मृत्यू अटळ असताना हृदय सुरू करण्यासाठी दिले ११ इलेक्ट्रिक शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 19:24 IST2025-07-25T19:24:05+5:302025-07-25T19:24:30+5:30

दुर्मीळ घटना : मृत्यूच्या दारातून परतला रुग्ण

11 electric shocks given to restart heart when death was inevitable | मृत्यू अटळ असताना हृदय सुरू करण्यासाठी दिले ११ इलेक्ट्रिक शॉक

11 electric shocks given to restart heart when death was inevitable

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
मृत्यू अटळ वाटत असतानाही डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे एका ४२ वर्षीय व्यक्तीला जीवनदान मिळाले. तीव्र हृदयविकाराचा झटका आलेल्या या रुग्णाचे हृदय पुन्हा सुरू करण्यासाठी तब्बल ११ इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले. जगभरात असे १० पेक्षा कमी रुग्ण नोंदवले गेले आहेत ज्यांना इतके शॉक दिल्यानंतरही वाचवण्यात यश आले.


२ जुलै रोजी पहाटे ५ वाजल्यापासून या रुग्णाला छातीत दुखू लागले होतं, सकाळी ९ वाजता वेदना असह्य झाल्यावर स्थानिक रुग्णालयात ईसीजी काढला, ज्यात हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसली. सकाळी ११ वाजता एका खासगी रुग्णालयात दाखल केले. इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अमित बल्लमवार यांनी तपासले असता, रुग्णाला जीवघेणा हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान केले. डॉ. बल्लमवार यांनी सांगितलं की, रुग्ण कार्डिओजेनिक शॉकमध्ये होता. 


डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश
रुग्णाचं कुटुंब दिल्लीमध्ये असल्यामुळे डॉ. बल्लमवार यांनी तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी उपचारांसाठी परवानगी दिली. याच दरम्यान रुग्णाची स्थिती आणखी बिघडली. डॉक्टरांची टीम उपचार सुरू करणार तोच रुग्णाला अचानक 'कार्डियाक अरेस्ट' आला. त्याचं हृदय 'वेन्ट्रीक्युलर टॅकीकार्डिया' आणि त्यानंतर 'वेन्ट्रीक्युलर फिब्रिलेशन' या जीवघेण्या लयीत गेले. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रत्येकी २०० जूल्सचे ११ इलेक्ट्रिक शॉक दिले आणि चमत्काराने हृदय पुन्हा सुरू झालं. 


छातीत होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष नको!
हृदयविकाराचा झटका अचानक येतो आणि त्यामुळे छातीत होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करणे प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे लक्षणे दिसताच हृदयविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वेळेवर उपचार मिळाल्यास प्रत्येक मिनिटाला होणारे हृदयाचं नुकसान कमी करता येते आणि रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता वाढते.


आयुष्याची दुसरी संधी
रुग्णाच्या एलएडी धमनीमध्ये १०० टक्के ब्लॉकेज आणि एलसीएक्समध्ये २० टक्के ब्लॉकेजेस होते. या अत्यंत गंभीर स्थितीतही अँजिओप्लास्टी करून डॉक्टरांनी यशस्वीरीत्या स्टेंट बसवला. रुग्णाचं हृदय कमजोर असले तरी हळूहळू नियमितपणे धडकू लागले. मृत्यूच्या दारातून परत येण्याची आशा निर्माण झाली होती, पण लढाई अजून संपलेली नव्हती. आयसीयूमध्ये रुग्णाला सतत धोकादायक हृदयाच्या ठोक्यांमधील गडबडींचा सामना करावा लागला. मॉनिटरिंग आणि अचूक औषधोपचाराच्या मदतीने रुग्ण हळूहळू बरा होऊ लागला. त्याला खऱ्या अर्थाने आयुष्याची दुसरी संधी मिळाली.

Web Title: 11 electric shocks given to restart heart when death was inevitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.