‘मी’चे गाठोडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:48 PM2018-06-10T13:48:39+5:302018-06-10T13:48:39+5:30

अमेरिकेत मायदेशी माणूस भेटला की माझ्यातील ‘मी भारतीय’ प्रकट होतो. काहीवेळा ‘मी पुरुष’ तर काहीवेळा ‘मी माणूस’ असतो.

'I' gottles! | ‘मी’चे गाठोडे!

‘मी’चे गाठोडे!

Next

डॉ. यश वेलणकर|

‘मी’ म्हणजे काय?
चेन्नईत कुणी मराठी माणूस दिसला की माझ्यातील ‘मी मराठी’ जागा होतो. अमेरिकेत मायदेशी माणूस भेटला की माझ्यातील ‘मी भारतीय’ प्रकट होतो. काहीवेळा ‘मी पुरुष’ तर काहीवेळा ‘मी माणूस’ असतो. एखाद्या संदर्भातला ‘मी’ कधीतरी अपयशी होतो. ते दु:ख तो सर्वव्यापी करून टाकतो. कोणी एखादा ‘मी’ आयुष्य संपवतो, तेही याचमुळे..



माणूस रिकामा बसलेला असताना त्याच्या मनात असंख्य विचार येत असतात. त्यावेळी त्याच्या मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्क सक्रीय असते. आपले मन भूतकाळातील स्मृतीत किंवा भविष्यातील स्वप्नात भटकत असते त्यावेळी येणारे बरेचसे विचार हे ‘मी’शीच संबंधित असतात. हा मी स्वप्नातही जागाच असतो म्हणून स्वप्नेदेखील ‘मी’च्याच दृष्टिकोनातून असतात.
स्वप्नात असंख्य माणसे दिसतात; पण आपण स्वत:ला स्वप्नात पाहत नाही. माझे रूप मला माझ्या स्वप्नात दिसत नाही. कारण स्वप्ने मी पाहत असतो, ‘मी’च्या स्वास्थ्याची ती गरज असते. या ‘मी’चे दर्शन मेंदूतदेखील होते. डिफॉल्ट मोड नेटवर्कमधील पोस्टेरिअल सिंग्यूलेट कॉर्टेक्स आणि मेडिअल प्रीफ्रण्टल कॉर्टेक्स हे दोन भाग ‘मी’शी निगडित आहेत असे आढळले आहे.
मेंदूचे परीक्षण करताना ‘मी’चा विचार आणणारा प्रश्न विचारला की हे भाग सक्रीय होतात असे दिसून येते. ‘मी’ची आठवण होण्याची शक्यता नसलेले एखादे गणित सोडवताना मात्र हे भाग शांत असतात. अल्झायमर झालेल्या ज्या रुग्णांना ‘मी’चे भान नसते त्यांच्या मेंदूतील हे भाग काम करीत नसतात. त्यावरून मेंदूच्या याच भागात ‘मी’ची जाणीव असावी असा निष्कर्ष काढता येतो, पण ह्या ‘मी’मध्ये नक्की कशा कशाचा अंतर्भाव होतो? सजगतेच्या अभ्यासात ‘मी’ विषयीची सजगता महत्त्वाची असते. माइंडफुलनेस थेरपीमध्ये ‘संदर्भानुसार मी’ची जाणीव करून देणे फार महत्त्वाचे असते.
संदर्भानुसार मी म्हणजे काय? मी आपटलो असे आपण म्हणतो. त्यावेळी मी हा शब्द शरीराला उद्देशून असतो. मला वाईट वाटले या वाक्यात ‘मी’ मनाला म्हणत असतो. शरीरमनाबरोबरच या शरीरमनाशी निगडित अनेक गोष्टी ‘मी’मध्ये समाविष्ट होत असतात. चेन्नईमध्ये फिरत असताना कुणी मराठी बोलणारा माणूस पाहिला की माझ्यातील ‘मी मराठी’ जागा होतो. अमेरिकेत असताना कुणी कन्नड माणूस भेटला की माझ्यातील ‘मी भारतीय’ प्रकट होतो. काहीवेळा ‘मी पुरुष’ अशी जाणीव असते तर काहीवेळा ‘मी माणूस’ हाही भाव असतो. म्हणजेच माझ्यातील मी हा संदर्भानुसार बदलत असतो, संदर्भानुसार व्यक्त होत असतो. ‘मी’ ही एकच गोष्ट नसून ती अनेक गोष्टींचे एक गाठोडे असते.
या गाठोड्यात इतरही अनेक गोष्टी असतात. ‘मी’ कुणाचा तरी बाप असतो, कुणाचा नवरा असतो, कुणाचा मित्र असतो, कुणाचा मुलगा असतो. प्रत्येक नात्याचा एक ‘मी’ असतो. माझे काम, माझा व्यवसाय हादेखील एक मी असतो. मी डॉक्टर आहे, मी सायकोथेरपिस्ट आहे, मी लेखक आहे याची जाणीव असते.
