भंडारा जिल्ह्यात खिळेमुक्त वृक्ष मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 06:00 IST2019-02-10T06:00:00+5:302019-02-10T06:00:08+5:30
भंडारा शहरातील संवेदनशील तरुणांनी खिळेमुक्त वृक्ष अभियान हाती घेतले आहे. शेकडो वृक्षांवर ठोकलेले खिळे काढण्याचा उपक्रम सुरु आहे.

भंडारा जिल्ह्यात खिळेमुक्त वृक्ष मोहिम
ज्ञानेश्वर मुंदे
प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक डॉ. जगदिशचंद्र बोस यांनी वृक्षांना संवेदना असतात, हे सिद्ध केले. वृक्ष सजीव तर असतातच पण महत्वाचे म्हणजे वृक्ष प्राणवायू देतात. पर्यावरण संतुलनात वृक्षांचा वाटा मोठा आहे. जाहिरातबाजीचे साधन म्हणून वृक्षांची होणारी दुरवस्था वेळीच रोखली नाही तर पर्यावरणाचे संतुलन ढासाळायला वेळ लागणार नाही.
संवेदनशील मनाला जसे शब्द बोचतात तसेच वृक्षाला खिळे. जाहिरातबाजीच्या नादात वृक्षांवर खिळे ठोकले जातात. खिळे वृक्षवाढीसाठी बाधा पोहचवितात. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा शहरातील संवेदनशील तरुणांनी खिळेमुक्त वृक्ष अभियान हाती घेतले आहे. शेकडो वृक्षांवर ठोकलेले खिळे काढण्याचा उपक्रम सुरु आहे. बॅनर, पोस्टर्स लावताना हमखास खिळ्यांचा उपयोग केला जातो. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपले पोस्टर, बॅनर्स ठिकठिकाणी खिळ्याने ठोकतो. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा येथील खुशी बहुउद्देशिय संस्था, युवा जनकल्याण आणि पुणे येथील आंघोळीची गोळी या संस्थेने वृक्ष संवर्धन उपक्रम हाती घेतला आहे. भंडारा शहरात सात महिन्यांपूर्वी भंडारा येथील पर्यावरणप्रेमी राजेश राऊत यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम सुरु झाली. एक हातोडी आणि जंबोरा घेऊन ते आपल्या सहकाऱ्यांसह शहरातील झाडांवर ठोकलेले खिळे काढतात. शहरातीलच नव्हे तर राज्य मार्गावरील आणि राष्ट्रीय महामार्गावरील अनेक झाडे खिळेमुक्त आणि वेदनामुक्त झाली आहेत. पाहायला गेले तर झाडाचे खिळे काढणे खुप छोटे काम. परंतु यासाठीही कुणी पुढाकार घेत नाही. शहरातील नागरिकांनी आपला केवळ अर्धा तास दिला तरी शेकडो झाडे खिळेमुक्त होऊन बहरतील.
राज्यात २२ जिल्ह्यात खिळेमुक्त वृक्ष अभियान स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबविली जात आहे. यात भंडारा अग्रेसर आहे. शहरातील सुमारे २०० पर्यावरणप्रेमी या मोहीमेत सहभागी झाले आहे. त्यात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. शेकडो वृक्षांना ठोकलेले खिळे काढून पर्यावरणाचे जतन केले जात आहे. आपण एखाद्या वृक्षाला खिळा ठोकतो तेव्हा ‘ऊती’च्या कार्यात अडथळा निर्माण होतो. अनेकदा ऊतीचे विघटन होते. सुमारे दहा खिळे एका वृक्षाला ठोकल्यास वृक्ष मारण्यास पुरेसे स्ट्रक्चरल आणि आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ शकतात. खिळ्यामुळे पडलेले छिद्र म्हणजे वृक्षाची एकप्रकारे जखमच असते. यातून वृक्षांचे आयुष्य घटते.