मनपाची निवडणूक डोळ्यांसमोर दिसल्याने मुंबईतील प्रश्न दिसतात, उदय सामंत यांचा टोला; दिशा सालियन प्रकरणावर म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 16:30 IST2025-03-24T16:29:28+5:302025-03-24T16:30:44+5:30
‘त्यां’च्या आधी पत्रकार परिषद घेऊ, संजय राऊतांना लगावला टोला

मनपाची निवडणूक डोळ्यांसमोर दिसल्याने मुंबईतील प्रश्न दिसतात, उदय सामंत यांचा टोला; दिशा सालियन प्रकरणावर म्हणाले..
रत्नागिरी : मुंबईतील काँक्रीटचे रस्ते, काही प्रश्न हे महानगरपालिकेची निवडणूक येऊ शकतात, म्हणून काही लाेकांच्या डाेळ्यांसमाेर आले आहेत, असा टाेला राज्याचे उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बाेलताना आदित्य ठाकरे यांना लगावला. मात्र, मुंबईकर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीलाच भरभरून मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबईतील प्रश्नांबाबत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता मंत्री सामंत यांनी भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, गेली अडीच वर्षे मुंबईत जे काम हाेऊ शकले नाही ते काम महायुतीच्या काळात झाले. काँक्रिटीकरणचे सुमारे ७५० किलाेमीटरचे रस्ते हे दाेन टप्प्यांत मुंबईमध्ये हाेत आहेत. पहिला टप्पा ६,३०० काेटींचा आहे. उगाचच काहीतरी टीका-टिप्पणी करायची, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करायची, त्यांच्या खात्यावर आक्षेप घ्यायचा, हा काही लाेकांचा उद्याेग आहे. त्यामुळे यातून काही निष्पन्न हाेणार नाही, असे ते म्हणाले.
त्यावर भाष्य करणे योग्य नाही
दिशा सालियन हिच्या वडिलांनी न्यायालयाकडे दाद मागितली आहे. ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यामुळे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यावर भाष्य करणे याेग्य नाही, कायद्याला धरून नाही. याेग्य ताे निर्णय न्यायालय घेईल आणि पाेलिसांना निर्देश देईल, असे ते म्हणाले.
‘त्यां’च्या आधी पत्रकार परिषद घेऊ
संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यावर त्यावर आम्ही उत्तर दिलंच पाहिजे, असं बंधन आमच्यावर ठेवू नका. राेज सकाळी उठून असंबंध बाेललं की, टीआरपी वाढताे, असं वाटायला लागलं आहे. अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्या अगाेदर ८:३० वाजता पत्रकार परिषद घेऊन असंबंध बाेलायचा मी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री सामंत मिश्कीलपणे म्हणाले.