रंगमंच - नाटकातील नाटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 07:00 IST2018-11-25T07:00:00+5:302018-11-25T07:00:06+5:30
‘एकदा भूमिकेत घुसलो की मी माझा राहत नाही’ वगैरे असल्या भंपक कल्पना घेऊन एखादा रंगमंचावर घुसला तर नाटकातील नाटकांना सामोरं जाणं त्याला अवघड जाईल हे निश्चित.

रंगमंच - नाटकातील नाटक
- योगेश सोमण-
माझ्या एका नाट्यप्रयोगात एका ब्लॅक आऊटला प्रमुख पुरुष पात्राला कपडे बदलायचे होते. सुरुवातीला घातलेला झब्बा परत घालायचा होता. ब्लॅकआऊट झाला, दहा सेकंदात कपडे बदलून कलाकार रंगमंचावर त्याच्या त्याच्या जागी उभा होता. प्रकाश आला आणि मी डोक्याला हात लावला. कलाकार झब्बा उलटा घालून आला होता. सुरुवातीच्या चेंजच्या वेळी जसा काढला तसाच त्यांनी घातला, त्यामुळे झब्बा उलटा घातला गेला होता. आता इथे नाटकातीलनाटक सुरू झालं, संपूर्ण प्रसंगात विंगेत जाऊन झब्बा परत घालायला वेळच नव्हता, त्यामुळे ‘असं काही घडलंच नाहीये’ अशा थाटात अभिनय सुरू झाला. प्रमुख नटीने प्रकाश आल्या आल्याच तोंडावर पदर घेतला होता, कारण झब्ब्याचे दोन्ही खिसे बाहेर लोंबत आहेत, गुंड्या आत गेल्यात हे बघून तिला हसू येणं स्वाभाविक आहे. त्याच प्रसंगात खिशातून चेकबुक काढून, वरच्या खिशातून पेन काढून सही करायची होती. कमाल कायिक अभिनय करीत जणू आपण रोज उलटाच झब्बा घालतो, असे भाव चेहºयावर ठेवत आमच्या नाटकातला हिरो जेव्हा खिशातून चेकबुक आणि पेन काढून सही करीत होता तेव्हा तो नट सोडून रंगमंच आणि प्रेक्षागृहात हास्याचे फवारे उडत होते. असेच हास्यकल्लोळ एखाद्या ऐतिहासिक नाटकात, कुणीतरी पंत शिवाजी महाराजांना ‘सॉरी’ म्हणतात किंवा हातात खलिता दिल्या दिल्या कोणी सरदार ‘किंवा थँक्स’ म्हणतो. मी पाहिलेल्या एका प्रयोगात मोरोपंत घाईघाईत रंगमंचावर आले ते डोळ्यावर चष्मा घालूनच आले. शिवाजीमहाराज, हंबीरराव या पात्रांना दाढी आणि मिशा असल्याने त्यांना हसू लपवता येत होतं, पण प्रेक्षक हसू लपवू शकत नव्हते. या अगदी नकळत, सहजगत्या होणाऱ्या चुका प्रेक्षकही तितक्याच दिलखुलासपणे स्वीकारतात, असा माझा अनुभव आहे. हीच तर नाटक या माध्यमाची ताकद आहे.
एका स्पर्धेला परीक्षक असतानाचा किस्सा, एका घरात पार्टी चालू असताना घरातल्या काम करणाऱ्या बाईचा खून होतो, ब्लॅकआऊट होतो. प्रकाश येतो तेव्हा पोलीस तपासकाम सुरू झालं असतं. रंगमंचावर खून होण्याच्या वेळी पात्रांची जशी रचना होती तशी सगळी पात्रं स्तब्ध उभी होती आणि स्पॉट जिथे पडला होता तिथे इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल उभे होते, पण अभिनयाच्या नादात जिचा खून झाला होता ती प्रेत म्हणून भलतीकडेच पडली होती, अंधारात. इन्स्पेक्टर तीन वेळा म्हणाला ‘इथे फारच अंधार आहे, प्रेत नीट दिसत नाहीये’ त्याला पुढचं बोलता येत नव्हतं, कारण त्याचे सगळे संवाद प्रेताच्या अवतीभवती होते. तरीही दोनदा तो प्रेतापर्यंत गेला आणि परत स्पॉटमध्ये येऊन संवाद बोलला. तिसऱ्या वेळी मात्र सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. तिसऱ्या वेळी इन्स्पेक्टर जेव्हा प्रेताच्या इथून स्पॉटमध्ये येऊ लागला तेव्हा अंधारात पडलेलं ते प्रेत आपण कुणालाच दिसत नाही आहोत, असं समजून हळूहळू सरकत स्पॉटमध्ये आलं. प्रेक्षकांचं हसणं वगैरे सगळं अंगावर घेऊन नाटक पुढे सुरू झालं आणि रंगलंही.. पण आजही नक्की प्रेताचा त्या किशामुळे तो प्रयोग त्यादिवशीच्या प्रेक्षकांमध्ये अजरामर झाला असणार.
