नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या १०९ बॉटल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 23:17 IST2019-10-28T23:16:47+5:302019-10-28T23:17:43+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावर बेवारस अवस्थेत ठेवलेल्या पोत्यात पथकाला २८३४ रुपये किमतीच्या १०९ दारूच्या बॉटल्स आढळल्या आहेत.

नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या १०९ बॉटल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या दिवशीही दारूची विक्री करणारे आरोपी सक्रिय असल्याची बाब रेल्वे सुरक्षा दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत स्पष्ट झाली आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर बेवारस अवस्थेत ठेवलेल्या पोत्यात पथकाला २८३४ रुपये किमतीच्या १०९ दारूच्या बॉटल्स आढळल्या आहेत.
चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे रेल्वेमार्गाने या दोन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होते. निवडणुकीच्या काळात रेल्वेगाड्यांची कसून तपासणी करण्यात येत असल्यामुळे दारूची तस्करी करणारे आरोपी भूमिगत झाले होते. परंतु निवडणूक आटोपताच पुन्हा दारूची तस्करी करणारे सक्रिय झाले आहेत. रेल्वेगाड्यात दारूची तस्करी करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष पथक तयार केले आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक उपनिरीक्षक सीताराम जाट, रामनिवास यादव यांच्या नेतृत्वात शशिकांत गजभिये, बसंतसिंह परिहार, बी. बी. यादव, अश्विनी मुळतकर, निता माझी, सुषमा ढोमणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक जी. एन. केंद्रे, चंदु गोबाडे हे रविवारी दुपारी नागपूर रेल्वेस्थानकावर गस्त घालत होते. पथकाला प्लॅटफार्म क्रमांक २ वर इटारसी एण्डकडील भागात एक बॅग बेवारस अवस्थेत आढळली. संशयाच्या आधारे बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या २८३४ रुपये किमतीच्या १०९ बॉटल होत्या. निरीक्षक रवी जेम्स यांच्या आदेशानुसार जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.