अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था ट्रेनमध्ये जळता मोबाइल फेकल्याने महिला जखमी!

By नारायण जाधव | Published: February 7, 2024 03:44 PM2024-02-07T15:44:31+5:302024-02-07T15:45:37+5:30

चिंचवड ते देहू रोडदरम्यानची घटना : पनवेल रेल्वे पोलिसांकडून गुन्हा पुणे पोलिसांकडे वर्ग

Woman injured after throwing burning mobile in Astha train going to Ayodhya! | अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था ट्रेनमध्ये जळता मोबाइल फेकल्याने महिला जखमी!

अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था ट्रेनमध्ये जळता मोबाइल फेकल्याने महिला जखमी!

नवी मुंबई : श्रीरामलल्लांच्या दर्शनासाठी पुणे येथून अयोध्येकडे निघालेल्या आस्था स्पेशल ट्रेनमध्ये ६ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुणीतरी अज्ञात इसमाने जळता मोबाइल ट्रेनच्या खिडकीतून आत फेकल्याने एक महिला प्रवासी जखमी झाली. या घटनेने रेल्वे प्रवाशांत खळबळ माजली आहे. ही घटना चिंचवड ते देहू रोड रेल्वे स्टेशनदरम्यान घडली असून आस्था स्पेशल पनवेल रेल्वेस्थानकात आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी मदतकार्य करून त्या जळत्या मोबाइलसह इतर सामान जप्त केले आहे. याबाबत पोलिसांकडून गुप्तता पाळण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे येथून श्रीरामललांच्या दर्शनासाठी अयोध्येसाठी आस्था स्पेशल ट्रेन सोडण्यात आली होती. ही ट्रेन चिंचवड स्थानकातून ७:२५ वाजता मार्गस्थ होत असताना ७:५२ ते ७:५९ वाजण्याच्या दरम्यान चिंचवड ते देहू रोड रेल्वेस्थानकादरम्यान तिच्या खिडकीतून कुणीतरी जळती वस्तू फेकली. ही वस्तू मोबाइल असल्याचे निष्पन्न झाले. हा मोबाइल पुण्याच्या धनकवडी येथे राहणारी प्रवासी महिला छाया हरिभाऊ काशिद यांच्या पाठीवर लागून त्यांना दुखापत झाली. 

यामुळे ही गाडी रात्री १०:२२ वाजता पनवेल स्थानकात आली असता रेल्वे पोलिसांनी त्वरित मदतकार्य राबवून त्या जळत्या मोबाइलसह इतर संशयास्पद वस्तू ताब्यात घेऊन जप्त केल्या आहेत. यावेळी पनवेल रेल्वे पोलिस आणि पनवेल शहर पोलिसांनी ट्रेन पनवेल स्थानकात आली तेव्हा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या घटनेबाबत रेल्वे पोलिस दलातील हेड कॉन्स्टेबल संदीप नंदकुमार माने यांनी जखमी महिला प्रवाशासह इतरांचे जबाब घेऊन हा गुन्हा पुणे रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे.

Web Title: Woman injured after throwing burning mobile in Astha train going to Ayodhya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.