talim in pune | पुण्यातील तालमी 
पुण्यातील तालमी 

अंकुश काकडे - 

१८०४ मध्ये स्थापन झालेली काशीगीर तालीम. काशीगीर यांना ४ मुले होती. थोरला खडेगीर, दुसरा काशीगीर, मुल्लफगीर हा तिसरा, तर धाकटा रणचुडा. या चौघांनीही मल्लविद्येसाठी अपार कष्ट घेतले. या चारही मुलांसाठी त्यांना चार वेगवेगळ्या तालमी बांधून दिल्या, त्यांचीच नावे या तालमींना देण्यात आली. स्वातंत्र्यानंतर अनेक पैलवान या तालमीत मेहनतीला येऊ लागले, त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो शंकरराव हांडे मास्तरांचा, त्यांच्या कारकिर्दीत अनेक मल्ल येथे तयार झाले, पण ज्यात अग्रेसर ठरले ते बबनराव डावरे, त्यांनी १९५६ मध्ये मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया) येथे ऑलिंपिंक स्पर्धेत भाग घेतला होता. पुढे हांडे गुरुजींनी बराच काळ तालीम संघाचे सेक्रेटरी म्हणून काम केले, त्यांची कुस्तीची कॉमेंट्री अतिशय श्रवणीय होती, मला ती ऐकण्याची संधी मिळाली आहे. १८३५ मध्ये पेशवाईतील प्रसिद्ध शाहीर होनाजी बाळा यांनी गवळी आळी तालीम स्थापन केली. किसन नाना मुगले यांनी स्वत:ची जागा तालमीला दिली. या तालमीचं वैशिष्ट्य सांगता येईल ते असे, की स्वातंत्र्यपूर्व काळात सेवादलाचे काम करीत, त्यामुळे त्यांना अच्युतराव पटवर्धन यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिले होते, लोकमान्य टिळकांनीदेखील या तालमीला भेट दिली होती. 
पुण्यात दुधाचा व्यवसाय फार मोठा होता. त्यामुळे उत्तरेतून अनेक अहिर गवळी पुण्यात व्यवसायासाठी आले. त्यातील पापा वस्ताद हे एक मोठे व्यापारी त्यांनी काही व्यापाºयांच्या मदतीने १८४५ मध्ये पापा वस्ताद तालीम सुरू केली, ती गुलामगीर बाबा या साधूचा मठ होता, त्या जागेत पापांच्या निधनानंतर शिवराम आणि सखाराम बीडकर यांच्याकडे सूत्रे आली, या जाडीने अनेक कुस्त्या मारल्या. लालू वस्ताद, शंकरलाल वस्ताद यांनीही या तालमीतून अनेक नामवंत मल्ल तयार केले, पण त्यात लक्षात राहणारी कुस्ती ठरली ती पाकिस्तानचा पैलवान सादिक पंजाबी याच्याविरुद्ध रामचंद्र बीडकर यांची, पण त्या काळात ही कुस्ती खूपच गाजली. कुस्तीला देशपातळीवर तसेच आशियाई, राष्ट्रकुल आणि आता ऑलिंपिक स्पर्धेत नेण्यात मोलाची कामगिरी बजावली असेल तर ती शरद पवार यांनी. भवानी पेठेत व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन १८७४ मध्ये जी तालीम बांधली ती म्हणजे गोकुळ वस्ताद तालीम. सध्या जेथे तालीम आहे, ते त्या काळी पुण्याचे पश्चिम प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाई, ज्याला आपण रामोशी गेट म्हणतो ह्या तालमीला ज्याचे नाव दिले, ते गोकुळ वस्ताद मूळचे जालना जिल्ह्यातील, व्यापारानिमित्त ते पुण्यात आले व पुण्यातील कुस्तीप्रेमाने भारावून गेले, पुढे ते या तालमीत पहिले वस्ताद झाले. त्यांनी आर्थिक मदत करून अनेक मल्ल तयार केले, त्याची नामावली फार मोठी आहे. गोकुळ वस्तादांच्या निधनानंतर तिची सूत्रे बाळोबा सखाराम म्हस्के यांच्याकडे आली, त्यांनी विश्वासराव डावरे, मारुतराव पोमण, माधवराव घुले, मोती मल्लाळ, पमणजी पिलाजी यांच्या मदतीने तालमीचे नूतनीकरण केले. निवृत्ती टेमगिरे, अप्पा परशे, शंकर आघाव, व्यंकट परशे इत्यादी वस्तादांनी तालमीची परंपरा पुढे नेली. रुस्तम-ए-हिंंद पैलवान हरिश्चंद्र बिराजदार पुण्यात याच तालमीत मुक्कामाला असत, त्यांचेही मार्गदर्शन तालमीतील पैलवानांना मिळत असे, विशेषत: मॅटवरील कुस्तीचे त्यांनी अनेकांना प्रशिक्षण दिले. याच बिराजदारांनी पहिल्यांदाच सादिक पंजाबी याला कुस्तीत अस्मान दाखविले होते, त्यापूर्वी सादिक पंजाबीने भारतातील अनेक मोठमोठ्या मल्लांना अस्मान दाखविले होते, सादिक पंजाबीचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या ३, ४ मिनिटांत ते चितपट कुस्ती करत. असा हा पैलवान पूर्ण शाकाहारी होता.गोविंंद हलवाई चौकात असलेली मोहनलाल वस्ताद तालीम हीदेखील १८२४ मध्ये सुरू झाली. पुढे तालमीची जागा छोटी पडू लागली, म्हणून मोहनलाल यांनी भाऊ सीताराम यांना नवा आखाडा तयार करून दिला व अशा २ तालमी तयार झाल्या. त्यात मोहनलाल यांच्या तालमीला थोरली तर सीताराम यांच्या तालमीला धाकटी असे म्हटले जाई. या तालमीच्यासंदर्भात मोठा किस्सा आहे, कुरुंदवाड महाराज अनेक कुस्त्यांचे मैदान भरवत, त्यांच्या दरबारी अनेक पैलवान होते, त्यातीलच हलवाई नावाच्या महाराजांच्या आवडत्या पैलवानांशी मोहनलाल यांची कुस्ती झाली, ती अतिशय चुरशीची झाली व त्यात मोहनलाल विजयी झाले, त्यावर महाराजांनी खूश होऊन मोहनलाल यांना काय इनाम हवे असे विचारले, पण गडबडीत मोहनलाल चुकीचे काही तरी बोलले, झाले महाराजांना तो अपमान वाटला, त्यांनी इनाम देणे तर बाजूलाच, पण मोहनलाल यांनाच नजरकैदेत ठेवले, ही वार्ता पुण्यात कळली तेव्हा सीताराम वस्ताद हे कुरुंदवाड येथे गेले. त्यांनी दरबारात कुस्तीचे आव्हान दिले, दरबाराच्यावतीने आप्पा या पैलवानाशी सीताराम यांची कुस्ती झाली, डोळ्याचे पारणे फिटावे, अशी कुस्ती झाली आणि ती सीताराम यांनी मारली, हे पाहून महाराजही आनंदित झाले, महाराजांनी सीताराम यांना इनाम विचारले, तर त्यांनी सांगीतले, दुसरे-तिसरे काही नको, पण मोहनलाल यांना नजरकैदेतून सोडा, महाराजांनी ते मान्य केले, दोघा बंधूंचा सत्कार करून त्यांचा गौरव केला. या तालमीतील पैलवानांची नामावली फार मोठी आहे, तसेच अनेक वस्तादांनीदेखील त्यात मोलाची भर घातली आहे.(क्रमश: ) 
(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)


Web Title: talim in pune
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.