...त्याचे उत्तर तुम्हाला २०२६ मध्ये मिळेल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 06:43 IST2023-07-14T06:42:31+5:302023-07-14T06:43:12+5:30
राष्ट्रवादीशी युती ही कूटनीती; अधर्म नव्हे! देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या कार्यकर्ता शिबिरातून स्पष्टोक्ती

...त्याचे उत्तर तुम्हाला २०२६ मध्ये मिळेल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
नितीन पंडित
भिवंडी : एकनाथ शिंदे, शिवसेना यांच्याशी आमची भावनिक मैत्री आहे, राष्ट्रवादीशी आमची राजकीय मैत्री आहे. राष्ट्रवादीला सोबत घेतले हा अधर्म नक्कीच नाही. भगवान श्रीकृष्णासारखी कूटनीती ही राजकारणात वापरावीच लागते असे समर्थन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे आयोजित भाजपच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात केले.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी महाभारतातील श्रीकृष्णाच्या कूटनीतीचे अनेक दाखले देत आपण अधर्म करीत नसून बेईमानीला कूटनीतीने उत्तर देत आहोत. राष्ट्रवादीशी आपली आजची युती राजकीय असली तरी १५ वर्षांनी तीदेखील भावनिकच असेल असेही त्यांनी सांगितले. कधीकधी कटू वाटणारे निर्णय कूटनीती म्हणून घ्यावे लागतात, २०२४ च्या महाविजयाचे आमचे लक्ष्य आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
या शिबिराला केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ.भागवत कराड, कपिल पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय प्रभारी सी.टी.रवि, माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, हम छेडते नही, छेडा तो छोडते नही
उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. बेईमानी केली. सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांनी घाम गाळून शिवसेनेचे उमेदवार विजयी करण्याकरिता केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा विश्वासघात केला. आता ते शपथा घेत फिरत आहेत. खोटे बोलण्यापूर्वी त्यांनी पोहरादेवीची माफी मागितली असेल असा टोला त्यांनी हाणला. आम्ही दगाबाजांना धडा शिकवला. ‘हम छेडते नही, छेडा तो छोडते नही’, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
उत्तरे २०२६ मध्ये मिळतील
आपला पक्ष सध्या जी भूमिका घेत आहे त्यावरून संभ्रमित होऊ नका. २०१९ मध्ये जे झाले त्याची उत्तरे २०२३ मध्ये तुम्हाला मिळत आहेत. २०२३ मध्ये जे घडले ते का घडले याची उत्तरे २०२६ मध्ये मिळतील, असे फडणवीस यांनी म्हणताच हशा पिकला.
मित्रपक्ष ११०, भाजप १७८ जागा लढणार?
सन २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत भाजप १५२ जागा जिंकेल आणि आम्ही लढविलेल्या जागांपैकी ८५ टक्के जागा जिंकू, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गात केले. भाजप १७८ जागा लढणार आणि शिवसेना व राष्ट्रवादी यांना मिळून ११० जागा सोडणार असल्याचा स्पष्ट तर्क त्यातून निघाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र याचा निर्णय समन्वय समिती घेईल, असे शिंदे गटाचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
महिला मंत्री करणार
राज्य सरकारमध्ये भाजपची महिला मंत्री नाही ही खंत मला आहेच. अनेक सक्षम महिला आमदार असून त्यांच्यामधून मंत्रिपदाची संधी दिली जाईल असा शब्द फडणवीस यांनी दिला.