ललित- आनंदाची पेटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 06:00 IST2019-03-31T06:00:00+5:302019-03-31T06:00:10+5:30

९० ची पिढी म्हणजे आमच्या लहानपणी ‘व्हिडिओ रेकॉर्डिं ग’ हे फिचर फोनमध्ये नव्हतंच. ‘दोन व्यक्तींमधला संवाद’ इतकंच मर्यादित काम फोनकडे असायचं.

Fine - box of happiness... | ललित- आनंदाची पेटी 

ललित- आनंदाची पेटी 

आज सकाळपासूनच मन विचलित झालं होतं. उदासिनता मनात मिरवत होती. कारण तसं काहीच नव्हतं. स्वत:शीच चिडचिड होत होती. किंबहुना, पुण्याच्या वातावरणातील तप्ततेचा प्रभाव माझ्यावर झाला असावा. मन रमवायला डी.आय.वाय (ऊक) करण्याचं ठरवलं. त्यासाठी साहित्य गोळा करताना एका पेटीकडे लक्ष गेलं. यात काहीतरी मिळेन या विचारात मी ती पेटी उघडली. बघते तर, माझं संपूर्ण विश्व सामावलं होतं त्यात. लहानपणी मी वापरलेल्या आणि मला अत्यंत प्रिय होत्या अशा काही गोष्टी.. ते बघून एक ना अनेक आठवणी ताज्या झाल्या. प्रत्येक गोष्टीमागचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहिला. त्या प्रत्येक गोष्टीशी जोडलेल्या व्यक्तींचा सहवास नव्यानं जाणवला. 
९० ची पिढी म्हणजे आमच्या लहानपणी ‘व्हिडिओ रेकॉर्डिं ग’ हे फिचर फोनमध्ये नव्हतंच. ‘दोन व्यक्तींमधला संवाद’ इतकंच मर्यादित काम फोनकडे असायचं. कॅमेऱ्याची रिळ.. त्यात जेमतेम ३५ फोटो यायचे. खास दिवशी (वाढदिवस, बारसे, गॅदरिंग...) मात्र ठराविक क्षण अगदी हौसेने टिपले जायचे. 
आईनं माझं लहानपण त्या पेटीत जपलंय.. माझ्यासाठी तर तो खजिनाच! 
बारशाला आजीनं आणलेला फ्रॉक, पांढऱ्या रंगाचं ताट, खडूचे तुकडे, रंगीत पेन्सिल्स, बुद्धिबळ-व्यापार, निबंधाची पानं, कार्ड्स, फ्रेंडशिप बॅन्ड, स्टिकर्स, राखी... अशा अनेक गोष्टी... ज्यामुळे निसटलेले ते क्षण पुन्हा जिवंत झाले. आपलं आयुष्य लहानपणापासून परिपूर्ण आहे, आपण भाग्यशाली आहोत याची जाणीव मला प्रकर्षानं झाली. आता मनाच्या कोपऱ्यात कुठेही उदासीनता वावरत नव्हती.
एक दिवस मलाही हे घर सोडून जावं लागणार.. आज मागे वळून बघितलं तर बऱ्याच चांगल्या-वाईट आठवणी, अनुभव आहेत. चांगल्या गोष्टी मनात साठवून ठेवल्यात.. सोबत राहील ती ही आज मनात भरलेली ‘आनंदाची पेटी’. असा हा कधी कोणीही हिरावू न शकणारा खजिना...! 
बालपण हे खरच किती छान आणि निरागस असतं ना! लहानपणीच्या आठवणी म्हणजे आनंदाचा खजिनाच. काही क्षण कॅमेरात केंद करुन घेतलेले, काही मिळालेले साठवलेले, काही मोठ्यांकडून ऐकायला मिळालेले आणि काही गोष्टी शक्य तेवढ्या जपलेल्या...

Web Title: Fine - box of happiness...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे