डायरीतील ‘मातोश्री’ माहिती नाहीत, पण चौकशीतून कोणीही सुटणार नाही; भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 04:43 PM2022-03-27T16:43:36+5:302022-03-27T16:44:06+5:30

मातोश्रीचा उल्लेख असलेल्या डायरीची ईडीकडून चौकशी व्हायला हवी या भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या मागणीचे प्रदेशाध्यक्षांनी समर्थन केले

Yashwant Jadhav IT Raid: BJP Chandrakant Patil Reaction on suspicious diary entries that gifts worth crores given to 'Matoshree | डायरीतील ‘मातोश्री’ माहिती नाहीत, पण चौकशीतून कोणीही सुटणार नाही; भाजपाचा टोला

डायरीतील ‘मातोश्री’ माहिती नाहीत, पण चौकशीतून कोणीही सुटणार नाही; भाजपाचा टोला

googlenewsNext

कोल्हापूर - मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर खात्याला कसली डायरी सापडली आणि त्यात कोणत्या मातोश्रींची नोंद आहे, हे मला माहिती नाही. पण चौकशीतून कोणीही सुटू शकत नाही आणि खूप काही होणार आहे. मला एवढेच दिसते आहे असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथे पत्रकारांना सांगितले.

एका प्रश्नाच्या उत्तरात चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काहीही आरोप केले तरी केंद्रीय तपासी यंत्रणा स्वायत्त आहेत ही वस्तुस्थिती आहे. या यंत्रणांच्या तपासाची आपल्याला काही माहिती नाही. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाला यशवंत जाधव यांच्याकडे कसली डायरी सापडली हे सुद्धा माहिती नाही. मात्र एवढी खात्री आहे की, या चौकशीतून कोणीही सुटू शकणार नाही. खूप काही होणार आहे, हे सुद्धा दिसते आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मातोश्रीचा उल्लेख असलेल्या डायरीची ईडीकडून चौकशी व्हायला हवी या भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या मागणीचे प्रदेशाध्यक्षांनी समर्थन केले. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या उद्घाटनाला केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रित करणे योग्य नाही. या महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. महानगरपालिकेने बांधलेल्या स्मारकाचे उद्घाटन करण्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित करायला हवे. त्यामुळे भाजपा आ. गोपीचंद पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी केवळ पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यास जो विरोध केला आहे तो योग्यच आहे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पक्षपातीपणे निर्बंध लावले आहेत. शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन व्हावे यासाठी त्यांच्या कार्यक्रमाच्या आधीपर्यंतच निर्बंध लावले आहेत. हा पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग आहे. कोल्हापूरमध्येही असे प्रकार चालू आहेत. आठ आठ वर्षांपूर्वीच्या केसेस काढून कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले जात आहे. आपला पोलिसांना इशारा आहे की, त्यांनी पक्षपात बंद करावा. हे फार दिवस चालणार नाही. आम्ही पोलीस ठाण्याला घेराव घालू असा इशारा भाजपाने दिला.

सामना वृत्तपत्र वाचणे बंद केले

सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आपण सामना वृत्तपत्र वाचणे आणि संजय राऊत यांच्याबद्दल बोलणे बंद केले आहे, असे ते म्हणाले. त्याचसोबत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ ठरले आहेत. त्यांच्या भितीने महाविकास आघाडीचे मंत्री आरोप करत आहेत. भारतीय जनता पार्टी पूर्णपणे किरीट सोमय्या यांच्या पाठीशी आहे असं त्यांनी म्हटलं.

Web Title: Yashwant Jadhav IT Raid: BJP Chandrakant Patil Reaction on suspicious diary entries that gifts worth crores given to 'Matoshree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.