समता एक्स्प्रेसच्या बाथरुममध्ये पकडला १० किलो गांजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 17:14 IST2022-04-15T17:03:40+5:302022-04-15T17:14:34+5:30
समता एक्स्प्रेसच्या एस ५ कोचची तपासणी केली असता गांजासारखा वास येत होता. या कोचमधील बाथरुमची तपासणी केली असता प्लायवूडमध्ये गांजाचे बंडल बेवारस अवस्थेत दिसले.

समता एक्स्प्रेसच्या बाथरुममध्ये पकडला १० किलो गांजा
नागपूर : समता एक्स्प्रेसच्या बाथरुममध्ये लपविलेला १ लाख १ हजार १८० रुपये किमतीचा १०.११८ किलो गांजा रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द केला आहे.
ऑपरेशन सतर्कनुसार आरपीएफचे निरीक्षक आर. एल. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार १३ एप्रिलला मध्यरात्री १.३५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर रेल्वेगाडी क्रमांक १२८०७ समता एक्स्प्रेसच्या एस ५ कोचची तपासणी केली असता गांजासारखा वास येत होता. या कोचमधील बाथरुमची तपासणी केली असता प्लायवूडमध्ये गांजाचे बंडल बेवारस अवस्थेत दिसले.
एकूण ५ बंडलमध्ये १० किलो ११८ ग्रॅम गांजा आढळला. त्याची किंमत १ लाख १ हजार १८० रुपये आहे. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सुरक्षा आयुक्त कोटा जोजी यांच्या उपस्थितीत पंचनामा करून हा गांजा लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.