गेल्या दोन महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडे आणि त्यांना अडचणीत आणणारे सत्तापक्षाचेच आमदार सुरेश धस यांच्यात समेट झाल्याची चर्चा सुरु झाली होती. या दोघांची हॉस्पिटलमध्ये भेट झाल्याच्या दाव्यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली असताना धस यांनी हो मी धनंजय मुंडेंना तीन दिवसांपूर्वी भेटलो, असे सांगत या भेटीमागचे कारण सांगितले आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांनाही खोटे पाडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मी स्वत: धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी गेलो होतो. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. लढ्यामध्ये मी त्यांच्या विरोधातच राहणार आहे, असे धस यांनी या भेटीवर स्पष्ट केले. याचबरोबर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. बावनकुळे यांच्यासोबत भेट झाली का, या प्रश्नावर बावनकुळे यांची माझी आता भेट होईल. बावनकुळे काय म्हणाले ते त्यांनाच बोला मला विचारू नका. मी परवाच गेलेलो. तब्येतीची चौकशी करणे यात गैर नाही. संतोष देशमुख हत्येचा लढा आणि चौकशी यात कोणताही संबंध नाही, असे धस यांनी सांगितले.
मुंडेंना रात्रीच्यावेळी दवाखान्यात नेले होते. भरणे मामांनी नेले होते. का नेले होते ते विचारण्यासाठी गेलो होतो. चार तास भेट झाली असे कोण बोलले, त्यांना बाहेर येऊन मी काय काय केले हे तुम्ही पहा, आणखी चार दिवसांनी काय बोलणार आहे ते पहा, असे धस म्हणाले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे न घेणे हे अजित पवारांच्या हातात आहे. माझा लढा हा हे लोक फाशीवर जाईपर्यंत सुरु राहणार आहे, असे देखील धस यांनी स्पष्ट केले.
बावनकुळे काय म्हणालेले...आम्ही चार तास एकत्र होतो. सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे दोघेही होते. त्यांच्यात मतभेद आहेत मनभेद नाहीत. ते दूर होतील. आयुष्यात एक काळ असतो तो मतभेद दूर करतो. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, दोघेही मला भेटले. या दोघांत पारिवारिक भेट झाली आहे. परिवार म्हणून आम्ही एकत्र बसलो होतो, असे बावनकुळे यांनी म्हटले होते. परंतू, बावनकुळे त्या भेटीला होते, चार तास बसलो होतो, हे धस यांनी फेटाळले आहे.