महाराष्ट्रातला तिबेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 08:00 IST2018-11-25T08:00:00+5:302018-11-25T08:00:09+5:30
‘‘स्वातंत्र्याचा दुर्दम्य आशावाद व नसानसात देशाभिमान भिनलेले ते तिबेटीयन पाहुणे मागील ४६ वर्षांपासून भारतात वास्तव्यास आहेत. अद्याप त्यांनी भारताचे नागरिकत्व स्वीकारले नाही. आज ना उद्या तिबेट स्वतंत्र होईल या प्रतीक्षेत ते आहेत.

महाराष्ट्रातला तिबेट
संतोष बुकावन
नागपूर:
‘‘स्वातंत्र्याचा दुर्दम्य आशावाद व नसानसात देशाभिमान भिनलेले ते तिबेटीयन पाहुणे मागील ४६ वर्षांपासून भारतात वास्तव्यास आहेत. अद्याप त्यांनी भारताचे नागरिकत्व स्वीकारले नाही. आज ना उद्या तिबेट स्वतंत्र होईल या प्रतीक्षेत ते आहेत.
७ आॅक्टोबर १९५० तिबेटीयनांसाठी काळा दिवस ठरला.४० हजार चीनी सैनिकांनी थांगत्सी नदी ओलांडून मध्य तिबेटमध्ये प्रवेश केला. छाम्दो येथे सुरक्षा सेनेला पराभूत केले. चीन आक्रमणापूर्वी ६० लाख लोकसंख्या असलेले तिबेट हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून ओळखले जात होते. चीनद्वारा तिबेटवरील आक्रमणाचा जगात निषेध झाला. परंतु साम्यवादी चीनवर त्यांचा कुठलाही परिणाम झाला नाही. तिबेटीयनांनी केलेली निदर्शने, आंदोलने चीनने दडपून हजारों महिला-पुरुषांना जीवे मारले. हा अन्याय, अत्याचार असह्य झाला. १७ मार्च १९५९ रोजी चौदावे दलाई लामा सुमारे ८० हजार लोकांसोबत भारतात वास्तव्यास आले.आजमितीस भारतात तिबेटीयनांची संख्या १ लाख १ हजार २४२ एवढी आहे. जगात राष्ट्रप्रमुखाचा दर्जाप्राप्त दलाई लामांनी हिमाचल राज्याच्या धर्मशाळा येथे निर्वासित तिबेट सरकारचे अधिष्ठान स्थापन केले. भारतात हिमाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, छत्तीसगड, ओरीसा व जम्मू कश्मिर या राज्यात एकूण १५ शेतकीप्रधान तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व पश्चिम बंगाल राज्यात १४ ठिकाणी हस्तव्यवसाय व उद्योग प्रधान वसाहती आहेत. दिल्ली, मेघालय, कुल्लू, मुंदुवाडा, सिक्कीम, बोमदीला येथेही विखुरलेल्या वसाहती आहेत. महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गोठणगाव (प्रतापगड) येथे महाराष्ट्रातील एकमेव तिबेटीन वसाहत आहे. नार्गोलिंग तिबेटीयन असे या वसाहतीचे नाव आहे. १३० घरांमध्ये ११०३ लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. सुरुवातीला ते इटियाडोह धरणाच्या शेजारी तंबूत राहू लागले. कालांतराने शासनाने बुटाई नं. १ नजीक या निर्वासितांचे पुनर्वसन केले. २ कुटुंबांना एक घर मिळून २ कॅम्प तयार झाले. शासनाने प्रतिव्यक्ती ६० डिसमिल या प्रमाणे प्रत्येक कुुटुंबाला उदरनिर्वाहासाठी शेत जमिन दिली. एकूण ६१२.८० एकर जमिनीत ही वसाहत आहे. यापैकी ४०५ एकर जागार शेतीची आहे.
हिमाचलच्या कुलू व डलहौजी पर्वतावर थंड वातावरणात राहणारी ही मंडळी पूर्व विदर्भाच्या उष्ण व दमट वातावरणात दाखल झाली. उष्णतेच्या काहिलीने त्रस्त झालेले हे लोक दिवसभर इटियाडोह धरणाच्या कालव्यातील पाण्यात बुडून असायचे. भात शेती व स्वेटर विक्री हा यांचा मुख्य व्यवसाय आहेत. ते प्रचंड कष्टाळू आहेत. या व्यवसायाच्या भरवशावरच वर्षभर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कुण्या एकेकाळी सुमारे पाच वर्षांपूर्वी येथील गालीचे सर्वदूर प्रसिद्ध होते. मात्र या गालीच्यांना महाराष्ट्रात अत्यल्प मागणी आहे. त्यामुळे हळूहळू हा व्यवसाय मोडकळीस आला. चौदावे दलाई लामा तेनजीन ग्यात्सो हे यांचे आध्यात्मिक नेते आहेत. ते तिबेटमध्ये करुणेचे बोधीसत्व व संरक्षक संत अवलोकितेश्वर यांचे अवतार मानले जातात. त्यांना १९८९ मध्ये शांतीचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे.