"कठीण प्रसंगात शपथ घेताना माझ्या डोळ्यासमोर..."; किल्ले शिवनेरीवर सुनेत्रा पवारांचं भावूक भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:27 IST2026-02-19T11:24:14+5:302026-02-19T11:27:04+5:30

ज्या विचारांवर अजितदादांनी आयुष्यभर वाटचाल केली. तोच शिव-शाहू-फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही हा शब्द या पवित्रभूमीत शिवरायांच्या साक्षीने मी देते असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं.

Will never leave the legacy of thoughts given by Ajit Pawar, Sunetra Pawar speech on Shivneri Fort | "कठीण प्रसंगात शपथ घेताना माझ्या डोळ्यासमोर..."; किल्ले शिवनेरीवर सुनेत्रा पवारांचं भावूक भाषण

"कठीण प्रसंगात शपथ घेताना माझ्या डोळ्यासमोर..."; किल्ले शिवनेरीवर सुनेत्रा पवारांचं भावूक भाषण

पुणे - शिवनेरी किल्ला हे अजितदादांसाठी फक्त ऐतिहासिक स्थळ नव्हते तर त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रेरणास्थळ होते. आज ज्याठिकाणी उभी राहून मी भाषण करतेय त्याच ठिकाणी दादांनी अनेकवेळा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करताना पाहिले आहे. स्वराज्य संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र शिवभूमीवर मला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभले. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा, अभिमानाचा आणि तितकाच भावनिक आहे. यापूर्वीही अनेकवेळा शिवजन्मभूमीवर येण्याचे भाग्य मला लाभले होते. परंतु आजचा दिवस माझ्यासाठी वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात सुनेत्रा पवारांनी भावनिक भाषण केले.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच भाषणात सुनेत्रा पवार म्हणाल्या की, नुकतीच मी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ज्या कठीण प्रसंगात मी शपथ घेतली त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर जिजाऊ माँसाहेब उभ्या होत्या. माँसाहेबांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही तर स्वराज्याचा ध्यास दिला, संस्कार दिले आणि संकटाशी २ हात करण्याची प्रेरणा दिली. हाच आपला आधार आहे. या क्षणी माझ्या अंगावर काटा आला आहे. छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना दिलेली स्वराज्याची शपथ आठवली. आपण सर्व छत्रपतींचे मावळे आहोत हीच भावना माझ्या मनात आहे. याच भूमीत स्वराज्याचा तेजस्वी सूर्य जन्माला आला आणि अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्राला दिली. शिवजयंती हा केवळ उत्सव नाही तर स्वराज्य, स्वाभिमान अन् सुशासनाचा संकल्प दृढ करण्याचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचं बळ आम्हाला मिळू दे असं साकडे शिवाईदेवीच्या चरणी घालते असं त्यांनी सांगितले. 

हा शब्द शिवरायांच्या साक्षीने मी देते...

तसेच ज्या विचारांवर अजितदादांनी आयुष्यभर वाटचाल केली. तोच शिव-शाहू-फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही हा शब्द या पवित्रभूमीत शिवरायांच्या साक्षीने मी देते. गेल्या अनेक वर्षापासून शिवजयंती सोहळ्याला दादा श्रद्धेने उपस्थित राहत होते.  स्वराज्याचा संदेश जनतेपर्यंत त्यांनी पोहचवला. या कार्यक्रमाचे संयोजक आणि अजितदादा यांच्यातील स्नेहाचा धागा अत्यंत अतूट आणि जिव्हाळ्याचा होता. तोच स्नेह, ती परंपरा आणि तो विचार आपण सगळ्यांनी मिळून तितक्यात ताकदीने आणि निष्ठेने जपायचंय असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान, अजितदादांच्या पुढाकारातून शिवनेरी विकास आराखडा साकार झाला. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला. गेल्या वर्षीही युनेस्कोच्या जागतिक यादीत शिवनेरी किल्ल्याचा समावेश झाला आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. राज्यातील गडकोट किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी निधीची तरतूद केली आहे. जुन्नर तालुका पर्यटन विकास करण्यासाठीही अजितदादांचा ध्यास होता आणि त्यादृष्टीने ठोस पाऊले त्यांनी उचलल्याचे आपण पाहिले आहे. गेल्या अर्थसंकल्पातही दादांनी ऐतिहासिक संकल्प जाहीर केले होते. त्यात आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे साक्ष देणारे शिवस्मारक उभारण्याची घोषणा त्यांनी केली. पानीपत येथे मराठा शौर्य स्मारक यांचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण आपल्याला दिली आहे. त्याच विचारांवर महायुती सरकार राज्यातील प्रत्येक घटकाची काळजी घेऊन पुढे वाटचाल करत आहे त्याचा आपल्याला अभिमान आहे. यापुढेही सरकार राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध असेल असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. 

 

Web Title : शपथ लेते समय सुनेत्रा पवार का शिवनेरी किले पर भावुक भाषण।

Web Summary : उपमुख्यमंत्री पद की शपथ लेने के बाद सुनेत्रा पवार ने शिवनेरी में भावुक भाषण दिया, जो जिजाऊ और शिवाजी महाराज से प्रेरित था। उन्होंने शिव-शाहू-फुले-आंबेडकर के मूल्यों को बनाए रखने और अजित दादा के कार्यों को जारी रखने का संकल्प लिया, जिसमें शिवनेरी विकास योजना और किले का संरक्षण शामिल है।

Web Title : Sunetra Pawar's emotional speech at Shivneri fort during oath.

Web Summary : Sunetra Pawar, after taking oath as Deputy Chief Minister, delivered an emotional speech at Shivneri, inspired by Jijau and Shivaji Maharaj. She pledged to uphold the values of Shiv-Shahu-Phule-Ambedkar and continue Ajit Dada's work, including the Shivneri development plan and fort preservation.