Corona Virus; १० टक्के मुलांना रुग्णालयाची गरज भासणार; तज्ज्ञांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 10:38 IST2021-06-02T10:37:24+5:302021-06-02T10:38:39+5:30
Nagpur News आता तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात आहे. कोरोना विषाणूचे ‘म्युटेशन’ लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, हजारमधील ९० टक्के मुलांना सौम्य लक्षणे, तर १० टक्के मुलांना मध्यम व गंभीर लक्षणे दिसून येण्याची शक्यता आहे.

Corona Virus; १० टक्के मुलांना रुग्णालयाची गरज भासणार; तज्ज्ञांचे मत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये लागण होण्याचे प्रमाण कमी होते, परंतु दुसऱ्या लाटेत ते वाढताना दिसून आले आहे. आता तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात आहे. कोरोना विषाणूचे ‘म्युटेशन’ लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, हजारमधील ९० टक्के मुलांना सौम्य लक्षणे, तर १० टक्के मुलांना मध्यम व गंभीर लक्षणे दिसून येण्याची शक्यता आहे. अशा रुग्णांना रुग्णालयाची गरज भासणार आहे.
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक, दुसऱ्या लाटेत तरुण तर तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याला गंभीरतेने घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका व आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. मेडिकलमध्ये लहान मुलांचे ५० बेडचे ‘आयसीयू’ असणार आहे. यात २५ बेडचे ‘पेडियाट्रिक इन्टेन्सिव्ह केअर युनिट’ (पीआयसीयू), १५ बेडचे ‘हाय-डिपेंडन्सी युनिट’ (एचडीयू) तर १० बेडचे ‘इन्टेन्सिव्ह केअर युनिट’ (एनआयसीयू) असणार आहे. मेयोमध्येही १५ ‘पीआयसीयू’ तर ३५ ‘एचडीयू’ बेडचा समावेश असणार आहे, परंतु तूर्तास तरी हे सर्व कागदावर आहे. विशेषत: आयसीयूसाठी लागणारे लहान मुलांचे व्हेंटिलेटरपासून ते बेड इतरही यंत्र सामुग्रीची खरेदी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यामुळे तिसरी लाट लवकर आल्यास प्रशासनाची तारांबळ उडणार आहे.
- मोठ्यांनीच लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक
मेडिकलच्या बालरोग विभागाच्या प्रमुख व कोरोनाबाधित मुलांच्या उपचारासाठी तयार करण्यात आलेल्या टास्ट फोर्सच्या सदस्य डॉ.दीप्ती जैन म्हणाल्या, दुसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्या लहान मुलांची संख्या वाढलेली आहे. यामुळे तिसरी लाट आलीच, तर त्याचा प्रभाव लहान मुलांवरही पडेल. यात १,००० मुलांमधून ९० टक्के मुलांमध्ये सौम्य लक्षणे, तर १० टक्के मुलांमध्ये मध्यम व गंभीर लक्षणे दिसून येतील. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येईल. यामुळे रुग्णालये सज्ज असणे गरजेचे आहे. कोरोनापासून मुलांना दूर ठेवायचे असेल, तर मोठ्यांनी कोरोना नियमांचे पालन करणे व मुलांची काळजी घणे आवश्यक आहे.
- लहान मुलांचे आयसीयू लवकरच सज्ज
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर म्हणाले, ग्रामीण भागात १३ ठिकाणी लहान मुलांचे कोविड केअर सेंटर उभारले जाणार आहे. मेयो, मेडिकलमधील लहान मुलांच्या आयसीयूसाठी आवश्यक असलेली यंत्र सामुग्रीची खरेदी प्रक्रिया लवकरच सुरू होईल. तिसरी लाट येण्यापूर्वी लहान मुलांचे आयसीयू सज्ज असेल.