निमित्त- पुण्यातील पेठांमधील उरुस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 07:00 IST2019-06-02T07:00:00+5:302019-06-02T07:00:13+5:30
पुण्यात वेगवेगळ्या पेठांमध्ये वर्षानुवर्षे अशा यात्रा होतात. अर्थात, त्याला आपण उरूस असे म्हणतो. साधारणत: चैत्र-वैशाख महिन्यांत हे उरूस साजरे होतात. त्याविषयी...

निमित्त- पुण्यातील पेठांमधील उरुस
- अंकुश काकडे -
कसबा पेठेतच भैरवनाथाचा उरूस हा चैत्री पौर्णिमेला होतो. कसबा पेठेतून पालखी वाजतगाजत झेडपीजवळील बोलाई मंदिरात जाते, तेथून परत कसबा पेठेत येते, सुरुवातीच्या काळात रमेश बोडके, बाळासाहेब लडकत, अशोक लडकत वगैरे मंडळी पुढे होती. आता गेली काही वर्षे ‘वेंकटेश हॅचरीज’चे बालाजी राव या उरुसाला मदत करतात. जयसिंंग भोसले यांनी सव्वा किलो चांदीच्या पादुका भैरवनाथचरणी अर्पण केल्यात. इतर कुठे न दिसणारा अघडा-भगडा हा फक्त येथील उरुसातच आपणास पाहावयास मिळतो.
मुंढवा येथे वैशाख द्वितीयेला तेथील भैरवनाथाचा उरुस हा २५०-३०० वर्षांपासून सुरू आहे असे सांगतात. तेथील भैरवनाथाचं मंदिर हे हेमाडपंती आहे, असे सांगण्यात येते. पारंपरिक पहाटे काकड आरती, भैरवनाथाला अभिषेक अशी उरुसाची सुरुवात होऊन पारंपरिक पालखी, छबिना, ढोल-लेझीम, रात्री तमाशा, दुसरे दिवशी दुपारपर्यंत चालू असतो. त्यानंतर ३ वाजता सुरू होणाऱ्या कुस्त्या रात्री ८-९ वाजेपर्यंत असतात. आजही तमाशा-कुस्त्या चालू आहेत, फक्त छबिन्यात ढोल लेझीमच्या ऐवजी बँड असतो.
फार जुन्या मंडळींनी त्यात कै. आनंदराव, जयवंतराव, यशवंतराव, गायकवाड मंडळी, सखाराम, शिवराम हे कोद्रे, भगवंतराव, देवराम हे लोणकर तसेच रामभाऊ, राजाराम, वामन ही जगताप मंडळी आघाडीवर होती. आता कैलास मामा, बाळासाहेब कोद्रे, रायबा गायकवाड ही मंडळी उरूस भरवतात; पण तरुण मंडळी मात्र एवढी सक्रिय होत नाहीत, ही खंत बाळासाहेब कोद्रे यांनी बोलून दाखवली. बिबवेवाडीतील पद्मावती देवीचा उरुस हादेखील शेकडो वर्षांपासून होत आहे, असे जाणकार सांगतात. तेथे पूर्वी अरण्या होते, येथे शंकर महाराज ध्यानधारणा करण्यासाठी येत असत अशी आख्यायिका आहे. देवीची पालखी गावात फिरून मंदिरात येते. या उरुसाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे तमाशा होत नाही, इतर पारंपरिक ढोल-लेझीम, कुस्त्या मात्र आजही होतात. सखाराम, तुळशीराम, नारायण, एकनाथ ही बिबवे मंडळी, निवृत्ती जागडे, गव्हाणे इत्यादी मंडळींनी पद्मावती देवीचा उरूस परंपरा सुरू ठेवली. देवीला नैवेद्य पुरणपोळीचा पण आलेले पाहुणे मंडळी तिखटाचं जेवण करूनच परत जात. जेथे आज गाडगीळ उद्यान आहे, तेथे पूर्वी गरम पाण्याचे तळे होते. तेथे अंघोळ केल्यावर त्वचेचे रोग बरे होत, असे सुनील बिबवे हे आजही अधिकारवाणीने सांगतात. अशीही पुणे शहरातील उरुसाची परंपरा आहे, तरुण पिढीला त्याची माहिती व्हावी म्हणून काही जाणकारांकडून माहिती घेऊन सांगितली आहे, त्यात कमी-जास्तपणा असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
(उत्तरार्ध)
(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)