गोंधळात सभागृहाचा वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या; सभापती राम शिंदेंचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:14 IST2024-12-19T13:13:28+5:302024-12-19T13:14:09+5:30
२४ वर्षांनी संसदीय लोकशाहीतील उच्च स्थानावर आसनस्थ होताना अनेक भावना मनात दाटून येतात अशा भावना सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केल्या

गोंधळात सभागृहाचा वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या; सभापती राम शिंदेंचा सल्ला
नागपूर - गोंधळात सभागृहाचा बहुमूल्य वेळ वाया जाणार नाही याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे. सभागृह कामकाजाचा प्रत्येक क्षण लोकशाही हितासाठी उपयोगी ठरेल असं वर्तन आपण ठेवूया असं सांगत नवनिर्वाचित सभापती राम शिंदे यांनी सदस्यांना सांगितले. सभापतीपदी निवड झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी राम शिंदेंचं अभिनंदन केले त्यानंतर सभापतींनी त्यांच्या आभार भाषणात सर्वांना मौल्यवान सल्ला दिला.
सभापती राम शिंदे म्हणाले की, प्रश्नोत्तराच्या तासाचे विशेष महत्त्व आहे. अधिवेशनाचा काम झाल्यानंतर खूप मोठी यंत्रणा यामागे काम करत असते. समित्यांचे गठन आणि त्यांचे कामकाज गतीमान करण्याला प्राधान्य देण्यात येईल. कायदा निर्मितीच्या प्रक्रियेत सदस्यांचा सक्रीय सहभाग असावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी माझ्या सभापतीपदाचा ठराव मांडला. त्याला दोन्ही बाजूच्या सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. त्याबद्दल मी आभारी आहे. ९ सदस्यांनी आपले मत मांडले. वेळेअभावी इतर सदस्यांना बोलता आले नाही. सदस्यांनी ज्या इच्छा, अपेक्षा व्यक्त केल्या त्यासोबत मागील काही संदर्भ दिले. माझ्या राजकीय, सामाजिक कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न सदस्यांनी केला. अनेकांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यांचे आभारी आहे असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतीपदी माझी बिनविरोध निवड केली त्याबद्दल सर्व पक्षाच्या सदस्यांचा मी ऋणी आहे. महाराष्ट्राची भूमी शूरवीराच्या पराक्रमाने पावन झाली आहे. त्यांच्या स्मृतीस वंदन करतो. अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी गावचा सरपंच म्हणून २००० साली सुरुवात झाली. त्यानंतर २४ वर्षांनी संसदीय लोकशाहीतील उच्च स्थानावर आसनस्थ होताना अनेक भावना मनात दाटून येतात अशा भावना सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, सध्याचे वर्ष ऐतिहासिक घटनांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सभागृहाचे कामकाज सुरू असते तेव्हा जनतेच्या अपेक्षांना मूर्तस्वरुप देण्याचं काम प्रत्येक क्षण आपण उपयोगी आणायचं आहे. लोकशाहीच्या रथाचा मार्ग विकासाच्या दिशेने आहे हे चित्र जनतेला दाखवायचे आहे असं राम शिंदे यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं.