जवळपास ५००० लोकांची स्वाक्षरी घेण्याचा छंद जोपासणारा कौस्तुभ साठे; जाणून घेऊया त्याचा 'सही' प्रवास! 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 30, 2022 12:16 PM2022-10-30T12:16:20+5:302022-10-30T12:18:28+5:30

एक तरी छंद जोपासावा असे म्हणतात, त्यामुळे आपले जगणे समृद्ध होते; अशाच अनुभवाबद्दल सांगत आहेत ठाण्याचे कौस्तुभ!

Kaustubh Sathe, who enjoys the hobby of collecting signatures of nearly 5000 people; Let's know his 'signature' journey! | जवळपास ५००० लोकांची स्वाक्षरी घेण्याचा छंद जोपासणारा कौस्तुभ साठे; जाणून घेऊया त्याचा 'सही' प्रवास! 

जवळपास ५००० लोकांची स्वाक्षरी घेण्याचा छंद जोपासणारा कौस्तुभ साठे; जाणून घेऊया त्याचा 'सही' प्रवास! 

Next

>> ज्योत्स्ना गाडगीळ

आपण आयुष्यात कितीतरी लोकांना भेटतो. पण मोजक्याच व्यक्ती स्मरणात राहतात. मात्र तुमच्या आयुष्यात संस्मरणीय व्यक्ती आल्या तर त्यांची नोंद कशी ठेवता येईल, या विचाराने प्रेरित होऊन ठाण्याच्या कौस्तुभ साठे या तरुणाने तब्बल चार हजारांहून अधिक नामवंतांच्या स्वाक्षरी गोळा केल्या आहेत. चोवीस वर्षे सातत्याने जोपासलेल्या या छंदातून त्याचा जीवनप्रवास कसा समृद्ध झाला ते जाणून घेऊ!

भौतिक शास्त्रात एमएससी झालेला कौस्तुभ मुंबई विद्यापीठात तिसरा आला होता. एका फार्मा कंपनीत आयटी क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत असूनही त्याने संगीत, साहित्य, क्रीडा, बॉलिवूड, हॉलिवूड अशा हर तऱ्हेच्या क्षेत्रातील मंडळींची भेट घेतली व आठवण म्हणून स्वाक्षरी आणि त्यांच्यासमवेत फोटो घेतले आहेत. प्रत्येक क्षेत्रातील नामवंतांची भेट, त्यांना जाणून घेण्याची धडपड, त्यांच्या भेटीचे मोजके क्षण परिस्पर्शासारखे आपल्या जीवनाचे सोने करून गेले, असे कौस्तुभ सांगतो. 

लता, आशा, बाबासाहेब पुरंदरे, सचिन, सुनील गावस्कर, ओ.पी. नय्यर, शम्मी कपूर, मन्नाडे, बिस्मिल्ला खां, झाकीर हुसेन, जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर,आर.के. लक्ष्मण ही नावं माहीत नसतील असा विरळाच! पण कौस्तुभ या सर्वांना भेटला-बोलला आहे, याबद्दल त्याच्या नशिबाचा हेवा वाटतो. अर्थात अशा दिग्गजांच्या भेटी मिळवण्यासाठी त्याने अनेक खस्ता खाल्ल्या तो भाग निराळा, पण त्याची मेहनत फलद्रुप झाली आणि तो 'सही' माणूस बनला! या प्रवासात चार जणांची स्वाक्षरी घेण्याची संधी हुकली याबद्दल तो हळहळ व्यक्त करतो. डॉ. एपीजे. अब्दुल कलाम, माधुरी दीक्षित, बाळासाहेब ठाकरे आणि रतन टाटा! त्यातही रतन टाटांशी हस्तांदोलन करण्याची संधी मिळाली, हे भाग्यच! त्याचा हा छंद पाहून अनेक लोकांनी  त्यांच्याकडे संग्रहित असलेल्या स्वाक्षरी कौस्तुभला भेट म्हणून दिल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर, सी.डी. देशमुख, गदिमा, माणिक वर्मा यांच्या स्वाक्षरीची भर पडल्यामुळे कौस्तुभचा खजिना समृद्ध झाला. 

स्वाक्षरी प्रदर्शनाचा अनुभव घेणारे रसिक आणि त्या प्रवासाबद्दल सांगणारा कौस्तुभ
स्वाक्षरी प्रदर्शनाचा अनुभव घेणारे रसिक आणि त्या प्रवासाबद्दल सांगणारा कौस्तुभ

अशा चार हजाराहून अधिक लोकांच्या भेटीची आठवण, त्यांच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या लोकांची साखळी आणि आजवर आलेले अनुभव लोकांना कळावेत, म्हणून कौस्तुभ स्वाक्षरीचे प्रदर्शन आणि भेटीचे किस्से सांगणारा कार्यक्रम सादर करतो. लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. आजवर ठाणे, पुणे, नाशिक परिसरात ५००० हून अधिक लोकांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली आहे.
 
हजारो स्वाक्षरीचा संग्रह करणारे महाराष्ट्रात पंधरा जण आहेत, कौस्तुभ त्यातलाच एक! कलावंतांनी क्षणात केलेली 'सही' एखाद्याचे आयुष्य एवढे 'सही' करत असेल, हा अनुभव खरोखरच 'सही' म्हटला पाहिजे, 'सही' है ना?

Web Title: Kaustubh Sathe, who enjoys the hobby of collecting signatures of nearly 5000 people; Let's know his 'signature' journey!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.