"इथं येऊन तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर..."; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:57 IST2025-12-11T11:04:27+5:302025-12-11T11:57:03+5:30
विदर्भात येऊन हुरडा खा, अतिथी देवो भव..तुम्ही आमच्यासाठी देवासमान आहात परंतु वर्तवणूक देवासारखी ठेवा, देणाऱ्याची ठेवा असा टोला मुनगंटीवार यांनी सरकारला लगावला.

"इथं येऊन तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर..."; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
नागपूर - हिवाळी अधिवेशनात भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भ, मराठवाडा वैधानिक विकास मंडळावरून सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. ज्या विदर्भातील नागपूरला आपण देशाचं हृदय मानतो, त्यांचा विचार होत नसेल. विदर्भावर अन्याय करू नका. उद्योग असेल, रस्ते असतील सगळे पुणे, मुंबई विभागात जात असेल तर आम्ही करायचे काय...त्यामुळे विदर्भ वैधानिक मंडळ हे आमचे सुरक्षा कवच आहे असं सांगत मुनगंटीवारांनी सरकारवरच अन्याय करत असल्याचा आरोप केला आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, विदर्भ वैधानिक विकास मंडळ हा आमचा हक्क आणि सुरक्षा कवच आहे. तुम्ही जर हे संरक्षक कवच काढून टाकले तर जो निधीचा उपयोग आहे तो विदर्भासाठी होणार नाही. नोकरीबाबत बोललं तर ते उत्तर येते वैधानिक विकास अस्तित्त्वात नसल्याने यावर भाष्य करू शकत नाही असं सांगितले जाते. निधीबाबतीत अर्थसंकल्पात दाखवताना समनिहाय वाटप दाखवले जाते पण तसा खर्च झाला का याची यादी मी मागितली तर त्यावर उत्तर येत नाही. त्यामुळे मी भूमिका मांडली. विदर्भात येऊन हुरडा खा, अतिथी देवो भव..तुम्ही आमच्यासाठी देवासमान आहात परंतु वर्तवणूक देवासारखी ठेवा, देणाऱ्याची ठेवा. तुम्ही इथं येऊन हुरडा खाऊन परत जाल तर हे विदर्भातील जनतेवर अन्याय करणारे आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच ज्या विदर्भातील नागपूरला देशाचं हृदय म्हणतो, तिथे बसून आपण सर्वकष विचार केला नाही तर या विभागातील आमचे आदिवासी बांधव, अनुसुचित जाती जमातीतील लोक असती. जे गरीब लोक असतील, आजही ह्युमन इंडेक्समध्ये १२५ तालुक्यांपैकी ६० विदर्भातील आहेत. त्यामुळे आमच्यावर अन्याय करू नका. ११ लाख कोटीचे काम मुंबईकडे, पुण्याकडे दिले जाते मग आम्ही काय करायचे? त्यामुळे वैधानिक विकास मंडळ आमचे सुरक्षा कवच आम्हाला हवे यासाठी मी आमदारांच्या सहीचे पत्र सरकारला देणार आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
दरम्यान, विरोधी आमदारांना निधी देण्याएवढे मोठं मन सरकारचं नाही. मात्र जे सत्तेत आहेत तेदेखील खुश नसल्याचे दिसत आहे. अनेकांवर अन्याय सुरू आहे. काही ठराविक आवडत्या लोकांना शेकडो निधी मिळतो आणि नावडत्या लोकांना एक अंकी, दोन अंकी निधी दिला जातो. शेतकऱ्यांना शेवटपर्यंत मदत पोहचत नाही. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत पोहचली नाही अशा तक्रारी आहेत. लोकांच्या तक्रारी आमच्याकडे येतात त्यावर विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उचलतो. सरकार कितीही म्हणत असेल शेतकऱ्यांना निधी दिला मात्र लोकांचे समाधान झाले नाही असं सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनीही सरकारवर निशाणा साधला.