एका दिवसांत आढळले ११४८ विनातिकिट प्रवासी: दिवसभरात सात लाखांचा दंड वसूल
By नरेश डोंगरे | Updated: April 20, 2025 19:25 IST2025-04-20T19:25:12+5:302025-04-20T19:25:18+5:30
२२ रेल्वे गाड्यांमधील प्रवासी तपासले

एका दिवसांत आढळले ११४८ विनातिकिट प्रवासी: दिवसभरात सात लाखांचा दंड वसूल
नागपूर: विविध माार्गावर धावणाऱ्या २२ रेल्वे गाड्यांमध्ये तिकिट तपासणीची धडक मोहिम राबवून मध्य रेल्वेने एका दिवसांत चक्क ११४८ विनातिकिट प्रवास करणाऱ्यांना पकडले. शनिवारी, १९ एप्रिलला राबविण्यात आलेल्या या विशेष तपास मोहिमेतून अजूनही रेल्वेतून फुकट्यांचा कसा मजेत प्रवास सुरू आहे, त्याची प्रचिती आली.
आपल्या सोयीनुसार मनात येईल त्या वेळी, कोणतीही तिकिट न घेता ट्रेनमध्ये बसायचे आणि बिनधास्त प्रवास करायचा, अशी सवय असणाऱ्या फुकट्या, बेशिस्त प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वेकडून वेळोवेळी तिकिट तपासणीची मोहिम राबविली जाते. अचानक कोणत्याही गाडीत किंवा रेल्वे स्थानकावर तिकिट चेकर उभे होऊन प्रवाशांच्या तिकिट तपासतात.
विनातिकिट प्रवास करताना कुणी आढळले तर त्याच्यावर दंडाची कारवाई केली जाते. वारंवार अशी कारवाई केली जात असली तरी फुकटे, बेशिस्त प्रवासी त्याला काही दाद देत नाही. अनेक जण तिकिट न काढताच प्रवास करतात तर काही जण जनरलचे तिकिट घेऊन एसी कोचमधून प्रवास करतात. त्यामुळे आधीच कन्फर्म तिकिट घेऊन बसणाऱ्या प्रवाशांना फुकट्या प्रवाशांच्या गर्दीचा सामना करावा लागतो. त्रास होत असल्याने ही मंडळी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारीही करतात.
अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्याचे लक्षात आल्याने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने फुकट्या प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी अचानक शनिवारी सकाळीपासून तिकिट तपासणीची विशेष मोहिम राबविण्याचे ठरविले. त्यासाठी ९० तिकिट चेकर (टीसी), त्यांच्या मदतीला रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) ८ जवान आणि ५ वाणिज्य निरीक्षक तयार ठेवण्यात आले होते. त्यांनी नागपूर विभागात वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या गाड्या तसेच रेल्वे स्थानकांवर शनिवारी दिवसभर तपासणी मोहिम राबविली. त्यात १ हजार, १४८ प्रवाशांकडे तिकिटच नसल्याचे आढळले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण ७ लाख, ११ हजार, ८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
तिकिट घेऊनच प्रवास करा
आज या कारवाईची माहिती देताना ही मोहिम यापुढे अशीच वारंवार राबविण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांनी तिकिट घेऊनच प्रवास करावा. तसेच ज्या श्रेणीचे तिकिट काढले, त्याच श्रेणीतून प्रवास करावा, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे.