माझी मुलगी वडापावसाठी गेली, जीव गमावून बसली; मृत मुलीच्या पित्याला न्यायाची अजूनही अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 13:05 IST2025-08-01T13:05:04+5:302025-08-01T13:05:04+5:30

पवित्र रमजानचा महिना अंतिम चरणात होता. घरात आनंदाचे वातावरण होते.

my daughter went for vada pav lost her life the father of the deceased girl still hopes for justice in malegaon blast case verdict | माझी मुलगी वडापावसाठी गेली, जीव गमावून बसली; मृत मुलीच्या पित्याला न्यायाची अजूनही अपेक्षा

माझी मुलगी वडापावसाठी गेली, जीव गमावून बसली; मृत मुलीच्या पित्याला न्यायाची अजूनही अपेक्षा

प्रवीण साळुंके, लोकमत न्यूज नेटवर्क, मालेगाव: पवित्र रमजानचा महिना अंतिम चरणात होता. घरात आनंदाचे वातावरण होते. २९ सप्टेंबर २००८ चा दिवस. रात्री साडेनऊ वाजेची वेळ होती. माझी दहा वर्षांची मुलगी फरहीन हिने रोजा खोलल्यानंतर वडापाव खाण्यासाठी भिक्खू चौकातील हॉटेलात गेली; पण ती परत आलीच नाही... हे सांगताना मृत फरहीनचे वडील लियाकत शेख यांचे डोळे पाणावले आणि पोटचा गोळा हिरावून घेणाऱ्या बॉम्बस्फोटातील संशयित आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडल्याने संताप व्यक्त करीत या निकालाला आव्हान देणार असल्याचे सांगितले.

लियाकत शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, “भिक्खू चौकात स्फोट झाल्याचे कळल्यानंतर काळजाचा ठोका चुकला. आईने मुलगी वडापाव घ्यायला गेल्याचे सांगितले. ती परत येईल, असे वाटले. मात्र, बराच वेळ झाला तरी ती परतली नसल्याने चिंता वाढली. काहींनी यात एक मुलगी जखमी झाल्याची माहिती दिली. चौकशी केली तर काहींनी एका मुलीला फरहान हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचे सांगितले. 

आम्ही तत्काळ हॉस्पिटलकडे धाव घेतली. तिथे तिला वाडिया रुग्णालयात घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही वाडिया रुग्णालयात पोहोचलो. धावपळ सुरू होती. आम्हाला मुलीला पाहू दिले नाही. दोन दिवसांनी फरहीनचा मृतदेह ताब्यात मिळाला. स्फोटात आमच्या निष्पाप मुलीचा नाहक बळी गेला. मात्र, आम्हाला न्याय मिळालेला नाही. या निकालाबाबत आम्ही समाधानी नाही. आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दुकान बंद नसतं तर... मोहम्मद सईद

ज्या भिक्कू चौकात स्फोट झाला, त्याच्या अगदी समोर टपरीत व्यवसाय करणारे मोहम्मद सईद यांनी सांगितले की, त्या दिवशी उपवासानंतरची न्याहारी करण्यासाठी   घरी गेलो होतो. त्यामुळे आपले दुकान बंद होते. त्यामुळे या स्फोटातून वाचलो.  

सईद यांच्या मते, जर त्या दिवशी दुकान उघडे असते, तर कदाचित तेही या घटनेत अडकले असते.   स्फोटानंतर जखमी नागरिकांना हातगाड्यांवरून रुग्णालयात नेण्यासाठी परिसरातील अनेकांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांनीही त्या मदतीत सहभाग घेतला. स्फोटाच्या दिवशी दुकान बंद असल्याने आपला जीव वाचला; पण आजही त्या रात्रीच्या आठवणी मनात घर करून राहिल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.

 

Web Title: my daughter went for vada pav lost her life the father of the deceased girl still hopes for justice in malegaon blast case verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.