Coronavirus: One lakh patients worldwide get coronavirus-free; A call for all worlds to fight together | Coronavirus: जगभरातील एक लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त; सर्व जगाने एकत्रित लढा देण्याचे आवाहन

Coronavirus: जगभरातील एक लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त; सर्व जगाने एकत्रित लढा देण्याचे आवाहन

पुणे : जगभरातील तब्बल २०२ देशांमधे कोरोना विषाणूचा (कोविड-१९) फैलाव झाला असून, पाच लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनावर कोणताही प्रभावी उपचार नसला तरी सध्या उपलब्ध असलेल्या औषधांवरच १ लाख रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूटीओ) महासंचालक टेड्रॉस घेब्रेयेसूस यांनी बरे झालेल्या रुग्णांचा आकडा जाहीर केला आहे.

भारत, चीन, जपान, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, रशिया, इटली, जर्मनीसह २० देशांचा समावेश असलेल्या जी-२० देशांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. ‘जगभरात पाच लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून, २३ हजारांहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मात्र, आशेची बाब म्हणजे एक लाख रुग्ण बरेदेखील झाले आहेत. मानवतेच्या या शत्रूविरोधात सर्व देशांनी मिळून एकत्र लढा देण्याचे आवाहन घेब्रेयेसूस यांनी केले.

जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी पाहणी अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार, चीनमधे नवीन कोरोनाबाधितांचा आकडा ११७ पर्यंत खाली आला. मात्र, युरोपात इटली, स्पेन व जर्मनीमधे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण तब्बल सहा ते आठ हजार इतके प्रचंड आहे. फ्रान्स, ब्रिटन, स्वित्झर्लंड, नेदरलँड, आॅस्ट्रिया, बेल्जियम, तुर्कीमधे १ ते २ हजार नवीन रुग्णांची भर पडली. अमेरिकेतही तब्बल ४,७००हून अधिक नवे रुग्ण आढळले. चीन नंतर युरोपात आणि अमेरिकेत कोरोना हाहाकार माजवत असल्याचे दिसून येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेला १०८ दशलक्ष डॉलरची मदत

कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी मदतीचे आवाहन केल्यानंतर जगभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. अवघ्या दोन आठवड्यात ‘एकता निधी’मधे २ लाख ३ हजार व्यक्ती-संस्थांनी तब्बल १०८ दशलक्ष डॉलरची मदत दिली आहे.

सुरक्षा पोषाखाची कमतरता

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेला सुरक्षा पोषाख आणि उपकरणांची टंचाङ्मई जाणवू लागली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आत्तापर्यंत तब्बल २ दशलक्ष वस्तू ७४ देशांमधे पाठविल्या असून, ६० देशांमधे या वस्तू पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जर आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्य ठीक असेल, तर प्रभावी उपचार करणे शक्य आहे. पुढारलेल्या देशांप्रमाणेच मागास देशांमधे देखील त्याच दर्जाची सुरक्षा उपकरणे पाठविणे गरजेचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

चाचणी क्षमता वाढवावी लागेल

रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने चाचणीची क्षमता वाढविण्याची गरज असून, चाचणीचा कालावधी देखील कमी करावा लागणार आहे. त्याच जोडीला कोरोनाचे निदान लवकर होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, रुग्ण निश्चित झाल्यानंतर त्याला तत्काळ विलग करणे, त्याच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून वेगळे काढणे या गोष्टी अधिक वेगाने कराव्या लागतील.

कोरोनाची जगभरातील सद्य:स्थिती (२८ मार्च २०२०)

कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्ती ५,१२,७०१
मत्यूमुखी पडलेल्यांची संख्या २३,४९५
कोरोना बाधित देश २०२

२७ मार्च अखेरची सर्वाधिक कोरोना बाधित देशातील स्थिती

देश एकूण बाधित नवीन बाधित एकूण मृत्यू
चीन ८२,०७८ ११७ ३२९८
रिपब्लिक कोरिया ९,३३२ ९१ १३९
आॅस्ट्रेलिया २,९८५ १८६ १३
इटली ८०,५३९ ६,१५३ ८,१६५
स्पेन ५६,१८८ ८,५७८ ४,०८९
जर्मनी ४२,२८८ ५,७८० २५३
फ्रान्स २८,७८६ ३,८६६ १,६९५
ब्रिटन ११,६६२ २,१२९ ५,७८
थायलंड १,१३६ २०२ ५
भारत ७२४ ७५ १७
अमेरिका ६८,३३४ ४,७६४ ९९१
इराण २९,४०६ २,३८९ २,२३४

(स्त्रोत : जागतिक आरोग्य संघटना पाहणी अहवाल)

जागतिक आरोग्य संघटनेचे आवाहन

- बाधित व्यक्तीला शोधून दुसºया व्यक्तीला होणारी लागण टाळण्यावर भर द्या
- प्राण्यांकडून रोगाचा प्रसार होणार नाही याची दक्षा घ्यावी
- जनतेला सातत्याने धोक्यांची जाणीव करुन द्या, योग्य माहिती पोहचवा आणि अफवा टाळा
- सामाजिक आणि आर्थिक हानी कमी करण्यासाठी काम करा

गेल्या चोवीस तासांतील जगातील स्थिती (नवीन बाधित-मृत संख्या)

बाधित ५,०९,१६४ (४६,४८४)
मृत्यू २३,३३५ (२५०१)
युरोपातील बाधित २,८६,६९७ (३६,४१४)
युरोपातील मृत १६,१०५ (२,१५५)

----------------------
अमेरिकेत कोरोना बाधितांचा आकडा लाखांवर
अमेरिकेमधे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, देशातील बाधितांचा आकडा लाखावर गेला असल्याचे वृत्त युएसए टुडे या वृत्तपत्राने दिले आहे. कोरोना बाधितांची संख्या लाखावर गेलेला अमेरिका पहिला देश ठरणार आहे. ज्या चीनमधून कोरोनाची सुरुवात झाली तेथेही बाधितांचा आकडा ८२-८३ हजारादरम्यान स्थिरावला आहे. अमेरिकेमधे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्यानंतर बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते आठवडाभरापुर्वी देशातील बाधितांचा आकडा १० हजारांच्या आसपास होता. मात्र, चाचण्यांची संख्या वाढल्यानंतर त्यात वाढ झाली आहे. शुक्रवारी रात्री बाधितांचा आकडा ८३ हजारांच्या वर गेला. आता बाधितांची संख्या एक लाखावर गेली असल्याचे युएसए टुडेने म्हटले आहे. अमेरिकेमधे २९ फेब्रुवारी रोजी पहिल्या कोरोना बाधिताचा मृत्यू झाला होता. एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १ हजार ५४४ इतकी आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी टाटा ट्रस्ट देणार पाचशे कोटी

पुणे : देशासह जगभरातील विविध ठिकाणी पसरत असलेल्या कोरोना विषाणूशी लढण्यासाठी टाटा ट्रस्ट पाचशे कोटी रुपयांचा निधी देणार आहे. त्यातून आरोग्य सुविधा बळकट करण्यात येणार असून, कोरोना चाचणीची क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे टाटा उद्योग समुहाचे चेअरमन रतन टाटा यांनी सांगितले.

कोरोनाचा जगभर होत असलेला फैलाव ही अत्यंत आपत्तीजनक स्थिती आहे. त्या विरोधात तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे. टाटा समुहाच्या माध्यमातून देशाला आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधांची उभारणी केली जाईल. अत्यंत खडतर कालावधीमधून जग जात आहे. तातडीच्या अशा सुविधांच्या उभारणीसाठी सर्वांनी मदत केली पाहीजे. टाटा ट्रस्ट त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी देईल.

आरोग्य सेवा पुरविणाºया व्यक्तींसाठी सुरक्षा पोषाख आणि इतर आवश्यक उपकरणे दिली जातील. रुग्णांवर उपचारासाठी लागणारी कृत्रीम श्वासोच्छवासाची यंत्रणा आणि कोरोना चाचणी करण्यासाठी किट उपलब्ध करुन देण्यात येईल. या शिवाय आरोग्य कर्मचाºयांना प्रशिक्षण देणे आणि सामान्य नागरिकांमधे जागृती करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा ट्रस्ट, टाटा सन्स आणि टाटा उद्योग समुहातील विविध कंपन्या एकत्रित प्रयत्न करणार आहेत.

लस उपलब्ध होण्यासाठी लागेल एक ते दीड वर्ष

जगभरात कोरोना विषाणूवर लस शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार त्यासाठी किमान एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल. त्यामुळे सध्याच्या रुग्णांवर अधिक प्रभावी उपचार पद्धत वापरून त्यांचा जीव वाचविण्यास प्राधान्य दिले पाहिजे. नॉर्वे आणि स्पेनमधे वेगवेगळ्या चार औषधांची मात्रा कोरोनावर लागू होते की नाही, तसेच काही औषधसमूह कसा लढा देतात, याची चाचणी घेतली जाणार आहे.

Web Title: Coronavirus: One lakh patients worldwide get coronavirus-free; A call for all worlds to fight together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.