शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

एक आठवण न्यूयॉर्कच्या गणपतीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 07:10 IST

सन 1973 मध्ये न्यू यॉर्कमध्ये गणपतीचा उत्सव अनुभवला त्याबद्दलची एक आठवण्..

-नंदा मराठे

सन 1973. अमेरिकेत आल्याआल्याचा पहिलाच गणेशोत्सव. भिंतीवर तेव्हा कालनिर्णय नसायचं. भारतात, घरी फोनही नसायचे. परवडायचं नाही पहिल्या 3 मिनिटांचे 12 डॉलर आणि पुढच्या प्रत्येक मिनिटाला 3 डॉलर खर्च करणं. पण कुणाच्या तरी घरचं 2-3 आठवड्यापूर्वी भारतातून निघालेलं अंतर्देशीय पत्न आलेलं असायचं आणि त्याबरोबर येऊ घातलेल्या सणाची वर्दी यायची.

अमेरिकेतली आमची पहिलीच गणेशचतुर्थी होती त्यावर्षी. भारत सोडताना छोटासा गणराय हातातल्या पर्समध्ये बसून आला होता आमच्या बरोबर. त्यालाच हळद-कुंकू, एखादं फूल वाहून दूधसाखरेचा नैवेद्य दाखवून आरती म्हणून स्वागत करणार होतो आम्ही बाप्पाचं. रटगर्स युनिव्हर्सिटीमधले आमच्यासारखेच नवीन आलेले मित्र - मैत्रिणी आले असते वीकेण्डला. 

..पण अचानक न्यूयॉर्क महाराष्ट्र मंडळातून फोन आला त्या वेळच्या अध्यक्षांचा. ‘मंडळाचा गणपती आहे शनिवारी. नक्की यायचं बरं का कार्यक्र माला’- असा अगदी प्रेमळ आग्रह आणि ‘तुला बटाट्याची भाजी जमेलका करायला? 20 जणांना पुरेल इतकी भाजी आणायचीय..’- अशी अगदी हक्काची मागणी. बस. संवाद एवढाच!

तेव्हा न्यूयॉर्क ते न्यू जर्सी असा इंटरस्टेट कॉल होता तो. पैसे पडायचे त्यासाठी. इतक्या आग्रहाचं आमंत्र ण आणि आपल्या गणपतीबाप्पाचा उत्सव, तोसुद्धा या परक्या देशात! मी नाही गेले आणि बटाट्याची भाजी कमी पडली तर? ..पण 20 जणांची भाजी? किती लागतील बटाटे?

घरी होणा-या डोहाळजेवण, मंगळागौरी, बारशी अशा कार्यक्र मांच्या आधी इन्नी, दोन्ही काकू, तिन्ही आत्त्यांचे संवाद लक्षात होते.. माणशी एक बटाटा धरायचा, दोन-चार जास्ती घ्यायचे, मेली चार माणसं जास्त आली तर कमी नको पडायला! 

चिलीज, टरमरिक, मस्टर्ड, क्यूमिन, कोरिअंडर (म्हणजे धने! कोथिंबिरीचं पानसुद्धा नव्हतं मिळत बघायला तेव्हाच्या अमेरिकेत; कढीलिंब तर दूरच) हे सगळं साहित्य मिळायचं पाथमार्कमध्ये. पण हिंग आणि उडदाच्या डाळीचं काय? एकही इंडियन दुकान नव्हतं अख्ख्या न्यू जर्सीमध्ये. 

..पण ठीक आहे. हिंगाला सुटी आणि यलो स्प्लिट पीज चालतील. त्याचंच तर वरण करतो आपण भाताबरोबर. थोडी थोडी करत पाच-सहा तासांत पंचवीस बटाट्याची भाजी झाली एकदाची.

 भारतातून येताना तीन-चार मोजक्या ठेवणीतल्या साड्या आणि यांनी एकच सूट आणलेला असल्यामुळे तयार व्हायला फार वेळ लागायचा नाही तेव्हा. कुणाबरोबर गेलो ते आठवत नाही पण वेळेवर पोचलो कार्यक्रमाला. गेल्याबरोबर भाजीचा ट्रे दिला कुणाच्या तरी हातात. इतक्या मोठय़ा प्रमाणात पहिल्यांदाच केली होती भाजी. ज्याच्या पानात पडेल त्याला आवडेल न नक्की, अशी भीती होतीच मनात. 

- पण ज्यानं घेतली त्यानं, मी केलेली ती भाजी एका मोठय़ा पातेल्यात आधीच्या साठलेल्या भाजीत मिसळून टाकली. मग आरती, जेवणं अगदी उत्साहात पार पडलं. 

उरलेला दिवस, माझी भाषा बोलणा-या, माझ्यासारख्याच नवीन, परक्या देशात हरवलेल्या अनोळखी लोकांबरोबर घराच्या, गावाकडच्या गप्पा मारण्यात कुठे निघून गेला ते कळलंच नाही.

बघता बघता संकोचाच्या, परकेपणाच्या भिंती नाहीशा झाल्या आणि या परक्या देशात, त्या परक्या लोकांशी मनामनांच नातं जन्मभरासाठी जोडूनच आम्ही तिथून परतलो. 

- असा आमचा अमेरिकेतला पहिला गणेशोत्सव! तिथं पंचपक्वान्नांची ताटं नव्हती, नजरबंदी करणारी, झगमगणारी आरास नव्हती, फुलांच्या राशी नव्हत्या. होता फक्त आपलं घर, आपली माती-माणसं सोडून दूर देशी आलेल्या लेकरांसाठी आपला वरदहस्त उभारून पद्मासनात बसलेला, शांत, निवांत, भक्तचिंतामणी मोरया. गेली 44 वर्ष काळजी वाहिली त्यानं अमेरिकेत आलेल्या आमच्या पहिल्या पिढीची, दुस-या पिढीची, आता तिसरी पिढी इथे वाढायला लागली तरी आम्ही बोलावतो अजून त्याला आणि तो येतच राहतो दरवर्षी. आता आम्ही तिकडच्यासारखीच इकडेसुद्धा त्याच्या स्वागताची, त्याच्या पाहुणचाराची, सजावट, नैवेद्य, मनोरंजन सगळ्याची कशी धमाल उडवून देतो. त्या सगळ्या गर्दीत, फुलांच्या सजावटीच्या मखरात आजसुद्धा तो मला तितकाच प्रसन्न दिसतो. 

..पण त्याच्या समोर हात जोडून उभं राहिलं की मिटलेल्या डोळ्यांपुढे न्यूयॉर्कचा तो बाप्पाच दिसतो..  बाजूला समईचा मंद प्रकाश, समोर संथपणे तेवणारं निरांजन.. आणि शांत, निवांत वरदमूर्ती!

(लेखिका गेली पंचेचाळीस वर्षं अमेरिकेत वास्तव्याला आहेत)  

nandaprudential@yahoo.com