पुस्तकासाठी पैसे लावणारा ताे अज्ञात मित्र...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 13:17 IST2025-08-24T12:55:50+5:302025-08-24T13:17:48+5:30
तसे पाहिले तर हे पुस्तक हिंदी भाषेतले. त्याचा उद्देश मात्र नृत्याची भाषा वाचकांना समजावून सांगण्याचा आहे. ती कथा त्यामुळे सांगण्यासारखी आहे.

पुस्तकासाठी पैसे लावणारा ताे अज्ञात मित्र...
- रामदास भटकळ
तसे पाहिले तर हे पुस्तक हिंदी भाषेतले. त्याचा उद्देश मात्र नृत्याची भाषा वाचकांना समजावून सांगण्याचा आहे. ती कथा त्यामुळे सांगण्यासारखी आहे.
माझ्या लहानपणापासून मला संगीत, नृत्याची आवड. चिदानंद नगरकर हे माझे मामा. ते थोर दर्जाचे गायक तर होतेच, शिवाय लखनौला नृत्यही शिकले होते. त्यांचे गायन, संवादिनीवादन, तबलावादन आणि कथ्थक नृत्य हे सर्व मी माझ्या बालपणात पाहिले आहे. माझी भाची कांचन कुमठा ही पार्वतीकुमार यांच्याकडे भरतनाट्यम शिकताना मामा वरेरकर यांच्या घरी अनेकदा मी हजर असे. या कलांविषयी मला कुतूहल वाटावे इतपत मला त्यांचा परिचय होता. मी इंग्लंडमध्ये ज्या प्रकाशकाकडे प्रशिक्षण घेतले ते ‘टीच यूवरसेल्फ’ या नावाची मालिका प्रसिद्ध करत असत. निरनिराळ्या कलांविषयी आपणही ‘फॉर यू ॲण्ड मी’ अशा मालिकेत काही पुस्तके लिहून घ्यावी, अशी कल्पना आली.
दिल्लीत आमचे छोटेखानी ऑफिस होते. तिथे दिवसभर काम झाले की मी संध्याकाळी जवळच्या कथ्थक केंद्रात बिरजू महाराज आणि शाश्वती सेन यांच्याशी काव्यशास्त्रविनोद करायला जात असे. एकदा मी शाश्वती सेन यांना म्हटले की कथ्थकचा तुमचा दीर्घ अभ्यास आहे. तुम्ही देश-परदेशात कार्यक्रम करता. तुमचे चाहते तुम्हाला नाना तऱ्हेचे प्रश्न विचारत असतील. अशा प्रश्नांची उत्तरे देणारे पुस्तक तुम्ही आमच्यासाठी लिहाल का? त्या तयार झाल्या. सुरुवातीला माझ्या मनातील काही प्रश्न मी त्यांना सांगितले.
गुरु बिरजू महाराज यांची सेवा, कथ्थक केंद्राच्या व्यवस्थापनात मदत, स्वतःच्या कलेची जोपासना आणि जगभरचे दौरे यांमुळे त्यांना प्रत्यक्ष लेखन जमेना. याचप्रकारे पद्मा सुब्रमण्यम यांनाही मी भरतनाट्यमवर लिहायची विनंती केली त्यांचीही तशीच अडचण होती. अशात मला शाश्वती म्हणाल्या की त्यांना स्वतःला जमत नाही; पण पॉप्युलरला बिरजू महाराजांच्या लेखनात रस आहे का? अर्थातच हिंदीत. आम्ही हिंदी प्रकाशनात फारसे लक्ष घातले नव्हते. पण बिरजू महाराज यांच्याबद्दल अतीव आदर होता. विख्यात हिंदी कवी आणि समीक्षक अशोक वाजपेयी, जे भोपाळच्या भारतभवनचे निर्माते होते- त्यांनी लिहिल्यानुसार भरतनाट्यमचा इतिहास हा ‘बिरजू महाराज पूर्व’ आणि नंतरचे ‘बिरजू पर्व’ असा लिहावा लागेल, असे म्हणायचे. महाराजांसारख्या श्रेष्ठ कलावंताचे पुस्तक प्रसिद्ध करायला मिळणार म्हणून मी हुरळून गेलो.
बिंदादिन महाराज हे बिरजूंचे पूर्वज. बिरजू लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांचे शिक्षण लखनौ घराण्याशी परिचित अशा कपिला वात्सायन सारख्यांकडे झाले. बिंदादिन महाराज यांनी पाच हजार बंदिशी रचून त्यावर नृत्य केले असे म्हणतात. त्यांपैकी फक्त पंचाहत्तर बिरजूंपर्यंत आल्या. ते त्या उत्तम गायचे आणि नृत्याविष्कारही करायचे. ‘रसगुंजन’साठी त्यांनी बिंदादिन महाराजांच्या पंचवीस बंदिशी निवडल्या होत्या. त्यांचे भावार्थ आणि नृत्याविष्कारचे दर्शनी रूप त्यांना या पुस्तकात दाखवायचे होते. त्यांच्या परिवारातील कोणीतरी त्या पुस्तकाची सामान्य प्रकारची कच्ची प्रत - डमी तयार केली होती. या इतक्या मोठ्या कलाकाराचे पुस्तक अशा सर्वसामान्य रीतीने प्रसिद्ध करायला मन होईना.
मी त्यांना सुचवले की, हे पुस्तक तुमच्या इतमामाला शोभेल असे झाले पाहिजे. त्यासाठी खर्चही बराच येईल. तेव्हा काही तरी अनुदानाची व्यवस्था करूया. अशा रीतीने आर्थिक साहाय्यासाठी हात पसरण्याची सवय नसल्याने हे काम तसेच राहिले. ही दोघं कार्यक्रमासाठी मुंबईला आली असता त्यांचा मला फोन आला. त्यांना भेटायला जाताना ठरवले की आपण हात वर करून नामुष्कीची कबुली द्यायची. पोहोचलो तेव्हा स्वागत करून शाश्वती म्हणाल्या, ‘भटकलसाहेब अपना काम हो गया। अमरिका में आपका कोई दोस्त निकला जो अनुदान दे रहा है।’
तो कोण हे मला कधी कळलेच नाही. परंतु त्या आधारावर आम्ही कलकत्त्याहून एक उत्तम चित्रकर्तीला बोलावून घेतले. बाशुबी यांनी पुस्तकाची मांडणी अप्रतिम केली. त्यासाठी शाश्वती पॉप्युलरच्या कार्यालयात बरेच दिवस मुक्काम ठोकून होत्या. सारे काळजीपूर्वक केल्याने नृत्यशिक्षणाला उपयुक्त असे ‘रसगुंजन’ तयार झाले.
वास्तविक महाराजांनी स्वत: या बंदिशी गायलेल्या आणि त्यांनी केलेल्या नृत्याचे नमुने व्हिडिओच्या रूपाने देण्याचा इरादा तेव्हा शक्य झाला नाही. आताच्या ‘क्यूआर’ कोड तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले असते. आता महाराजांच्या स्वत:च्या बंदिशी अशा थाटात नृत्यबद्ध करायच्या आहेत.