शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

झपाटलेलं ऋषितुल्य व्यक्तिमत्व 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 07:00 IST

ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पं. वसंतराव गाडगीळ आज नव्वदीत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त...

- शां. ब. मुजुमदार-  

आपण कुणाला तरी कुठल्या तरी निमित्ताने भेटतो. वरचेवर भेटी होतात. त्यातून ओळख वाढते आणि दोघांतही नकळत स्नेह निर्माण होतो. दोघेही एकमेकांवर अवलंबून नसतील आणि केवळ एकमेकांत कोणतीही अपेक्षा न ठेवता सहाय्य करत राहतील तर तो स्नेह दीर्घकाळ रहातो.पंडित वसंतराव गाडगीळ व माझ्यामध्ये नेमकं हेच झालं. १९७३ साली सेनापती बापट मार्गावर शासनाने सिंबायोसिसला एक एकर जमीन आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्रासाठी दिली होती. भूमिपूजनासाठी गुरुजींची आवश्यकता होती. त्या काळी पं. गाडगीळ यांचं नाव या ना त्या कारणानं वृत्तपत्रातून वाचनात येत असे. मी त्यांना भूमिपूजनासाठी निमंत्रित केलं आणि त्यांनीही आढेवेढे न घेता येण्याचं मान्य केलं. सकाळी साडेपाचला सूर्योदयापूर्वी भूमिपूजन सुरू झालं. सर्व साहित्य त्यांनी व त्यांच्या पत्नीनं आणलं होतं. मी व माझी पत्नी पूजेस बसलो. गाडगीळांनी शास्त्रोक्त पूजन केले. विशेष म्हणजे, पूजन करताना जे संस्कृत मंत्र ते म्हणत त्याचा अर्थ ते आम्हाला मराठीतून समजावून सांगत. हा अनुभव मला नवीन होता. मुंज, विवाह इत्यादी प्रसंगी गुरुजी जे संस्कृत मंत्र म्हणतात त्याचा अर्थ समजून घेतल्यावर आपल्याला एक निराळा आनंद मिळतो. वेगळी अनुभूती मिळते. माझी कन्या विद्या हिचा विवाह जेव्हा साजरा झाला, तेव्हा माझ्या विनंतीवरून पंडित गाडगीळांनी एक पुस्तिका प्रसिद्ध केली. त्यामध्ये विवाहात म्हटल्या जाणाºया प्रत्येक संस्कृत श्लोकाचा व मंत्राचा मराठी अनुवाद गाडगीळांनी दिला होता. प्रत्येक निमंत्रिताला ही पुस्तिका भेट म्हणून दिली. ती त्यांना इतकी आवडली, की अजूनही अनेकांनी ती पुस्तिका जपून ठेवली आहे. प्रत्येक मंत्राला एक कौटुंबिक आणि सामाजिक अर्थ आहे. अर्थ समजल्यानंतर आपले धार्मिक विधी किती अर्थपूर्ण असतात, याची आपल्याला कल्पना येते.हळूहळू पंडित वसंत गाडगीळांचं माझ्या घरी येणं-जाणं वाढलं. सिंबायोसिस असो वा मुजुमदार कुटुंबातील धार्मिक विधी असो, गाडगीळांशिवाय आम्हाला कुणीच सुचत नव्हतं. माझी वृद्ध आई, पत्नी, भाऊ हे सर्व पं. गाडगीळांच्या प्रेमात पडले आणि बघता-बघता पं. गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी आमच्या कुटुंबातीलच झाले.पं. वसंत गाडगीळ एक अवलिया माणूस आहे. त्यांचं जीवन एक चित्तथरारक कादंबरी आहे. वि. स. खांडेकरांचा लेखकू, वडिलांच्या भीतीनं त्यांचं कराचीकडे पलायन, स्वातंत्र्यांनतर त्यानी तिथं पाहिलेली हिंदूंची कत्तल, कराचीहून भारताकडे बोटीनं विनातिकीट प्रवास, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत विषयात पदवीपर्यंतचं अध्ययन, शारदा ज्ञानपीठाची स्थापना, संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी केलेला प्रयास. त्यासाठी अमेरिका, आफ्रिकेमध्ये अनेक वेळा प्रवास. हे सारं केवळ झपाटलेला माणूसच करू शकतो.पं. वसंत गाडगीळ प्रत्येक वर्षी पुण्यात ऋषीपंचमी जाहीररीत्या साजरी करतात. ८० वर्षांवरील तपस्वी, विद्वान, निरनिराळ्या क्षेत्रांत सातत्यानं विधायक कार्य करणाºया पुण्यातील व पुण्याबाहेरील नामवंत व्यक्तींचा सत्कार करतात. ते आजही स्वागतपर भाषण संस्कृतमध्येच करतात. गेली ४४ वर्षं हा उपक्रम खंड न पडता ते आयोजित करतात. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या धार्मिक समारंभास तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद उपस्थित राहिले. संयोजकांनी कार्यक्रमासाठी हिंदू धर्मातील अनेक दिग्गजांना निमंत्रित केलं होतं व ते सर्व आनंदानं सहभागी झाले होते. पौरोहित्य करण्यासाठी संयोजकांनी महाराष्ट्रातून लक्ष्मणशास्त्रींना बोलावलं होतं. त्यांच्यासोबत पं. वसंत गाडगीळही समारंभाला गेलं होतं. धार्मिक समारंभात त्यांनी भागही घेतला. त्या दिवसापासून त्यांनी आपले भाषण संस्कृतमधूनच करण्याचा निश्चय केला. तेव्हापासून सतत ६० वर्षं ते आपलं भाषण फक्त संस्कृतमध्येच करत आहेत. सतत ६० वर्षं त्यांनी हा उपक्रम केला म्हणून त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम २०१२मध्ये आयोजित करण्यात आला होता. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. कार्यक्रम एमआयटीमध्ये होता. व्यासपीठावर मोदींच्या समवेत डॉ. वि. दा. कराड व मी होतो. आपल्या भाषणात मोदी म्हणाले, ‘वसंत गाडगीळांना त्यांच्या आईनं रांगायला न शिकविता एकदम पळायला शिकविलं असावं. कारण, हा माणूस आयुष्यात सतत या गावातून त्या गावात पळतच असतो.’ सभेत हशा पिकला. मोदी म्हणाले ते खरंच आहे. पं. गाडगीळ, ज्यांना मी ‘नमो नम:’ म्हणतो, सतत कोणत्यातरी ध्येयानं, विशेषत: संस्कृतच्या प्रचारासाठी सतत पळत, धडपडत, झपाटल्याप्रमाणे फिरत असतात.राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद पुण्यात आले होते. त्यांना भेटण्यासाठी मी काही परदेशी विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन राजभवनामध्ये गेलो होतो. गणेशचतुर्थी त्याच दिवशी होती. आमच्या बरोबर पं. गाडगीळ उघड्या अंगानं, गुरुजी वेशात सामील झाले. त्यांनी राष्ट्रपतींना दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा करण्यासाठी निमंत्रित केलं होतं. मी अवाक् होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिलो. फक्रुद्दिन अली अहमद गाडगीळांचं निमंत्रण स्वीकारणार नाहीत, याची मला पूर्ण खात्रीच होती; पण झालं उलटंच. त्यांनी निमंत्रण स्वीकारलं. गणपतीची षोडशोपचारे पूजा केली. गणपतीला भक्तिभावे वंदन केलं. मनोभावे आरती केली. मोहन धारिया आणि मी हे सर्व अवाक् होऊन पाहत होतो. पं. गाडगीळांनी एक चमत्कार करून दाखविला. हे केवळ एक वेडा माणूसच करू शकतो. समाजात काही चांगलं करायचं असेल, तर माणसानं झपाटणं आणि थोडं वेडं होणंही आवश्यक आहे.या वयातही पं. वसंत गाडगीळ स्वस्थ बसलेले नाहीत. स्वस्थ बसणं हे त्यांच्या स्वभावात व वृत्तीतही नाही. काही तरी नवीन करण्याची इच्छा त्यांना सतत सतावत असते. ‘पुण्याची पुण्याई’ हा ग्रंथ लिहिण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. ज्ञानेश्वर, तुकारामांपासून शिवाजीमहाराज, टिळक, आगरकर, धोंडो केशव कर्वे, दत्तो वामन पोतदार, इतिहासाचार्य राजवाडे व सध्या हयात असलेल्या काही व्यक्तींनी पुण्याच्या पुण्याईत भर घातली आहे. या सर्वांच्या कार्याचा आढावा ते या ग्रंथात घेणार आहेत.पं. वसंत गाडगीळ आज (८ सप्टेंबर) ९०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्यापेक्षा वयानं लहान असल्यामुळे त्यांना आशीर्वाद देण्याचा मला अधिकार नाही; पण त्यांनी आपला झपाटलेपणा व वेडेपणा असाच चालू ठेवावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. (लेखक सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाचे संस्थापक, अध्यक्ष आहेत.)

टॅग्स :Puneपुणे