शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

समाजाची भाषा का आणि कशी बिघडते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 7:55 AM

समाजाची भाषा बिघडविण्यात  चित्रपटांची गाणी आणि लेखन काहीअंशी  जबाबदार असल्याचं म्हटलं जातं.  पण हा समज अत्यंत चुकीचा आहे. 

ठळक मुद्देसिम्बॉयोसिस अभिमत विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव रंगला.अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर या महोत्सवाला उपस्थित होते. त्यांच्या दिलखुलास गप्पांचा हा संपादित अंश

-जावेद अख्तर

‘चित्रपट’ माध्यमाचे अनेक पैलू आहेत. तो तुम्हाला ‘माहितीपट’ किंवा ‘गाणी’ अशा कोणत्याही स्वरूपात उलगडता येतो. पण जगभरात लोकप्रिय चित्रपट हा त्याच्या कथेवरून ओळखला जातो. ‘कथा’ हे चित्रपटापेक्षाही खूप जुनं माध्यम आहे. ‘चित्रपट’ हा कथेची मांडणी करणारा निव्वळ एक मार्ग आहे. संपूर्ण मानवजातीला एका छताखाली आणत त्या विषयामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी कथेची गरज असते. भारतात चित्रपटांच्या निर्मितीपूर्वी नौटंकी, रामलीला तसेच उर्दू, फारसी रंगमंच मोठय़ा प्रमाणावर सक्रिय होते. जे एका शहरातून दुसर्‍या शहरामध्ये  फिरत राहायचे. त्या काळात रंगमंचीय कलाविष्कारातून  विविध पौराणिक आणि ऐतिहासिक कथांची मांडणी करणारे हे  प्रकार अत्यंत लोकप्रिय होते. त्यानंतर ‘टॉकीज’ सिनेमा आला.  त्यानेही कथा सांगण्याची परंपराच चालू ठेवली.

थोडक्यात  काय तर सिनेमा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येते  ती एक काल्पनिक कथा. जी तुमच्यासमोर वेगवेगळ्या अंगाने उलगडत जाते. ‘कथा’ ही चित्रपटाची गरज आहे. त्यातील भाषा  ही त्या चित्रपटाची असते तशी ती त्या पात्राचीदेखील असते.  चित्रपट जर मराठी किंवा बंगाली भाषेमध्ये निर्मित होत असेल तर त्यातील पात्रदेखील तीच भाषा बोलणं हे स्वाभाविकच आहे. भाषेला अनेक बोली असतात. प्रत्येक जण एकच भाषा  वेगवेगळ्या पद्धतीने बोलतो. साहजिकच चित्रपटातील प्रत्येक पात्राच्या भाषेचा लहेजा थोडा वेगळा असतो. एखाद्या  विद्यापीठाचा कुलगुरु असेल तर त्याची भाषा आणि एका शेतकर्‍याची भाषा यात नक्कीच फरक असेल. वेगवेगळी कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही सर्वजण एकच भाषा बोलत असतात. त्यामुळे चित्रपटाची भाषा निश्चित असली, तरी दिग्दर्शकाने त्या पात्राशी, त्याच्या भाषेच्या लहेजाशी प्रामाणिक राहायला हवे. 

सुरुवातीच्या काळात उर्दू फारसी रंगमंचीय प्रभावामुळे चित्रपटांची भाषादेखील काहीशी अलंकारिक असे. संवादात कमीत कमी शब्दांचा वापर होत असे. मात्र हळूहळू चित्रपटांची भाषा बदलत गेली. आम्ही सत्तरीच्या काळात कथानकात लिहिलेले एक पात्र ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून प्रचलित वगैरे होईल असे कधी वाटले नव्हते. याकाळातील राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीशी त्याचा काही  संबंध नव्हता. फक्त ते जनतेची भाषा बोलणारे, त्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठविणारे असे एक सामान्य पात्र होते.  आपणही एक समाजाचा भाग आहोत. जनतेला काय हवंय हे  सांगणारे ते पात्र होते. लोकांना हे पात्र आपल्यातलंच वाटल्यामुळे त्यांनी या पात्राला डोक्यावर घेतले. खरं तर मला आजच्या लेखक आणि पटकथाकार मंडळींविषयी अपार आदर वाटतो की, त्यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. दिग्दर्शक आणि लेखकांमध्ये कमालीची परिपक्वता पाहायला मिळते. त्यांना स्वत:ला हे चांगलं अवगत आहे की काय मांडायचं आणि सांगायचं आहे. अत्यंत सहज सोप्या भाषेमध्ये जे लोकांपर्यंत सांगायचंय ते उत्तम प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवित आहेत. बहुतांश वेळेला समाजाची भाषा बिघडविण्यात चित्रपटांची गाणी आणि लेखन काही अंशी जबाबदार असल्याचं म्हटलं जातं. पण हा समज अत्यंत चुकीचा आहे. काही चित्रपट चांगले आणि  वाईटदेखील असू शकतात. भारतीय चित्रपटसृष्टीच्या युगानुयुगे  चालत आलेल्या चित्रपरंपरेचे हे एक सत्य आहे. चित्रपटांचे सुवर्णयुग असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा फक्त अभिजात कलाकृतीच आपल्या नजरेसमोर येतात. पण असं नाही की त्याकाळात फक्त अशाच कलाकृती निर्माण झाल्या.  हे होतंच असतं. त्यामुळे भाषा बिघडण्याचे खापर हे चित्रपट क्षेत्रावर फोडता येणार नाही. भाषेच्या सद्यस्थितीसाठी सिनेमातील भाषा किंवा गीतांना जबाबदार धरता येणार नाही. आपल्या टीव्हीवर,  राजकीय भाषणांमध्ये, रेडिओवर, शाळा-महाविद्यालयांमध्ये  बोलली-शिकवली जात असलेली भाषा पाहून भाषा कमकुवत होत चालल्याचे जाणवते. भाषेकडे होत असलेले दुर्लक्ष एक सामाजिक समस्या आहे. सर्वच क्षेत्रात भाषा कमकुवत होत आहे. गेल्या काही वर्षात आपण भाषेला प्राधान्य न दिल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. भाषेकडे दुर्लक्ष करत आपण आपले एक मोठे सांस्कृतिक संचित, वैभव दूर सारत आहोत. लेखकांच्या साहित्यामधून भाषा विकसित होत जाते. मात्र शाळा-महाविद्यालयांमध्ये भाषा समृद्ध करणारे वाड्मय जवळपास हद्दपारच झाले आहे. ‘धंदे की कुछ बात करो, पैसा जोडो’ केवळ हीच भाषा आपल्याला कळते. हेच जीवनाचे अंतिम ध्येय झाले आहे. हा शिक्षणव्यवस्थेचा  दोष आहे. कवी तुलसीदास, संत कबीर, गालिब यांचा भाषेचा  अभ्यास करून रोजगार मिळणार आहे का, पैसे मिळणार आहेत  का, असा दृष्टिकोन भाषेला मारक ठरतो आहे. भाषा म्हणजे  केवळ शब्दावली नाही. ते विचार आणि अभिव्यक्तीचे माध्यम  आहे. हिंदू आणि उर्दूमध्ये फरक करण्याऐवजी दोन्हींमधले  उत्तम साहित्य, विचार एकत्र करून हिंदुस्थानी असा अभ्यासक्रम शिकवला गेला पाहिजे. देश हा धर्माच्या आधारावर बनत नाही. धर्म हा दैनंदिन जीवनातला एक छोटासा भाग आहे. हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन अशी कुठली संस्कृती नाही. त्या त्या भागात राहाणारा समाज एका विशिष्ट  संस्कृतीला आत्मसात करतो. दिवसातले 15 ते 20 मिनिटेच  आपण धर्माशी निगडित आयुष्य जगत असतो. उर्वरित आयुष्य  आपण धर्मनिरपेक्षतेनेच जगत असतो. त्यामुळे धर्माला जगभरच विनाकारण अधिक महत्त्व दिले गेले आहे, याउलट भाषा हा संपूर्ण प्रांताला एकत्र आणणारा धागा आहे. आपण वाहनचालक नेमताना, स्वयंपाकी नेमताना अनेक प्रश्न विचारतो, अनुभव विचारतो. पण देवाला प्रश्न विचारू शकत नाही. माणसामाणसाला जोडते, ती प्रेम आणि माणुसकीची भाषा! 

 

शब्दांकन : नम्रता फडणीस