तनू-मनू-दत्ताे आणि आपण.
अनन्या भारद्वाज
तनू.
तनुजा त्रिवेदी.
अशी का वागते ती? उठवळ आणि उच्छृंखल बाई आहे का ती? की थोडी ‘सटक’ आहे?
आपल्या रूपाचा तिला केवढा गर्व. त्या रूपाच्या जिवावर कुठल्याही पुरुषाचं पार कुत्रं करून त्याला आपल्या मागे मागे शेपूट हलवत आपण फिरवू शकतो याची तिला पूर्ण खात्री आहे.
एक रुपया कमवायची अक्कल नाही, त्याची तिला गरजही वाटत नाही. नव:याच्या पैशावर ऐश करायची, ऐशोआरामी लाईफस्टाईल एन्जॉय करायची, दारू प्यायची हेच तिचं सूत्र!
डॉक्टर असलेला नवरा लग्नानंतरच्या चार वर्षातच तिला बोअर वाटू लागतो. लंडनमधल्या कण्ट्रीतलं चिटपाखरूही न दिसणारं आयुष्य तिला वीट आणतं. नव:याचे आयटीवाले मित्र, त्यांचं दारू पीत तेच ते बोलणं, त्यांच्या त्या एकमेकींशी स्पर्धा करणा:या बायका, हे सारं तिला नीरस वाटतं. नव:याच्या रोमान्सच्या आणि आउटिंगच्या कल्पनाही तिला आउटडेटेड वाटतात. फिरायला जायचं म्हणजे डिस्काउण्ट कूपनवर सुपर मार्केटमधून किराणा आणायला जायचं या नव:याच्या वागण्याचा तिला उबग आलाय!
शेवटी नव:यालाच वेडा ठरवून, त्याला पागलखान्यात टाकून ती लंडनमधून पळून येते. आपल्या माहेरी, कानपुरात येऊन स्वत:ला उधळून देते.
तिचं हे रूप पाहताना प्रश्न पडतो की, असं का वागते ही? हिला सुख बोचतंय का? चारचौघी जगतात त्याच चाकोरीत हिनं का जगू नये? खाणंपिणं-कपडालत्ता-हौसमौज-नवरा देतोय तेवढं शरीरसुख हे सारं सुरक्षित संसाराच्या चाकोरीत मिळत असताना ही का अशी ‘स्वैर’ वागण्याचा अट्टहास करते?
हिला हवंय तरी काय? खरं तर हाच प्रश्न सिनेमा संपल्यावरही आपला पिच्छा सोडत नाही. तनूला हवंय तरी काय? नवरा, त्याचा पैसा तिला तर हवाय, पण त्याहून काहीतरी जास्त हवंय! ‘ते’ जास्त हवं असणं ही तिची अपेक्षा मात्र आपल्या समाजात कुणाला मान्य नाही. एकदा बायको नावाच्या भूमिकेत प्रवेश केला की, स्वत:च्या मनासारखं जगायचं नाही हेच वारंवार हा समाज बजावतो. म्हणूनच तनू जेव्हा घराबाहेर पडते, तेव्हा समाज तिला उठवळ ठरवतो!
आणि गंमत पहा, या तनूला तरी कुठं सोडायचीये चाकोरी? बायकोपणाची सारी सुखं तिला हवी आहेत, आणि म्हणूनच पाय मोकळा होत असूनही ती पुन्हा ‘बायको’च्याच तिला नको असलेल्या चाकोरीत स्वत:हून जाते. आणि आपल्याला कळतच नाही की, या तनूला नेमकं हवंय तरी काय?
दत्ताे.
तिचं नाव कुसुम सांगवान. एक हरियाणवी, देहाती छोरी. ती अॅथलिट आहे, स्पोर्ट कोटय़ातून तिला दिल्ली विद्यापीठात अॅडमिशन मिळालेली आहे. दत्ताे अॅम्बिशियस आहे. इण्डिपेण्डण्ट आहे, स्वतंत्र आहे, स्वत:च्या डोक्यानं निर्णय घेण्याची धमकही तिच्यात आहे. माझी बायको तुङयासारखीच दिसते असं सांगणा:या मनू शर्माची तिला हळूहळू ओढ वाटू लागते. स्वत:च्या डोक्यावरच्या जबाबदा:या विसरून ती त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णयही स्वत:च घेऊन टाकते. त्यासाठी घरच्यांचा विरोधही पत्करते.
आणि एका क्षणी, तिच्या लक्षात येतं की, ज्याच्या भरवशावर आपण हे सारं करतोय, त्याचा जीव तर आधीच्याच बायकोत अडकलाय.
त्याक्षणी ती त्याच्याशी लग्न न करण्याचा आणि त्याला मोकळं करण्याचा निर्णय घेते, सहावा फेरा संपता संपता लग्नातून माघार घेते.
ती असं का वागते? चाळिशीला पोहचलेल्या एका पुरुषाची अवचित ओढ वाटणं समजू शकतं, पण जो पुरुष इतक्या चटकन आपल्या लग्नाच्या बायकोला विसरतो, त्याच्याशी लग्न ती कुठल्या भरवशावर करायला निघते?
आणि ते मग तोडूनही टाकते, तेही कशाच्या भरवशावर? दत्ताेच्या बहादुरीचं कौतुक करावं की तिच्या निर्णयातल्या पोरखेळाची कीव करावी? आणि मुख्य म्हणजे अशी स्वत:चाच हेका चालवणारी आणि आपल्याच डोक्यानं वागणारी दत्ताे मनू शर्मासारख्या माणसाबरोबर सुखी झाली असती का?
असे अनेक प्रश्न घेऊन आपण स्वत:लाच विचारत राहतो की, दत्ताेचं पुढं काय? स्वतंत्र बाण्याच्या दत्ताेचं पुढं होतं काय आपल्या समाजात? काय होईल?
मनू.
मनोज शर्मा. डॉक्टर, लंडनवाला.
खरं तर तनू भेटली त्यादिवसापासून त्याला माहिती असतं की ही ‘सटक’ आहे, अत्यंत उथळ आहे, सुंदर आहे, पण काय वाट्टेल ते करू शकते. तरीही तिच्या प्रियकराशी पंगा घेऊन तो तिच्याशी लग्न करतो. आणि लग्नानंतर चार वर्षात तिच्या या त्याला हव्याहव्याशा वाटलेल्या स्वभावाला कंटाळतो.
त्याला टिपिकल बायको हवी असते, जी तनू होऊच शकत नाही. मग त्याला तिच्यासारखीच दिसणारी दत्ताे सापडते. त्याला वाटतं ही खेडवळ, गरीबशी मुलगी. ही बरीये आपल्यासाठी, जिरवू त्या तनूची.
पण ती मुलगी तनूपेक्षाही आणि खरं तर ख:या अर्थानं स्वतंत्र निघते. आणि तो पुन्हा शरीरानं सुंदर असलेल्या तनूकडेच परततो. समाजातले हे सुशिक्षित मनू शर्मा. त्यांना अजूनही शेजेला आणि पेजेला मुकाट साथ देणारी बायकोच हवी आहे. तिला डोकं नसलं तर जास्त चांगलं हीच त्यांची मागणी. आणि म्हणूनच मनू शर्मा जुनाट नवराछाप मार्ग पत्करतो.
आणि आपण?
ही तीनही माणसं ‘तनू वेड्स मनू’ नावाच्या सिनेमातली. पण तरी ती फक्त पात्रं नाहीत. ती चालू वर्तमान काळातली आपल्या समाजातली प्रवृत्ती आहे. स्वार्थी-स्वतंत्र आणि आत्मकेंद्री. फक्त स्वत:चाच विचार करूनही पुन्हा अस्वस्थच असलेली, चेह:यावर मुखवटेच चढवणारी आणि प्रसंगी ढोंगही करणारी! त्या आपल्याच ढोंगीपणाचे पडदे आपल्यासमोर सिनेमात फेडले जातात तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की, त्यांचं जाऊ दे, आपल्याला तरी नक्की काय हवंय? आपण स्वत:चा चेहरा शोधत राहतो कधी तनूमध्ये, कधी दत्ताेमधे आणि कधी मनू शर्मामध्येही!
आपल्याला नक्की काय हवंय हेच माहिती नसलेल्या एका बदलत्या जगण्याची अस्वस्थता आपल्याला हलवून टाकते. आणि प्रश्न विचारते.
त्या प्रश्नाची उत्तरं स्वत:ची स्वत:ला दिली पाहिजे अशी तरी कुठं कुणावर सक्ती आहे. पळवाट शोधून हे प्रश्नच नाकारण्याचा एक मार्ग आहेच.
अनेकदा तोच आपण स्वीकारतो.
(लेखिका जाहिरात आणि मनोरंजन या क्षेत्रच्या अभ्यासक आहेत.)