शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
3
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
4
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
5
“३९ वर्षे संघटनेत, निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत?”; ठाकरेंना सवाल करत बडा नेता शिवसेनेत
6
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
7
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
8
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
9
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
10
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
11
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
12
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
13
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
14
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
15
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
16
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
17
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
18
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
19
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
20
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर

..यंदा गुलाल, भंडारा, खोबरं दणक्यात हाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 07:00 IST

लॉकडाऊनच्या गाळात रुतलेली गावं जागी झालीत, जत्रा-यात्रा-उरुसांनी मोहरू लागलीत! मनाचं पाखरू झालेले चाकरमानी गावाकडं निघालेत...

लॉकडाऊनच्या गाळात रुतलेली गावं जागी झालीत, जत्रा-यात्रा-उरुसांनी मोहरू लागलीत! मनाचं पाखरू झालेले चाकरमानी गावाकडं निघालेत...

कोरोनाच्या कचाट्यातून सुटून दोन वर्षांनंतर यंदा गावोगावच्या यात्रा-जत्रा-उरूसांना दणक्यात सुरुवात झालीय. लॉकडाऊनच्या गाळात रुतलेला गावगाडा भिरीरी पळायला लागलाय. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या तोंडावर तजेला आलाय...

सुगी संपली की, लगेच सुरू होतो यात्रा-जत्रा-उरूसांचा हंगाम. यात्रा-जत्रा म्हणजे लोकजीवनाचं सांस्कृतिक वैशिष्ट्य. हा जसा देव-देवतांचा, सत्पुरुषांचा, नद्या-डोंगरांचा उत्सव, तसा कृषी संस्कृतीचा लोकोत्सव, आनंदसोहळा, एकोप्याचा धडा गिरवून घेणारा. पंचेंद्रियांची दिवाळीच! सगळे नाद, स्वाद, रंग, गंध इथं सामावलेले. दिवसभर राबणं खेड्यातल्या प्रत्येकाच्या पाचवीला पूजलेलं. बारोमास कष्ट. या सगळ्या बाया-बापड्यांना राबण्यातून सुटका मिळते, ती जत्रा-यात्रांच्या निमित्तानं. ग्रामीण संस्कृती आणि परंपरांची जपणूक होते, ती इथंच. काहीबाही विकणाऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळते आणि गावकुसातल्या कलावंतांना लोकाश्रय मिळतो, तोही इथंच.

खरं तर गावोगावच्या जत्रांचे वेध सुगी संपण्याआधीच लागतात. शेत-शिवारात पिकांच्या काढणीला जोर आलेला असतो. त्यात शेतकरी, शेतमजुरांची नुसती लगबग. त्याच उत्साही वातावरणात यात्रांची तयारी सुरू होते. तारीख ठरते शेतीच्या वेळापत्रकावर. घाटावरच्या यात्रा-जत्रा ठराविक तिथीलाच येतात, तर कोकणात तारखेसाठी कौल लावतात. काही यात्रा-जत्रा खरीप हंगामानंतर, तर बहुसंख्य सोहळे त्या-त्या भागातली वर्षाची सुगी संपल्यानंतर. उरूस मुस्लिम कॅलेंडरवर ठरतात. 

गावची जत्रा म्हटलं की, माहेरवाशिणी, नोकरी-व्यवसायासाठी बाहेरगावी असलेल्या गावकऱ्यांचं मन पाखरू होतं. ते जत्रेसाठी गावाकडं पळतं. खेड्यांतली सुख-दु:खं जत्रांना लगडलेली. सगळे समाज, सगळं गाव यांना सोबतीला घेऊनच यात्रा-जत्रा फुलतात, बहरतात. पूर्वजांनी पाहुणे-रावळे, आप्तेष्ट, मित्रमंडळींना एकत्र करून मनं मोकळी करण्याच्या, सुख-दु:खं वाटून घेण्याच्या, गोडाधोडाचं खाऊपिऊ घालण्याच्या या लोकसोहळ्याला, बाजारपेठेच्या हंगामाला धार्मिक जोड दिलेली. त्यानिमित्तानं ग्रामदैवताबद्दलची अपार कृतज्ञता  व्यक्त करता येते... त्यातला नवस फेडण्याचा, तोरण वाहण्याचा, गुलाल-भंडारा-खोबरं उधळण्याचा, पालखी-मिरवणुका, दंडवतांचा उपचार म्हणजे तर आपल्यावर देव नावाच्या राखणदाराचा वरदहस्त आहे, याचा दिलासाच!

