प्रस्तावित वीज कायद्याला विरोध करणार : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 13:37 IST2023-02-11T13:36:22+5:302023-02-11T13:37:16+5:30
वीज कर्मचारी संघटना अधिवेशनात घोषणा

प्रस्तावित वीज कायद्याला विरोध करणार : शरद पवार
नाशिक : प्रस्तावित नवीन वीज सुधारणा विधेयक लोकसभेत केंद्र सरकार बहुमताच्या जोरावर मंजूर करण्याचा प्रयत्न करेल, त्यासाठी या विधेयकाच्या काही तरतुदींना माझ्यासह विरोधी पक्षांनी आक्षेप घेत राज्यसभेत विधेयक हाणून पाडण्याचा इशारा दिला. त्यामुळे सरकारने हे विधेयक अभ्यासासाठी संसदीय समितीकडे पाठविले आहे. या समितीत आपण नसलो तरी अन्य सहकारी सदस्यांकडून विधेयकाला विरोध केला जाईल व हे विधेयक मंजूर हाेणार नाही असा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रसिटी वर्कस फेडरेशनच्या २० व्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. येथील गोल्फ क्लब मैदानावर वीज वर्कस फेडरेशनच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव कॉ. मोहन शर्मा तर प्रमुख अतिथी म्हणून किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव कॉ. अतुलकुमार अंजान, कॉ. सदरुद्दीन राणा, माजी मंत्री छगन भुजबळ होते.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी, राज्य व देशाला प्रकाशमान करण्याचे काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यांचीे उपेक्षा केल्यास राजकीय व सामाजिकदृष्ट्या हिताचे होणार नाही. देशाच्या जडणघडणीत व प्रगतीत वीज कर्मचाऱ्यांचे योगदान विसरता येणार नाही, वीज निर्मितीचा खरा पाया राजर्षी छत्रपती शाहू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घातल्याची आठवण यावेळी शरद पवार यांनी आयोजकांना करून दिली.