गैरसमजात राहू नका... प्रगती खुंटत जाईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 11:57 IST2026-01-04T11:57:57+5:302026-01-04T11:57:57+5:30
यशाबद्दल आपण अनेक गोष्टी गृहित धरतो.

गैरसमजात राहू नका... प्रगती खुंटत जाईल!
यशाबद्दल आपण अनेक गोष्टी गृहित धरतो. ऐकलेल्या, समाजाने ठसवलेल्या, तर काही सोयीस्कर वाटणाऱ्या या समजुती आपली प्रगती थांबवतात. म्हणूनच प्रश्न यशाचा नाही, तर समजुतींचा आहे.
यश = पैसा
गैरसमज : पैसा म्हणजेच यश, हेच समीकरण अनेकांच्या मनात रुजलेले आहे. पगार वाढला, बँक बॅलन्स वाढला की आपण यशस्वी झालो, असं मानलं जातं. यशाचे मोजमाप फक्त आर्थिक आकड्यांत केले जाते. बाकी नातेसंबंध, आरोग्य, समाधान या गोष्टी दुय्यम ठरतात.
वास्तव : पैसा आवश्यक आहे, पण तो पुरेसा नाही. नाती, आरोग्य आणि समाधान याशिवाय पैसा अपुरा ठरतो.
यश = लवकर सुरुवात
गैरसमज : यशासाठी तरुणपणीच सुरुवात केली पाहिजे, असं वारंवार सांगितलं जातं. वय वाढलं की नवीन काही सुरू करणं अवघड होतं, असा समज तयार होतो.
वास्तव : अनेकांनी आपल्या आयुष्यात उशिरा सुरुवात केली होती. वयाबरोबर कौशल्य, संयम आणि चिकाटी येते, तीही यशासाठी तितकीच महत्त्वाची.
यश = पदवी असणे
गैरसमज : डिग्रीशिवाय मोठं काही करता येत नाही, अशी धारणा समाजात खोलवर आहे. शिक्षणसंस्थेची मोहर नसेल, तर क्षमताच मान्य केली जात नाही. पदवी म्हणजेच बुद्धिमत्ता व पात्रता, असा सरळ निष्कर्ष काढला जातो.
वास्तव : स्टिव्ह जॉब्स किंवा मार्ग झुकेरबर्ग यांच्याकडे पारंपरिक पदव्या नव्हत्या. कौशल्य, शिकण्याची तयारी आणि अंमलबजावणी अनेकदा औपचारिक शिक्षणापेक्षा पुढे जाते.
यश = जास्त तास काम
गैरसमज : जितके जास्त तास काम, तितकं जास्त यश, अशी समजूत पक्की आहे. थकवा, ताण, सतत व्यग्र दिसणं यालाच मेहनतीचं प्रमाणपत्र मानलं जातं.
वास्तव : बिझी असणं म्हणजे प्रॉडक्टिव्ह असणं नाही. योग्य काम, योग्य वेळी, योग्य पद्धतीने केल्यानेच परिणाम मिळतो.
आरोग्य, अर्थपूर्ण नाती आणि वैयक्तिक वाढ यांचा मेळ म्हणजे यश.