राज्यात सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड या प्रमुख महानगरपालिकांसह काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. तसेच दोन्ही गटांमधील दुरावा कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, आज महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं विलिनिकरण होणार नाही. तसेच सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार नाहीत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवार म्हणाले की असं काही घडण्याचा प्रश्नच येत नाही. सुप्रिया सुळे ह्या सध्या इंडिया आघाडीमध्ये आहेत. तर आम्ही एनडीएमध्ये आहोत. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही एकत्र येणार नाहीत, असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि शरद पवार हे गट एकत्र आले. तसेच या दोन्ही महानगरपालिकांमध्ये पवार गटांच्या आघाडीने भाजपासमोर मोठं आव्हानही उभं केलेलं प्रचारादरम्यान, दिसून आलं. त्यामुळे येथील निकालांबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झालेली आहे.