मला महत्त्वाच्या वाटणाऱ्या मूल्यांचा समावेशदेखील या ‘मी’च्या गाठोड्यात होत असतो. मी स्वच्छताप्रिय आहे, मी रसिक आहे, मी चोखंदळ आहे, मी प्रेमळ आहे इत्यादी. माझी मते, माझे विचार हेदेखील ‘मी’चा भाग होऊन जातात. ‘मी’च्या या गाठोड्यात काय काय आहे याची नोंद घेणे, त्याचे भान वाढवणे हा सजगतेच्या अभ्यासातील एक महत्त्वाचा भाग असतो. हे भान जागवणे खूप महत्त्वाचे आहे. आज औदासीन्य हा आजार वेगाने वाढत असताना ‘मी’ हे एक गाठोडे आहे, त्यातील वेगवेगळा मी संदर्भानुसार महत्त्वाचा ठरतो हे भान हा आजार टाळायला उपयोगी ठरू शकते. ‘मी’ची सजगता ही डिप्रेशन प्रतिबंधक लस आहे असे म्हणता येईल. कारण डिप्रेशनसारख्या आजारात हे भान हरवलेले असते.
एखादा तरुण प्रेमभंग झाल्याने निराश होतो, आत्महत्या करायला प्रवृत्त होतो. त्यावेळी त्या मुलीचा प्रेमिक हा एकच मी त्याचे भावविश्व व्यापून टाकत असतो. मी मुलगा, मी भाऊ, मी मराठी, मी इंजिनिअर हे त्याच्या ‘मी’च्या गाठोड्यातील अन्य घटक विस्मरणात गेलेले असतात.
‘प्रेमिक मी’ अपयशी झाला म्हणून इतके तीव्र दु:ख होते की आयुष्यात काहीच अर्थ नाही असे वाटू लागते. अशावेळी मी हा केवळ ‘प्रेमिक मी’ नसून ते एक गाठोडे आहे याची सजगता असेल तर नैराश्याची तीव्रता कमी होते. तो तरुण त्या मानसिक धक्क्यातून सावरतो, शिक्षण, करिअर याला महत्त्व देऊ लागतो. बºयाचदा माणसाचे अपयश एकावेळी एका ‘मी’शी संबंधित असते. त्याला परीक्षेत किंवा व्यवसायात किंवा एखाद्या नातेसंबंधात अपयश आलेले असते. तो माणूस ते अपयश, ते दु:ख सर्वव्यापी करून टाकतो. त्यामुळे मानसिक वेदना अधिक होतात.
शारीरिक वेदनांची तीव्रता कमी करण्यासाठी सजगतेने संपूर्ण शरीरावर लक्ष दिले, ओपन अटेन्शन ठेवले की वेदनेची तीव्रता कमी होऊ लागते. सजगतेने शरीरावरील संवेदना पाहत असताना गुडघा दुखत असेल तर वेदना कोठे सुरू होतात आणि कोठपर्यंत पसरतात हे जाणू लागलो, कोठे वेदना नाही आहेत हे पाहू लागलो आणि जे काही जाणवते आहे त्याचा स्वीकार करू लागलो की गुडघेदुखीची तीव्रता कमी होऊ लागते. गुडघा दुखतो आहे; पण पोटरीत दुखत नाही आहे आणि मांडीही दुखत नाही आहे हे भान आले की गुडघेदुखीचे दु:ख कमी होऊ लागते.
शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर आपले लक्ष सतत तेथेच जात असते, त्यामुळे त्या वेदना अधिक त्रासदायक होतात. हे लक्ष संपूर्ण शरीरावर ठेवले, ते विस्तारित केले की दुखणारा भाग तुलनेने लहान होतो. फोकस्ड अटेन्शन हे टॉर्चच्या प्रकाशझोतासारखे असते, ते छोट्या भागावर केंद्रित असते. ओपन अटेन्शन हे खोलीतील दिव्यासारखे असते. त्या दिव्याच्या प्रकाशात खोलीतील सर्व आसमंत दिसू लागतो. असेच अटेन्शनचेही आहे. शारीरिक वेदनांचे दु:ख कमी करण्यासाठी संपूर्ण शरीरावर ओपन अटेन्शनचा अभ्यास उपयुक्त ठरतो. तसेच मानसिक दु:ख कमी करण्यासाठी ‘मी’च्या गाठोड्यावर ओपन अटेन्शन ठेवणे उपयोगी ठरते. पण त्यासाठी ‘मी’ ही एक गोष्ट नसून ते अनेक गोष्टींचा समावेश असलेले एक गाठोडे आहे याचे भान विकसित करावे लागते. ते विकसित होऊ लागले की आत्ता माझ्यातील कोणता ‘मी’ प्रकट होतो आहे हे आपले आपल्याला जाणवू लागते. ते जाणवू लागले की समोरील आपल्याशी बोलणाºया व्यक्तीतील कोणता ‘मी’ बोलतो आहे याचाही अंदाज आपण बांधू शकतो. त्यामुळे मला महत्त्वाची वाटणारी मूल्ये सर्वांना तेवढीच महत्त्वाची वाटायला हवीत हा दुराग्रह कमी होऊ लागतो. त्यामुळे आपले नातेसंबंधही अधिक चांगले होऊ लागतात. प्रत्येक नात्यातील वेगळ्या ‘मी’ची भूमिका अधिक चांगली रंगवता येते.

(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)

Web Title: 'I' gottles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य