जत्रेतली बाजारपेठ अख्ख्या पंचक्रोशीच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देते. खेडोपाडी तयार होणाऱ्या वस्तूंना गिऱ्हाईक देते. हळद-कुंकू, गुलाल-बुक्का, देव-देवतांच्या तसबिरीपासून मोबाईलपर्यंत आणि बायकांच्या कंगव्या-टिकल्यांपासून दागदागिन्यांपर्यंत सगळं काही मिळण्याचं ठिकाण म्हणजे गावची जत्रा. लहान-थोरांना मोठमोठाले आकाशपाळणे, फिरती चक्रं, नानाविध वस्तू, खेळण्यांची दुकानं, भेंडबत्ताशापासून जिलबीपर्यंत, भज्यापासून शेव-चिवड्यापर्यंत सगळ्याचंच अप्रूप!

जत्रा म्हटलं की तंबूतला आणि पारावरचा तमाशा, कलापथकं, दशावतारी खेळ, टुरिंग टॉकिजमधले चित्रपट, कुस्त्यांचे फड, बैलगाड्यांच्या शर्यती, भजन-प्रवचनं हे आपसूकच आलं. गावा-गावातल्या पैलवान, लोककलावंत, छोट्या व्यावसायिकांना यातूनच बळ मिळतं. अवघ्या आनंदाचं साधंसुधं आभाळ जत्रेवर सावली धरून असतं. 

कोल्हापूरजवळचा जोतिबा, जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची तुळजाभवानी, कोकणातल्या आंगणेवाडीची भराडीदेवी, नांदेडच्या माळेगावचा खंडोबा, ठाण्याचा हाजीमलंग, नाशिकची सप्तशृंगी, सौंदत्तीची यल्लम्मा, माहुरगडची रेणुका, औंढ्याचा नागनाथ, परळीचा वैजनाथ, शिखर शिंगणापूरचा शंभुमहादेव, मांढरदेवची काळुबाई, पालीचा खंडोबा, पाटणजवळचा नाईकबा, सोलापूरचा सिद्धरामेश्वर, आरेवाडीचा बिरोबा, यासोबतच अहमदनगरचे कानिफनाथ, पुसेगावचे सेवागिरी यांच्या लोकोत्सवाला गर्दी उसळते. कुणाची यात्रा एक-दोन दिवसांची, तर कुणाची दहा-दहा दिवस चालणारी. कोणाचे नैवेद्य गोडे, तर कोणाचे खारे. कोणाच्या सासनकाठ्या, तर कोणाच्या पालख्या आणि रथोत्सव! 

बदलत्या काळात जत्रांचं स्वरूप बदललं, पण रूढी-परंपरांची जपणूक आणि नवतेचा ध्यास कायम. जत्रेला जाणाऱ्या घुंगरांच्या बैलगाड्यांसोबत जीपगाड्या-आरामबसही आल्या. मेवामिठाईच्या दुकानात शेव-चिवड्यासोबत चायनिज पदार्थांचीही रेलचेल झाली. हातानं फिरवल्या जाणाऱ्या चक्रीपाळण्यांसोबत डोकं गरगरवणारी आधुनिक चक्रं आली. पण चार-आठ दिवस एकत्र येऊन लोकसोहळा साजरा करण्याची विशुद्ध भावना तीच राहिली. हे भारलेपण टिकून असल्यानंच गाववाला गावची जत्रा कधी चुकवत नाही. जत्रेचं रंगीबेरंगी आयुष्य जमेल तसं पदरात बांधतो आणि पुढच्या वर्षीच्या तारखेची हुरहूर मनात ठेवत कामाला लागतो...- श्रीनिवास नागे, वृत्तसंपादक, लोकमत, सांगली