विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:02 IST2025-12-12T15:01:59+5:302025-12-12T15:02:33+5:30
आपल्या समक्ष मी बैठक लावेन कारण आपल्या अनुभवाचा फायदा आम्हाला, कोकणाला आणि प्रामुख्याने मच्छिमारांनाही पाहिजे. या दृष्टीकोनातून काय निर्णय घेता येतील ते पाहू असं उत्तर त्यांनी विधानसभेत दिले.

विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
नागपूर - विधानसभेत आज मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेत भास्कर जाधवांना कोपरखळी मारली. मत्स्य विभागाशी निगडीत प्रश्नावर नितेश राणे यांनी निवेदन सादर केले. त्यावर भास्कर जाधव यांनी बोलताना नितेश राणेंसमोर काही सूचना मांडल्या. या सूचना ऐकल्यानंतर नितेश राणे यांनी उत्तर देताना मी नेहमी तुमचं ऐकतो असं सांगत आज तुमचा टोन वेगळा आहे असं म्हटलं. त्यावेळी सभागृहात हशा पिकला.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी आम्हाला महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या सूचना चांगल्या असतात. त्यांना वाटतं आम्ही त्यांचे ऐकत नाही असं नाही. त्यांचाही टोन आदित्यजी बाजूला असताना वेगळा असतो आणि नसतात तेव्हा वेगळा असतो. आता टोन चांगला आहे कारण आदित्य ठाकरे बाजूला बसलेत. काल थोडे चिडचिडत होते मात्र वैयक्तिक कुठे भेटले तर मिठीही मारतात हे आदित्यजींच्या माहितीसाठी...तरीही आपण जी सूचना केली ती अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या समक्ष मी बैठक लावेन कारण आपल्या अनुभवाचा फायदा आम्हाला, कोकणाला आणि प्रामुख्याने मच्छिमारांनाही पाहिजे. या दृष्टीकोनातून काय निर्णय घेता येतील ते पाहू असं उत्तर त्यांनी विधानसभेत दिले.
काय म्हणाले होते भास्कर जाधव?
माझ्याकडे २०१४ साली शेवटचे २-३ महिने कॅबिनेट मंत्रिपद आले होते. कोकणाकरिता काय करायचे तेव्हा माथाडी कामागारांच्या धर्तीवर आम्ही मत्स्य विकास बोर्ड स्थापन केले. १ जून ते १ जुलै आपण मासेमारी बंद करतो. त्यावेळी मच्छिमारांना काहीच उत्पन्नाचं साधन नाही. जेव्हा मासेमारी करून हे बाहेर येतात तेव्हा माशांचा दर पडलेला असतो. कमी मासे मिळाले की दर वाढतो हा दर मधल्या दलालांना मिळतो. मच्छिमारांना दर मिळत नाही. त्यामुळे मत्स्य विकास बोर्डाच्या माध्यमातून बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या माशांना आपण रॉयल्टी बसवली. ही रॉयल्टी सरकारच्या माध्यमातून मच्छिमारांना देण्याची कायद्याने तरतूद केली. फक्त वरवर घोषणा केल्या नाहीत असं भास्कर जाधव यांनी सभागृहात सांगितले.
सोबतच मच्छिमार बोर्डाची मुंबईत कुठेही जागा नाही. मच्छिमार जेव्हा समुद्रात गेला तर तो लवकर येत नाही. तो आजारी पडला तर त्याला औषध पाण्याची सोय नाही. ती बोट किनाऱ्यावर येते तेव्हा आजारी मच्छिमार तिथेच ठेवतात आणि बाकीचे निघून जातात. तेव्हा वाडीबंदरजवळ त्याकाळी भाजी मार्केटसाठी नवीन इमारत सुरू होती. त्यातील एक मजला तिथे मत्स्य बोर्डासाठी ठेवला होता. मात्र त्यानंतर मला मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. आपण कोकणातील मंत्री आहात. मत्स्य बोर्डाबाबत माहिती घ्या. हवं तर मला बोलवा. संबंधित इमारतीबाबत माहिती घ्या. मत्स्य बोर्डाचं पुर्नजीवन करणार का असा प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारला.