महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 07:47 IST2025-05-07T07:47:30+5:302025-05-07T07:47:48+5:30

शैक्षणिक, आरोग्य विषयक समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण करणे. कुपोषण, बालमृत्यू कमी करणे, लिंगभेद व बालविवाह रोखणे, हिंसाचारमुक्त कुटुंब निर्माण करणे हा या आदिशक्ती अभियानाचा उद्देश असेल.

Women now have the power of 'Adi Shakti'; Decision taken in cabinet meeting in Chondi | महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
चोंडी (जि. अहिल्यानगर) : राज्यात महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दीच्या औचित्याने अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या चोंडीत खास मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली.

शैक्षणिक, आरोग्य विषयक समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण करणे. कुपोषण, बालमृत्यू कमी करणे, लिंगभेद व बालविवाह रोखणे, हिंसाचारमुक्त कुटुंब निर्माण करणे हा या आदिशक्ती अभियानाचा उद्देश असेल. या क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार दिले  जातील. त्यासाठी साडेदहा कोटींचा निधी खर्च केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अहिल्यादेवींवर चित्रपट
पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांच्या जीवनावर अद्ययावत तंत्रज्ञान वापरून बहुभाषिक चित्रपट निर्माण करू. या चित्रपटातून त्यांच्या कार्याची प्रभावी मांडणी केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नामांकित शाळांमध्ये प्रवेश
धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांत प्रवेश देण्यासाठी राजे यशवंत होळकर यांचे नावे ‘यशवंत विद्यार्थी योजना’ राबविण्यात येणार आहे.  समाजातील दहा हजार विद्यार्थी नामांकित शाळांमध्ये शिकतील.   
समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभाग स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना सुरू करणार. मुला-मुलींसाठी दोनशे जागा असतील.  

अहिल्यादेवींच्या नावे वैद्यकीय महाविद्यालय
जिल्हा तेथे वैद्यकीय महाविद्यालय कॉलेज अशी घोषणा सरकारने केली होती. त्यानुसार अहिल्यानगरला शंभर विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी ४८५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 
बैठकीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री, सचिव चार हेलिकॉप्टरमधून चोंडी येथे दाखल झाले.  

३३ कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती...
बैठकीला ३३ कॅबिनेट मंत्री, ६ राज्य मंत्री, विविध विभागांचे ४० सचिव उपस्थित होते. अनेक अधिकारी व मंत्री अहिल्यानगर शहरात मुक्कामी होते.  

Web Title: Women now have the power of 'Adi Shakti'; Decision taken in cabinet meeting in Chondi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.