"लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, अजित पवार काय...", राजू शेट्टींचा संतापाच्या भरात तोल ढासळला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 18:15 IST2025-04-05T18:09:51+5:302025-04-05T18:15:44+5:30
Ajit Pawar News: राज्य सरकारवर टीका करताना शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे बोलताना संतापाच्या भरात संतुलन सुटले आणि त्यांनी एक विधान केले, ज्याची आता चर्चा होत आहे.

"लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, अजित पवार काय...", राजू शेट्टींचा संतापाच्या भरात तोल ढासळला!
Ajit Pawar Latest News: कर्जमाफीच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने कर्जाची परतफेड करण्यास सांगितले. याच निर्णयावर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अजित पवारांचा कोल्हापूर दौऱ्यातील प्रसंग सांगितला. एसी बंद पडल्यामुळे अजित पवारांना राग आला आणि जिल्हाधिकाऱ्यांवर चिडले, असे शेट्टी म्हणाले. 'एसी बंद पडला म्हणून गड्याला राग आला. काय मेला असता का अजित पवार', असे विधान राजू शेट्टींनी संतापाच्या भरात केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काही दिवसांपूर्वी अजित पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी नवीन गाड्यांच्या खरेदीवरून जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले होते. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना राजू शेट्टींनी याच गोष्टीवरून अजित पवारांवर टीका केली.
वाचा >>"जाहीरनाम्यामध्ये सांगितले, पण एकाही भाषणात नाही"; कर्जमाफीवरुन अजितदादांची स्पष्ट भूमिका
राजू शेट्टी म्हणाले, "भीती घालायला सुरूवात करा, त्याशिवाय तुमचा कर्जमाफीचा प्रश्न सुटणार नाही. तुम्ही भीती घालायला काही तयारच नाही. मग कसं व्हायचं. तुमच्या कर्जाचे नाव काढले की अजित पवार म्हणतात राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. परवाची गोष्ट सांगतो. अजित पवार हे कोल्हापुरात आले होते. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ३१ मार्चच्या आतमध्ये कर्ज भरा. जसे त्यांनी ७० हजार कोटी हाणलेत, तसे आपणही हाणलेत असं त्यांना वाटतंय", अशी टीका राजू शेट्टी अजित पवारांवर केली.
'अजित पवार काय मेले असते का?'
अजित पवारांच्या कोल्हापूर दौऱ्यातील घटनेबद्दल राजू शेट्टी म्हणाले, "२८ तारखेला कोल्हापूरला आले होते. विमानतळावरून सोळा मिनिटात जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. तेवढ्या काळात सरकारी गाडीचा एसी बंद पडला. गड्याला राग आला. कलेक्टरला म्हणाले, नवी गाडी घ्या. कलेक्टर म्हणाले, मंजुरी घ्यावी लागेल. ते म्हणाले प्रोटोकॉल बाजूला ठेवा आणि मी सांगतोय म्हणून घ्या. काय मेले असते का अजित पवार?', असे विधान राजू शेट्टींनी केलं.
'बापलेक एकाच दोरीला गळफास घेऊ लागलेत'
"सोळा मिनिटं एसी मिळाला नाही म्हणून उकाड्याने हैराण झालेला माणूस प्रोटोकॉल बाजूला ठेवून नवी गाडी घ्या म्हणून आदेश देतो. अरे दिवसाढवळ्या एकाच दोरीला गळफास घेऊन बाप आणि लेक मरायला लागलेत. लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. दया यायला पाहिजे शेतकऱ्यांची, पण त्यांना दया येत नाही. यापेक्षा तुम्हाला राग येत नाही. याचं मला वाईट वाटतं. सोळा मिनिटं एसी बंद पडलेला ह्या गड्याला सहन झाला नाही, मग आमचे शेतकरी आई-बहिणी ४२ डिग्रीमध्ये कशा काम करत असतील? तुम्हाला फक्त १६ मिनिटं एसी बंद पडल्याचा राग आला", अशी टीका राजू शेट्टी यांनी अजित पवारांवर केली.