कामगारांचा आज संप, वीज पुरवठ्यावर परिणाम; सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरण सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 06:47 IST2025-07-09T06:46:52+5:302025-07-09T06:47:19+5:30
गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बुधवारची रजा रद्द करण्यात आली आहे.

कामगारांचा आज संप, वीज पुरवठ्यावर परिणाम; सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरण सज्ज
मुंबई - वीज क्षेत्राचे खासगीकरण करू नये या मागणीसाठी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे राज्यभरातील हजारो कायम तसेच कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि.९) संप पुकारला आहे. त्याचा परिणाम वीज पुरवठ्यावर होण्याची शक्यता गृहीत धरून महावितरणने सर्व पर्यायी व्यवस्था, उपाययोजना केल्या आहेत.
घरगुती ग्राहकांसह पाणीपुरवठा योजना, रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची खबरदारी महावितरणने घेतली आहे. ज्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित होईल तेथे सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून (बॅकफिड) वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. रोहित्र, ऑइल, वीजतारा, केबल्स, वीजखांब, फिडर पिलर्स, डिस्ट्रिब्युशन बॉक्सेस, वाहतुकीसाठी वाहने आदी सामुग्री वीज कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये सज्ज ठेवण्यात आली आहे. गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बुधवारची रजा रद्द करण्यात आली आहे.
‘आवश्यक साधने उपलब्ध ठेवा’
क्षेत्रीय विभाग कार्यालयांच्या निवड सूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ आणि वाहनांसह संबंधित कार्यालयांमध्ये उपलब्ध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्यस्त्रोत कर्मचारी, महावितरणचे कंत्राटदार आणि कर्मचारी यांची स्थानिक कार्यालये, उपकेंद्रांत तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.
महावितरणचे आवाहन
नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत नकारात्मक आणि चुकीच्या संदेशावर, अफवांवर विश्वास ठेवू नये.
वीज पुरवठ्याबाबत तक्रारी किंवा शंका असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
आपत्कालीन व्यवस्था
महावितरणचे मुख्यालय आणि क्षेत्रीय परिमंडल कार्यालयांमध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू
दर तासाला राज्यातील वीज पुरवठ्याची स्थिती वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यालयाला कळविणार
वीज पुरवठ्यासाठी पर्यायी मनुष्यबळाची उपलब्धता