आता माझ्यावरच गुजरलेला एक प्रसंग सांगतो आणि नाटकातील नाटकांवर पडदा टाकतो. विश्वास पाटील लिखित रणांगण या नाटकाची पुनर्निर्मिती पुण्यात केली गेली. त्याचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर (फर्जंदफेम) याने केले होते. त्यात मी सदाशिवरावभाऊची भूमिका करत होतो. माझ्या आठवणीनुसार आठवा वगैरे प्रयोग असेल. दुसरा अंक सुरू झाला होता. नाटकात एक प्रसंग असा आहे, की होळकरांकडील कारभारी लाच घेताना पकडले जातात आणि त्यांनी घेतलेली हंडाभर सुवर्णमुद्रांची लाच स्वत: मल्हारराव होळकर सदाशिवभाऊकडे सुपूर्त करतात. प्रसंग सुरू झाला, मी गंगोबा तात्यांना खडे बोल सुनावतो आहे, याचदरम्यान मल्हारबांनी पुढे येऊन तो हंडा मला द्यायचा होता, मल्हारबांचं काम करणारा कलाकार हंडा घेऊन एक पाऊल त्वेषाने पुढे आला आणि तिथेच थांबला. काहीतरी विचित्र घडल्याची जाणीव मलाही झाली. रंगमंचावर सन्नाटा. मल्हाररावांच्या सलवारीची नाडी तुटली होती. हंडा धरलेल्या दोन्ही हातांच्या कोपरांनी कंबरेपाशी मल्हाररावांनी निसटणारी सलवार बाहेरून रोखली होती, पण त्यांना पुढे सरकता येत नव्हतं. माझी आणि त्या कलाकाराची नजरानजर झाली. त्यानं मानेनेच ‘नाही, नाही’ असे खुणावले. त्याची अडचण मला समजली. क्षणभर काय करावं सुचेना. हंडा माझ्या हातात येईस्तवर प्रसंग पुढे घडणार नव्हता आणि दोन्ही हात वर करून माझ्या हातात हंडा देताना ‘त्या’ कलाकाराची सलवार सुटणार होती. नाटकातल्या या संकटाला सामोरं जाणं भाग होतं. तसेच संवाद म्हणत मल्हाररावांसमोर गेलो. ‘मल्हारराव हेच ते हंडे ना? तुमच्या कारभाऱ्यांच्या निमकहरामीचे पुरावे. बोला मल्हारबा बोला,’ असं म्हणून मीच त्याच्या हातून ते हंडे घेतले, गंगोबातात्यासमोर ठेवतो. पुढचा प्रसंग असा होता, की मल्हारराव तरातरा पुढे येतात आणि गंगोबांना चाबकाने फोडून काढतात. हे तर त्या दिवशीच्या प्रयोगात शक्यच नव्हतं. त्यामुळे मीच चाबूक घेतला आणि पुढचा प्रसंग आणि प्रयोग निभावून नेला. अगदी असाच प्रसंग चंद्रलेखेच्या रणांगणमध्येसुद्धा घडल्याचं ऐकिवात आहे, पण पात्र आणि प्रसंग वेगळा होता. या अशा अचानक अंगावर येणाऱ्या संकटांना कलाकार कसं तोंड देत असतील, असा विचार माझ्या मनात नेहमी येतो. मला वाटतं, कलाकारांना रंगमंचावर काम करत असताना एक सेन्स सतत सावध ठेवत असावा, जो अशा संकटांना तोंड देत असावा. यासाठी रंगमंचावरील सादरीकरण प्रेक्षकांना कितीही उत्स्फूर्त आणि जिवंत वाटत असेल, तरीही कलाकाराने सावध आणि जागृतपणेच सादर केले पाहिजे. ‘एकदा भूमिकेत घुसलो की मी माझा राहत नाही’ वगैरे असल्या भंपक कल्पना घेऊन एखादा रंगमंचावर घुसला तर नाटकातील नाटकांना सामोरं जाणं त्याला अवघड जाईल हे निश्चित. ... (उत्तरार्ध)