शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

जर्मनीच्या जिम्नॅस्ट्स आणि झाकलेले पाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 06:05 IST

जर्मन जिम्नॅस्टिक्स संघाची सदस्य जिम्नॅस्ट सारा वोस म्हणते, "आम्ही ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाय झाकणारा पोशाख घातला, कारण..."

ठळक मुद्देएकूणातच क्रीडांगणावरच्या स्त्रियांचा संघर्ष सोपा नाही. अत्यंत नाजूक अशा एका विषयाला जर्मनीच्या जिम्नॅस्ट्स मुलींनी तोंड फोडले, हे महत्त्वाचे!

- भक्ती चपळगावकर

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या जर्मनीच्या महिला जिम्नॅस्ट्सनी केलेल्या एक कृतीने जगभरातल्या खेळजगतात खळबळ उडाली. ही कृती कोणती? तर मांड्या आणि जांघा उघड्या टाकणारा पोशाख न घालता त्यांनी पाय झाकणारा पोशाख घातला. २१ व्या शतकातल्या बायकांनी केलेली ही इतकी किरकोळ कृती क्रांतिकारी मानली जात आहे.

टेनिस खेळताना, बॅडमिंटन खेळताना स्कर्ट ऐवजी शॉर्ट्स मुलींना सुटसुटीत वाटत असतील, पण मग त्या मुली आहेत हे कसं ठळक होईल? म्हणून त्यांनी स्कर्ट्सच घातले पाहिजेत, असे नियम पुरुषसत्ताक जगाने उघडउघड केले आहेत. खेळांचे प्रक्षेपण करणाऱ्या माध्यमांना महिलांचे खेळ अधिक ‘देखणे’ करायचे असल्याने या विचारसरणीला आव्हान द्यायला कोणी पुढे येत नाही, त्यामुळे चार खेळाडू मुली "आम्ही धार्मिक कारण नसतानाही मांड्या उघड्या टाकणार नाही", असे सांगतात तेव्हा त्याची जागतिक बातमी बनते. त्याचबरोबर युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये बिकिनी न घालता शॉर्ट्स घालून खेळणाऱ्या नॉर्वेच्या महिला बीच हॉलिबॉल टीमला दंड होतो.

बाईने खेळताना कसे दिसले पाहिजे हे २१व्या शतकातले पुरुष सुध्दा सांगतात याची ही उदाहरणे आहेत. बाई आहे, बाई सुंदर दिसली पाहिजे, तिने अंग दाखवले पाहिजे, तिच्या हालचालीत तिच्या खेळातील कौशल्यापेक्षा किंवा कौशल्याबरोबरच तिचा कमनीय बांधा दिसला पाहिजे. पुरुषांचा खेळ म्हणजे कसा ‘मर्दानी’ असला पाहिजे, खेळणारा गडी कसा ताकदवान, बलदंड हवा. बाई खेळताना मात्र तिच्या अंगावरचे केस दिसायला नकोत, तिच्या हालचाली आकर्षक हव्यात असे महिला आणि पुरुषांच्या खेळांना जोखणारे नियम जगाने बनवले.

एकोणीसशे पन्नासच्या दशकानंतर स्त्रियांच्या खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून बुरसटला. कदाचित खेळाच्या स्पर्धांचे टीव्हीवरून प्रक्षेपण व्हायला लागले आणि ही प्रवृत्ती वाढली.

या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या महिला जर्मन जिम्नॅस्टिक्स संघाची सदस्य, जिम्नॅस्ट सारा वोस बीबीसी रेडिओला दिलेल्या मुलाखतीत म्हटते, ‘आम्ही पाय झाकणारा पोशाख घातला म्हणजे सगळ्यांनी घालावा असे माझे मत नाही. हा प्रश्न निर्णय स्वातंत्र्याचा आहे. मला जर माझे अंग झाकायचे असेल तर तो अधिकार मला हवा.’ सारा म्हणते, लहान लहान मुली जेव्हा तोकडे कपडे घालून खेळाच्या सरावासाठी येतात तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेची पालकांनाही चिंता वाटते. साराने केलेल्या या ‘क्रांतिकारी कृती’मुळे त्यांना हुरूप आला आहे. जर्मन खेळाडूंच्या या कृतीनंतर अनेक देशांतल्या खेळाडू आपले अनुभव सांगत आहेत. काही जणींनी सांगितले की जिम्नॅस्ट घालतात ते कपडे खूप तोकडे असतात. त्यांच्या हालचाली मोकळ्या व्हाव्यात म्हणून ते तसे असतात असे त्यांना सांगितले जाते, पण ते खरे नाही. सरावाच्या वेळी काही वेळा कपडे सरकतात आणि खेळाडूंसाठी ही फार नामुष्की बनते.

स्त्रीला स्त्री म्हणून न बघता एक लैंगिक आकर्षणाची वस्तू म्हणून बघणे म्हणजे सेक्शुअलायझेशन. टोकियो ऑलिम्पिकमध्ये या प्रश्नावर चर्चा सुरू झाल्यावर या प्रश्नाची दखल आयोजकांना घ्यावी लागली. ऑलिम्पिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेसचे प्रमुख यियान्नी एक्सारको म्हणाले, ‘या ऑलिम्पिक कव्हरेजमध्ये या आधीसारखे चित्रिकरण होणार नाही. स्त्रियांच्या शरीराचे क्लोजअप्स दाखवले जाणार नाहीत.’

- अर्थात्, त्यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे मूळ प्रश्नावर काही तोडगा निघत नाही. स्त्री आणि पुरुष यांच्या खेळाचे स्वरूप सारखे असले, तरी बहुतेक सगळ्या खेळांमध्ये पुरुषांना पाय झाकणाऱ्या शॉर्ट्स, पॅंन्टस, ढगळे सुटसुटीत कपडे घालण्याची परवानगी आहे. पण स्त्रियांना ती नाही. फक्त धार्मिक कारणांमुळे स्त्रियांना पोशाख निवडीचे स्वातंत्र्य आहे. या सगळ्या वागणुकीमागे एक कारण असू शकते, ते म्हणजे स्त्रियांच्या खेळांना फेमिनाईन किंवा बायकी स्वरूप देण्याचे!

आज लिंग किंवा जेंडर या संकल्पनेबद्दल मोकळेपणा आला आहे. लिंगबदल शस्त्रक्रिया सर्वमान्य आहेत. थर्ड जेंडरसुध्दा धारेच्या मुख्य प्रवाहात येऊ पाहते आहे. लिंग संकल्पना समाजाने मान्य केलेल्या चौकटीतून कधीच बाहेर आली आहे, पण तरीही बायकांच्या शरीरात ‘पुरुषी’पणा जास्त असेल तरी चालत नाही. मग भारताच्या द्युती चंदला शरीरात टेस्टोटेरॉन नावाचे हॉर्मोन जास्त असल्याने बंदीचा सामना करावा लागतो. तिने झगडून ही लढाई जिंकली. पण बहुतेक महिला ॲथलीट औषधे घेऊन स्वतःतला ‘पुरुषीपणा’ कमी करण्याचा मार्ग स्वीकारतात.

एकूणातच क्रीडांगणावरच्या स्त्रियांचा संघर्ष सोपा नाही. अत्यंत नाजूक अशा एका विषयाला जर्मनीच्या जिम्नॅस्ट्स मुलींनी तोंड फोडले, हे महत्त्वाचे! त्यांच्या या धैर्याने इतर मुली-महिलांनाही पोशाख स्वातंत्र्यासाठी झगडण्याची स्फूर्ती मिळेल.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

bhalwankarb@gmail.com

 

खेळाची क्षमता की लैंगिक आकर्षण?

‘आधुनिक खेळजगतात ऑलिम्पिक सामने सगळ्यात जास्त बघितले जातात. या खेळांचे वार्तांकन करणारी माध्यमं उघडउघडपणे पुरुष आणि स्त्री खेळाडूंकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. पुरुष खेळाडूंच्या शक्ती, चापल्य आणि कौशल्याचे कौतुक होते, तर महिला खेळांडूंचे मोठ्या प्रमाणावर लैंगिकीकरण (sexualisation) होते. पोट, नितंब, मांड्या दाखवणारा महिला बीच व्हॉलिबॉलपटूंचा पोशाख असो किंवा जिम्नॅस्ट महिला वापरतात तो लियोटार्ड (पाय पूर्णपणे उघडे टाकणारा पोशाख), त्यांच्या खेळ क्षमतेपेक्षा त्यांच्या लैंगिक आकर्षणाला जास्त महत्त्व दिले जाते.’

- रेचल स्मूट, अभ्यासक