदना बदरुद्दीन यांचे निधन झाल्यानंतर नवीन उत्तराधिकारीविषयी मतभेद निर्माण झाले होते. काही सदस्य नजमुद्दीन यांना ४७ वे दाई म्हणून मान्यता देण्यास तयार नव्हते. त्यामुळे १८९१ मध्ये मौलाना मलक व त्यांच्या अनुयायांनी नागपूर येथे मेहंदीबाग संस्था स्थापन केली.
१८९९ मध्ये मौलाना मलक यांच्या निधनानंतर मेहंदीबाग आणि चिमठानावाला, असे दोन गट तयार झाले. मेहंदीबाग गटाने मौलाना बदरुद्दीन गुलाम हुसेन मलक यांना तर, चिमठानावाला गटाने मौलाना अब्दुल कादर चिमठानावाला यांना धार्मिक प्रमुख मानले. पुढे या दोन गटांमध्ये चार हजार कोटी रुपये मूल्याच्या संपत्ती विभाजनावरून वाद वाढत गेला.
दोन्ही गटांनी परस्परांवर अनेक प्रकारचे गंभीर आरोप केले. हा वाद उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातही गेला. परंतु, सर्वमान्य निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, मेहंदीबाग संस्थेच्या ७३ सदस्यांनी चिमठानावाला गटाविरुद्ध महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार दाखल केली असता अध्यक्ष प्यारे खान यांनी दोन्ही गटांना आपसी सहमतीने वाद संपविण्याची सूचना केली. त्यानुसार २१ जानेवारी २०२५ रोजी दोन्ही गटाने तडजोडीचा करार तयार केला. त्या आधारावर आयोगाने ११ नोव्हेंबर रोजी अंतिम आदेश जारी करून वाद निकाली काढला.
असा आहे तडजोडीचा करार
विशेष दिवाणी दाव्यातील संपत्ती मेहंदीबाग वक्फची घोषित करण्यात आली. त्याचे व्यवस्थापन मौलाना आमिरुद्दीन मलक करतील.
मौलाना अब्देअली चिमठानावाला दाऊदी अतबा-ए-मलक वक्फ, अतबा-ए-हुमायून आणि बैतुल अमन या तीन ट्रस्टचे संचालन करतील.
दोन्ही जमातींचे अनुयायी एकमेकांच्या धार्मिक कार्यात हस्तक्षेप करणार नाहीत. देशभरातील प्रलंबित खटले परस्पर सहमतीने मागे घेतले जातील.