मर्डर मिस्ट्री
By Admin | Updated: September 5, 2015 15:43 IST2015-09-05T15:43:24+5:302015-09-05T15:43:24+5:30
शीना बोरा हत्त्या प्रकरणानं सध्या सारेच चक्रावले आहेत.पण अशा किती कहाण्या, किती खुनी रहस्यकथा पोलिसांकडे नोंदवल्या जातात? काय होतं त्यांचं? पोलीस त्याचा माग कसा घेतात? अशाच काही गूढ मृत्यूंच्या शोधाचा हा थरारक आढावा..

मर्डर मिस्ट्री
रवींद्र राऊळ
पंधरा वर्षापूर्वीची घटना. सत्तरच्या दशकात ‘हसते जख्म’, ‘हकीकत’ अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांत भूमिका करणारी नामांकित अभिनेत्री प्रिया राजवंश हिने तिच्या जुहू येथील रुईया पार्कमधील आलिशान बंगल्यात आत्महत्त्या केल्याची बातमी वृत्तपत्रंमध्ये प्रसिद्ध झाली आणि तिचे चाहते कमालीचे हळहळले. दुस:या दिवशी मात्र तिचा मृत्यू हार्ट अॅटॅकने झाल्याचं वृत्त पसरलं. त्याचवेळी नैराश्यातून अतिमद्यपान केल्यानेच मृत्यू झाल्याच्या वावडय़ाही पसरल्या. आठवडाभरानंतर जे सत्य बाहेर आलं ते पाहून सारेचजण हबकले. प्रिया राजवंशच्या सावत्र मुलांनी पद्धतशीरपणो कट रचून तिची सुपारी देत गळा दाबून हत्त्या केल्याचा कट पोलिसांनी उघडकीस आणला. या दोन सावत्र मुलांसह त्यांची मोलकरीण आणि तिच्या साथीदारालाही अटक केली. पोलिसांनी महत्प्रयासाने उघडकीस आणलेली ही एक मर्डर मिस्ट्री.
अलीकडेच दोन वर्षानी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेली शीना बोरा मर्डर केस आणि तिच्या आईसह तिघा आरोपींना केलेली अटक यामुळे मर्डर मिस्ट्री हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
1964 ते 1986 अशी सलग बावीस वर्षे हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रिया राजवंश चित्रपटनिर्माता चेतन आनंद यांची दुसरी पत्नी. चेतन आनंद हे अभिनेते देव आनंद आणि विजय आनंद यांचे बंधू. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर चेतन आनंद प्रिया राजवंशसोबतच राहत. 1997 मध्ये चेतन आनंद यांचं निधन झाल्यानंतर प्रिया राजवंश सावत्र मुलांसह रुईया पार्क येथील त्यांच्या बंगल्यातच राहू लागली. चेतन आनंद यांच्या संपत्तीत तिचा एक तृतीयांश वाटा होता. प्रिया राजवंश मृतावस्थेत आढळल्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. पहिल्या अहवालानंतर पोलिसांनी प्रियाने आत्महत्त्या केल्याचा दावा केला. मात्र दुस:या पोस्टमार्टेम अहवालात तिच्या डोक्यावर कठीण वस्तूने प्रहार करून तिची हत्त्या झाल्याचं निश्चित झालं. सावत्र मुलांना बंगला विकायचा होता. प्रॉपर्टीतील वाटा द्यावा लागू नये म्हणून चेतन आनंदचे मुलगे केतन आणि विवेक आनंद यांनी आपल्या सावत्र आईची सुपारी देऊन हत्त्या केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला. ही सुपारी मोलकरीण आणि तिच्या साथीदाराने घेतल्याच्या आरोपावरून त्यांनाही अटक करण्यात आली. ते दोघे हत्त्या करत असताना केतन आणि विवेक बंगल्यातच टीव्ही पाहत होते, असं पोलिसांचं म्हणणं. अवघ्या आठवडाभरातच उघडकीस आलेली ही मर्डर मिस्ट्री.
पण काही हत्त्या मात्र उघड होण्यास वर्षानुवर्षे कशी जातात हे दाखवणारी एक सत्यघटना. कुर्ला येथे पानपट्टी चालवणारा खैरू पानवाला एके दिवशी मित्रसोबत मद्यपान करण्यासाठी जवळच्या एका बारमध्ये पोहोचला. तेथे बसण्यासाठी टेबल शोधत असतानाच एका अंधा:या कोप:यात बसून ब:यापैकी ङिांगलेला एकजण स्वत:शीच बरळला, ‘‘देखो, अपनी माशुका के मरद को जान से मारकर अब कैसे जंटलमन बन के घुम रहा है.’’ एवढंच बोलून तो इसम समोरचा ग्लास उलचून त्यातील मद्य रिचवू लागला. पण त्याचं ते वाक्य पलीकडच्या टेबलावर बसलेल्या पोलिसांच्या खब:याने टिपलं होतं. त्याने पोलिसांना तो प्रसंग ऐकवला. पोलिसांनी कान टवकारले.
खैरू पानवाला विवाहित असूनही त्याच्या दुकानाशेजारच्या इमारतीत राहणा:या सायरुनिसा या महिलेशी अनैतिक संबंध ठेवून असल्याची माहिती पोलिसांनी काढली तेव्हा सायरुनिसाचा पती अब्दुल कयूम तब्बल नऊ वर्षापासून बेपत्ता असल्याचाही तपशील हाती आला. पोलिसांनी जुन्या मिसिंग तक्रार रजिस्टरवरची धूळ झाडली तेव्हा नऊ वर्षापूर्वी ती तक्रार दाखल असल्याचं आढळलं. पोलिसांनी खब:यांकडून अधिक माहिती काढली तेव्हा अब्दुल कयूम मिसिंग असल्यापासून खैरू पानवाला त्याच्या पत्नीसोबत संबंध ठेवून राहत असल्याचं समजलं.
सारी माहिती गोळा केल्यानंतर पोलिसांनी एके दिवशी खैरू पानवाल्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. पोलिसांनी खैरू पानवाल्याला पकडल्याचं समजताच अब्दुल कयूमचा विशीतील मुलगाही पोलीस ठाण्यात पोहोचला आणि आपले वडील हरवल्यापासून खैरू अंकलनीच आपल्याला खूप मदत केल्याचं पोलिसांना सांगू लागला. पण पोलिसांनी खैरूची पाठ सोडली नाही. अखेर तो फुटलाच. पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध करणा:या कयूमला खैरू आणि सायरुनिसा या दोघांनी घरातच अतिशय निघृणपणो मारलं होतं. हत्त्येनंतर रात्रभरात मृतदेहाचे अनेक तुकडे करून ते गोण्यांमध्ये भरले आणि गुपचूप जवळच्या निर्जन दलदलीच्या जागेत टाकून दिले. दुस:या दिवशी नवरा बेपत्ता झाल्याचं सांगत सायरुनिसाने बिल्डिंग डोक्यावर घेतली. काही दिवस शोध घेत पोलिसांनी प्रकरण फाईलबंद केलं.
आता नऊ वर्षानंतर त्या ठिकाणी मृतदेहाचे अवशेष सापडतात का हे पाहण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी पोहचले तेव्हा ती जागा पाहून त्यांच्या पोटात गोळाच आला. कारण या नऊ वर्षाच्या कालावधीत महापालिकेने त्या जागेवर भर टाकून झकासपैकी मैदान तयार केलं होतं. पोलिसांनी 27 मजूर लावून ते संपूर्ण मैदान खणून काढलं. खोदकाम करून माती चार पोलीस शिपायांसमोर चाळून काही हाडं मिळतात का, हे पाहणं सुरू झालं. काही फूट खोदकाम होताच पाणी लागलं. ते उपसण्यासाठी पंप लावला. रात्र होताच फ्लड लाईट लावून काम सुरू ठेवण्यात आलं. दुसरीकडे बघ्यांची गर्दी हटवण्याचं कामही पोलिसांना करावं लागत होतं. दोन दिवसांच्या मेहनतीनंतर 54 हाडं पोलिसांच्या हाती आली. त्यात अब्दुलच्या बरगडय़ाची मणक्याची हाडं आणि कवटीचा एक भाग आणि एक दात होता. जे. जे. हॉस्पिटलच्या शरीरशास्त्रतज्ज्ञांनी ते अवशेष मानवाचेच असल्याचा अहवाल दिल्यानंतर खैरू पानवाला आणि सायरुनिसाविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं.
‘पुलीस के सामने गढे हुये मुर्देभी बोलते है’ असं म्हणतात. खुनाला कधी ना कधी वाचा फुटतेच. कारण मृतदेह सापडला की ती आत्महत्त्या आहे की अपघात की हत्त्या हे पोलिसांकडून पाहिलं जातं. तो खून असल्याचं स्पष्ट झालं की पोलीस अधिकच कामाला लागतात. मृतदेह मैदान, तलाव, नदी, रस्ता अशा मोकळ्या सार्वजनिक ठिकाणी सापडला असेल तर सर्वप्रथम त्याची ओळख पटवली जाते. मृताची ओळख पटवणारी व्यक्ती स्वत:हून पुढे आली तर तपास काहीसा सोपा होतो. नाही तर पोलिसांना सायास घ्यावे लागतात. कुणा हरवलेल्या व्यक्तीशी त्या मृतदेहाचं वर्णन जुळतं का? कुणी बेपत्ता आहे का याचा शोध घ्यावा लागतो. हरवलेल्या व्यक्तीशी मृताचं वर्णन जुळलं तर पोलीस सुटकेचा नि:श्वास सोडतात. कारण जर हरवल्याची तक्रारच नसेल तर ओळख पटवणं आणखीनच अवघड.
अनेकदा मृत्यू अनैसर्गिक असला तरी नेमकं कारण शोधणं पोलिसांसाठी आव्हान ठरतं. कारण विषप्राशनाने मृत्यू झालेला असेल तर त्या व्यक्तीने स्वत:हून विष प्यायलं की त्याला कुणी बळजबरीने विष पाजलंय, याचा शोध घ्यावा लागतो. कारण अशावेळी ती आत्महत्त्या की हत्त्या हा प्रश्न असतो. पण जर गळा चिरून हत्त्या असेल तर कुणी स्वत:च गळा चिरून आत्महत्त्या करणं जवळजवळ अशक्यच. मग ती हत्त्याच. अशी गृहीतकं लक्षात घेत तसंच परिस्थिती आणि वस्तुस्थितीचा वेध घेत तपासकाम पुढे रेटावं लागतं.
हत्त्येचा प्रकार असेल तर मृताची ओळख पटवणं आणखीनच महत्त्वाचं ठरतं. कारण ओळख पटली तरच मारेक:यांर्पयत पोहोचणं सोपं होतं. नाहीतर खून ‘पचण्याचीच’ शक्यता अधिक. मृताची ओळख पटली की त्याच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जातात. आरोपी शोधून काढण्यासाठी ते महत्त्वाचे ठरतात. कारण आरोपी शोधायचे तर आधी हत्त्येमागचा उद्देश (मोटिव्ह) शोधावा लागतो. अनेकदा या जबाबातून हत्त्येमागील कारण समजतं. बहुतांशी पूर्ववैमनस्य, अनैतिक संबंध, व्यसन आणि पैसे अथवा मालमत्ता यातलंच कुठलं तरी एक कारण खुनामागे असतं. पोलिसांच्या भाषेत सांगायचं तर रम, रमा आणि रमी यापैकीच काहीतरी कारण असतं.
कुटुंबीयांनीच दिशाभूल केल्याचा अनुभवही पोलिसांना अनेकदा येतो. कुटुंबातीलच पती, पत्नी, भाऊ वा अन्य नातेवाईक असं कुणीतरी हत्त्येमागे असतं. ते पोलिसांना चुकीची माहिती देतात. तपास भरकटत जातो. अशावेळी मृताची कौटुंबिक पाश्र्वभूमी, मित्रपरिवार यांची माहिती घेत आरोपींभोवती जाळं टाकावं लागतं.
संगीतकार जतीन-ललित आणि अभिनेत्री विजयेता पंडित, सुलक्षणा पंडित यांची बहीण संध्या सिंग यांची हत्त्या अशाच प्रकारात मोडणारी. नवी मुंबईत राहणा:या पन्नाशीतील संध्या सिंग 13 डिसेंबर 2012 रोजी गायब झाल्या. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या कुटुंबीयांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. 28 जानेवारी 2013 ला काही ब्रिटिश पक्षीनिरीक्षक पाम बीच येथील खाडीत पक्षी निरीक्षणासाठी गेले असता त्यांना कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसला. दुस:या दिवशी मृतदेहालगत सापडलेल्या चीजवस्तूंवरून तो मृतदेह संध्या सिंग यांचा असल्याचं निष्पन्न झालं. चौकशीदरम्यान संध्या सिंग यांचा मुलगा रघुवीर सिंग याने चुकीची आणि संशयास्पद माहिती पोलिसांना दिली. व्यसनाधीन असलेल्या रघुवीर सिंगवरचा पोलिसांचा संशय बळावला. दरम्यान, संध्या सिंग यांचे पती जयप्रकाश सिंग यांनी या हत्त्येमागे एका पोलीस अधिका:याचा हात असल्याचा आरोप करीत तो अधिकारी संध्या सिंग यांच्याची परिचित असल्याचे पोलिसांना सांगितले. हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे सोपवण्यात यावं अशी मागणी पंडित कुटुंबाने केल्याने गृह विभागाने ते प्रकरण मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडे सोपवलं. पोलिसांनी रघुवीरला दोषी धरलं. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी रघुवीरने मोठी न्यायालयीन लढत दिली. मात्र पोलिसांना त्याचा ताबा मिळालाच.
हे सारं झालं सर्वसामान्य आणि सेलिब्रिटींच्या बाबतीत. आता पोलिसांचं पाहू. जानेवारी 2003 मध्ये घाटकोपर येथे बेस्ट बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागी असल्याच्या आरोपावरून मुंबईतील एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिका:यांनी सय्यद युनुस ख्वाजा या परभणीतील सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली होती. चौकशीदरम्यान त्याला मुंबईबाहेर नेत असताना पोलीस जीपला झालेल्या अपघाताचा फायदा घेत तो पळून गेल्याचं पोलिसांनी जाहीर केलं. पुढे युनुस ख्वाजाच्या आईने उच्च न्यायालयात हेबीयस कॉर्पस दाखल केला. कालांतराने त्याच्या हत्त्येचा गुन्हा दाखल होऊन पोलीस अधिका:यांना अटकही झाली. चौकशीदरम्यान युनुस ख्वाजाचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृतदेहावर मुंबईनजीकच्या एका गावात अंत्यसंस्कार आटोपून पोलिसांवर तो पळून गेल्याचा आरोप ठेवण्यात आला. आरोपीच्या पिंज:यात असलेल्या पोलीस अधिका:यांनी त्याचा इन्कारही केला. पण हत्त्येचा गुन्हा दाखल झाला तर मृतदेहाचं नेमकं काय झालं, त्याचे अवशेष का शोधले नाहीत याबाबत तपास अधिकारी कायमचे मौन बाळगून आहेत.
अशा किती कहाण्या, त्यातल्या काहींचं गूढ उकलतं, काही मात्र गूढ बनून राहतात. कायमच!
मृतदेह आढळला की
पोलीस काय करतात?
कुठेही मृतदेह सापडला की सर्वप्रथम पोलिसांना त्याबाबत क्रिमिनल प्रोसिजर कोड (फौजदारी दंड संहिता) म्हणजेच सीआरपीसी 174 अन्वये अपमृत्यू अर्थात अकस्मात मृत्यूची नोंद करावी लागते. घटनास्थळी पंचनामा करून तो मृतदेह ताब्यात घेतला जातो. त्या मृतदेहावर जखमा आहेत का? घटनास्थळी कोणत्या आक्षेपार्ह वस्तू आढळल्या का? याची तपशीलवार नोंद होते. त्या मृत व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक आहे की अनैसर्गिक (कॉज ऑफ डेथ) हे जाणून घेण्यासाठी तो मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवावा लागतो. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये डॉक्टर त्या व्यक्तीचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे नमूद करतात. विषबाधेने, गळा दाबून, भोसकून की हार्टअॅटॅकसारख्या नैसर्गिक कारणाने हे त्यातून समजते. जर नैसर्गिक मृत्यू असेल तर कार्यकारी दंडाधिका:यांचे अधिकार असलेल्या त्या विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांसमोर त्या प्रकरणाची सुनावणी होऊन ते तेथेच संपतं. अनैसर्गिक मृत्यू असेल तर मात्र पोस्टमार्टेम अहवालात त्याचं नेमकं कारण काय, हे ध्यानात घेऊन पुढील तपासाला सुरुवात करावी लागते ती हत्त्येचा गुन्हा दाखल करूनच. प्रथमदर्शनी मृत्यू अनैसर्गिक असल्याचं आढळल्यास बहुतांशी पोलीस त्या व्यक्तीची ओळख पटवून तपासाला तातडीने सुरुवात करतात. कारण त्या व्यक्तीची पाश्र्वभूमी, हत्त्येमागील कारण, संशयित कोण हे उघड करण्यास मदत करीत असते. म्हणजेच पोलीस परिस्थितीजन्य पुराव्यावरून तपास वेगाने पुढे नेत असतात.
