मायेची ऊब देणारे सेवाधाम; संत श्री दोला महाराज वृद्धाश्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 08:00 IST2018-11-25T08:00:00+5:302018-11-25T08:00:06+5:30

मानवी संवेदना हरवत असताना मायेची ऊब देणारं उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रम वंचित निराधार वृद्धांचा आसरा बनले असून समाजमनाला अंतर्मुख करायला लावणारे सेवाधाम आहे.

SevaDham, which gives you warmth feel; Sant Shri Dola Maharaj Vriddhashram | मायेची ऊब देणारे सेवाधाम; संत श्री दोला महाराज वृद्धाश्रम

मायेची ऊब देणारे सेवाधाम; संत श्री दोला महाराज वृद्धाश्रम

नागपूर
सुनील आरेकर
आज इंटरनेटच्या युगात कुटुंबसंस्था उद्ध्वस्त होतानाचे चित्र दुर्दैवाने पाहायला मिळते. नात्यागोत्यांमधील जिव्हाळा आटत चाललाय. भौतिक सुखाच्या आसक्तीपायी रक्ताचे नाते असलेली जीवाभावाची माणसं एकमेकांचे वैरी बनताहेत . मानवी संवेदना हरवत असताना मायेची ऊब देणारं उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रम वंचित निराधार वृद्धांचा आसरा बनले असून समाजमनाला अंतर्मुख करायला लावणारे सेवाधाम आहे.
यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यातील उमरी पठार हे आडवळणावर वसलेले छोटे गाव. फारशा सोयी उपलब्ध नसलेल्या या पठारावर शेतकरी कुटुंबातील सेवाव्रती शेषराव डोंगरे या ध्येयवेड्याने सेवेचा मळा फुलविला. ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम उभारला. तरुण वयापासूनच शेषराव डोंगरे गावात सामाजिक उपक्र म राबवायचे. त्यांची धडपड पाहून ग्रामस्थांनी विश्वास टाकून ऐन तारु ण्यात सरपंचपदाची जबाबदारी सोपविली. सन १९९१मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी ह. रा. कुलकर्णी यांचे उपस्थितीत उमरी पठार येथे युवा नेतृत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील काही वृद्धांनी जिल्हाधिकारी यांचेजवळ कौटुंबिक विवंचना कथन केली. प्रत्येकाची कहाणी हृदयाला भिडणारी होती. तेव्हा त्यांनी वृद्धाश्रमाची संकल्पना मांडली. सदर शिबिर शेषराव डोंगरे यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉर्इंट ठरले. शेषराव डोंगरे यांनी वृद्धांच्या सेवेचे कंकण हाती बांधले. गावातील निराधार वृद्धांची आयुष्याच्या सायंकाळी आबाळ होत असल्याची वेदना मनात होती. म्हातारपण पिकल्या पानासरखं.कधीही गळू शकतं. अखेरच्या क्षणी गात्र थकलेल्या वृद्धांना हवी असते आधार, मायेची उब. त्या वंचित वृद्धांना आधार देण्यासाठी २ आॅक्टोबर १९९१ रोजी मागास समाज उत्कर्ष शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत संत श्री दोला महाराज वृद्धाश्रम उदयास आला. २५ वृद्धांची परवानगी मिळाली. वृद्धाश्रमाचा खडतर प्रवास सुरू झाला. गावातील संवेदनशील व्यक्तिमत्त्व जनकलाल जयस्वाल व शंकर तलमले यांच्या घरी अन्नधान्य गोळा करून शेषराव डोंगरे वृद्धांची सेवा करू लागले. दरम्यान आर्णीतील प्रेमचंद अग्रवाल यांनी अर्धा एकर जागा विकत घेऊन त्यावर दहा खोल्यांचे बांधकाम करून दिले. दिवसागणिक वृद्धांची संख्या वाढू लागली. १४ वृद्धांना घेऊन सुरू झालेले सेवाधाम ९० वृद्धांचा आसरा बनला. जागा अपुरी पडू लागली. हा डोलारा सांभाळताना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. शेषराव डोंगरे यांनी शेत,बैलजोडी विकून पत्नीचे दागिने गहाण ठेवत सर्वस्व पणाला लावले. दरम्यान कठीण प्रसंगी संस्थेचे सुरेश राठी व अ‍ॅड. जयंत नंदापुरे यांनी डोंगरे यांना वेळोवेळी धीर दिला.त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. वृध्दाश्रमासाठी लोणी येथील डॉ. प्रजय चौधरी यांनी दान केलेली एक एकर जमीन आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे प्रमुख तथा माजी खासदार विजयबाबू दर्डा यांनी इमारत बांधकामासाठी उपलब्ध करून दिलेल्या दहा लाख रुपयांच्या निधीतून निर्माण हॉलचे नुकतेच लोकार्पण झाले. दुसऱ्या हॉलचे बांधकाम अनेक दानशूरांच्या मदतीने करण्यात आले असून डॉ. सुधा राठी व गोपाल कोठारी यांच्या दातृत्वातून स्नानगृह व शौचालय पूर्णत्वास आले. नियमित वृद्धाश्रमाची वारी करणारे ग्रामसेवक संजय दुधे यांनी जाळीचे कम्पाऊंड अर्पण केले. शेषराव डोंगरे यांचा त्याग, समर्पण पाहून अनेक दानशूर वारकरी या मानवतेच्या मंदिरात सेवा देतात. विविध सणांसह शैक्षणिक सहल, वाढदिवस, तेरवी, भजन, आरोग्य शिबिरे आदी उपक्र म राबविले जातात. आजवर दोन तपांची वाटचाल करीत २७ वर्षाच्या प्रवासात ७०० वृद्धांचा सांभाळ केला. २३० वृद्धांच्या नेत्र शस्त्रक्रि या व ३२ वृद्धांच्या हाडाचे आॅपरेशन करण्यात आले.

Web Title: SevaDham, which gives you warmth feel; Sant Shri Dola Maharaj Vriddhashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.