ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया प्रवासात वडाळ्यात घ्यावा लागणार ब्रेक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 14:12 IST2025-09-06T14:12:53+5:302025-09-06T14:12:53+5:30

प्रस्तावित वडाळा ते गेटवे भुयारी मेट्रो ११ मार्गिकेला वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेची थेट जोडणी दिली जाणार नाही.

You will have to take a break in Wadala on your journey from Thane to Gateway of India. | ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया प्रवासात वडाळ्यात घ्यावा लागणार ब्रेक 

ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया प्रवासात वडाळ्यात घ्यावा लागणार ब्रेक 

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रस्तावित वडाळा ते गेटवे भुयारी मेट्रो ११ मार्गिकेला वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेची थेट जोडणी दिली जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांना ठाणे ते गेटवे असा एकाच मेट्रोतून सलग प्रवास करणे शक्य होणार नाही. या प्रवासाठी वडाळा येथे मेट्रो गाडी बदलावी लागणार आहे.  

मेट्रो ४ मार्गिकेची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या मेट्रोचा पहिला टप्पा या वर्षी डिसेंबरअखेर सुरू करण्याच्या हालचाली एमएमआरडीएने सुरू केल्या आहेत, तर २०२७ मध्ये या मेट्रोचा संपूर्ण मार्ग सुरू होणे अपेक्षित आहे. मेट्रो ११ मार्गिकेची उभारणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार आहे. येत्या काही महिन्यांत या मेट्रोसाठी निविदा प्रक्रिया राबविली जाईल. या दोन्ही मेट्रो मार्गिकांची उभारणी झाल्यावर दक्षिण मुंबई ते ठाणे असा मेट्रो प्रवास शक्य होणार आहे. मात्र या दोन्ही मेट्रोंची एकत्र जोडणी केली जाणार नाही. 

१३ भुयारी स्थानके
मेट्रो ११ मार्गिकेसाठी २३ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. जपानच्या जायका या वित्त संस्थेकडून या प्रकल्पासाठी निधी उभारण्यात येणार आहे. मेट्रो ११ मार्गिका वडाळा येथील आणिक डेपोपासून सुरू होणार असून तिचा शेवट गेटवे ऑफ इंडिया येथे होणार आहे. ही मेट्रो मार्गिका १७.५१ किमी लांबीची असून त्यावर एकूण १४ स्थानके असतील. यात १३ भुयारी स्थानके व एका जमिनीवरील स्थानकाचा समावेश आहे. 

१०४ एकर जमिनीची गरज
मेट्रो मार्गिकेच्या उभारणीसाठी एकूण १०४ एकर जमीन लागणार आहे. यातील ९२.५ एकर जमीन सरकारी आहे तर १२ एकर जमीन खासगी मालकीची आहे. 
यात आणिक बस डेपोच्या बेस्टच्या ३९ एकर जागेवर कारशेड उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण १०४ एकर जागेपैकी ५६ एकर जागा कायमस्वरूपी घेतली जाणार आहे. तर ४८ एकर जागा तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात येणार आहे.

‘जोडणीचा विचार नाही’ 
दक्षिण मुंबई येथून आलेल्या प्रवाशांना मेट्रो ३ मार्गिकेवरील वडाळा भागातील स्थानकात उतरून पुन्हा नजीकच्या मेट्रो ४ मार्गिकेच्या स्थानकावर दुसरी गाडी पकडण्यासाठी जावे लागणार आहे. त्यातून दोन्ही मेट्रोंवर थेट प्रवास शक्य होणार नाही. दोन्ही मेट्रोंची एकत्र जोडणीचा विचार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: You will have to take a break in Wadala on your journey from Thane to Gateway of India.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.