दिव्या भारती नावाचं गूढ
काही प्रकरणं मात्र कायमच्या मिस्ट्री बनून राहतात. अवघ्या 19व्या वर्षी नावारूपाला येत असलेली अभिनेत्री दिव्या भारती हिचाही मृत्यू अशाच प्रकारातला. बावीस वर्षापूर्वी दिव्या भारतीचा ती राहत असलेल्या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. त्यावेळी ती मद्याच्या अंमलाखाली होती. ती फाईल पुढे पोलिसांनी बंद केली. पण तिने आत्महत्त्या केली की तिला कुणी ढककलं, हे अद्यापी गूढच आहे. तिच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त करणारी वेगवेगळी चर्चा अजूनही बॉलिवूडमध्ये सुरू आहे.
खून पचतात का?
खुनासारखं कृत्य पचून जाण्याचे प्रकार घडतात का? कमी प्रकरणात का होईना, काही मारेकरी कधीच जगासमोर येत नाहीत. ती हत्त्या कायमची मिस्ट्री बनून राहते. जर मृताचे आणि आरोपीचे संबंध अन्य कुणाला ठाऊक नसतील, साक्षीदार नसतील तर आरोपी पोलिसांच्या रडारवर येणं अशक्य होऊन बसतं. मग अटक कुणाला करणार? ओळख न पटलेल्या मृत व्यक्तीच्या मारेक:यांर्पयत पोहोचणंही पोलिसांना कठीण होऊन बसतं.
कधीतरी लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमध्ये मृतदेह ठेवलेली सुटकेस आढळते. ती सुटकेस कुठल्या स्थानकातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आली हे पोलिसांना ठाऊक नसतं. मृताची ओळख पटवेल असा पुरावा मृतदेहावर नसतो. अशावेळी त्या वर्णनाची व्यक्ती हरवल्याची नोंद कुठे आहे का, याचा शोध घ्यावा लागतो. कोणताही क्ल्यू नसताना कौशल्यपूर्ण तपास करीत मृताची ओळख पटवणं आणि आरोपींना गजाआड करणं अशी दिव्य कामगिरी पोलीस बजावताना दिसतात. पण कुणी पाठपुरावा करणारा नातेवाईक नसेल तर मृताची ओळख पटणार कशी? अशा शेकडो अनडिटेक्ट मर्डर केसेस पोलिसांकडे फाईलबंद होतात. ‘मृत्यू अनैसर्गिक, पण गुन्हा निष्पन्न होत नाही’, असा शेरा त्यावर मारला जातो.
प्रयोग थेलियम नायट्रेटचा
कोपरखैरणो येथे राहणा:या धडधाकट राजेंद्रसिंग अव्वल यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उलटय़ा होऊ लागल्या. सारं अंग ठणकत होतं. डोकं गरगरू लागलं. एसी असलेल्या नर्सिग होममध्ये उपचार घेताना तर प्रकृती सुधारण्याऐवजी ती आणखीनच बिघडू लागली. दोन - तीन दिवसांत डोक्यावरचे, दाढीचे केस गळू लागले. मानसिक संतुलन ढासळलं. काही दिवसांनी तर त्यांचे ओठ फुटले आणि त्यातून रक्त ठिबकू लागलं. अखेर राजेंद्रसिंग यांना थेलियम नायट्रेट या विषामुळे हा त्रस होत असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. कर्जाऊ दिलेली रक्कम परत मागत असल्याच्या रागाने एका इसमाने त्यांना शीतपेयातून हे विष पाजलं होतं. राजेंद्रसिंग यांच्याप्रमाणोच एका महिलेसह आणखी दोघांना त्याने हे विष पाजलं होतं. त्यात त्या महिलेचा मृत्यूही झाला. पुढे आरोपीला अटक झाली तेव्हा उघडकीस आलेली माहिती धक्कादायक होती. एका इंग्रजी टीव्ही मालिका मेडिकल डिटेक्टीव्हजमध्ये थेलियम नायट्रेटच्या विषप्रयोगाची सत्यघटना पाहून आरोपीने हा कट रचला होता. भारतात कुठेही उपलब्ध नसणारं हे विषारी रसायन त्याने एका एजंटची दिशाभूल करून आयात केलं होतं. जर थेलियम नायट्रेटने विषबाधा झाल्याचं निदान झालं नसतं तर स्लो पॉयझनिंगचा प्रकार कुणाला कळलाही नसता आणि आरोपी मोकाटच राहिला असता.
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत मुख्य वार्ताहर आहेत.)
ravirawool@gmail.com