जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 06:48 IST2020-01-02T03:14:37+5:302020-01-02T06:48:15+5:30
चार ठिकाणी शिवसेना लढतेय स्वबळावर

जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी
मुंबई : राज्यात ७ जानेवारीला होत असलेल्या पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत राज्यातील सत्तारुढ महाविकास आघाडीत बिघाडीचेच सूर अधिक दिसत आहेत. धुळे सोडले तर कुठेही महाविकास आघाडी झालेली नाही.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आहे पण सेना वेगळी लढत आहे. सेनेने ४४ गणांमध्ये उमेदवार दिले आहेत. अकोल्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत पण सेना वेगळी लढत आहे. फक्त चार गणात काँग्रेस-सेनेने एकमेकांविरुद्ध उमेदवार दिले नाहीत. अकोल्यात एकेकाळी सेनेचे मोठे प्रस्थ होते पण आज ते राहिलेले नाही. अलिकडे बाळापूरमध्ये शिवसेनेचे नितीन देशमुख आमदार झाले, त्यामुळे पक्षाला थोडे बळ मिळाले आहे. त्या शिवाय गोपिकिशन बाजोरिया हे सेनेचे विधान परिषद सदस्य आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि भाजप हे लढतीतील प्रमुख पक्ष आहेत.
वाशिममध्ये सेना स्वबळावर लढत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचे जाहीर केले होते पण ५२ पैकी २८ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे केले. यवतमाळ-वाशिमच्या सेना खासदार भावना गवळी पक्षाचा किल्ला स्वतंत्रपणे लढवत आहेत. धुळे जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी महाविकास आघाडी आहे. या महाविकास आघाडीने भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. बाजूच्या नंदुरबारमध्ये महाविकास आघाडी होऊ शकलेली नाही. तेथे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहेत. माजी मंत्री व भाजपचे नेते आ. विजयकुमार गावित आणि काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत गेलेले चंद्रकांत रघुवंशी निवडणुकीत आणि नंतर काय करतात याकडे लक्ष लागले आहे.