मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 19:33 IST2025-10-14T19:32:43+5:302025-10-14T19:33:13+5:30
Harshvardhan Sapkal News: मनसेच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही आणि चर्चाही झालेली नाही. त्यामुळे मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत नाराजी आहे किंवा टोलवाटोलवी सुरू आहे, या फक्त माध्यमांतील चर्चा आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे.

मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं
नवी दिल्ली - मनसेच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही आणि चर्चाही झालेली नाही. त्यामुळे मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत नाराजी आहे किंवा टोलवाटोलवी सुरू आहे, या फक्त माध्यमांतील चर्चा आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही कारभाराविरोधात तसेच लोकशाही व संविधानाच्या संवर्धन व संरक्षणासाठी काँग्रेस पक्ष लढा देत आहे. या लढाईत देशभरातील अनेक पक्ष सहभागी होत इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आलेली आहे. इंडिया आघाडीत जर कोणत्या पक्षाला सहभागी व्हायचे असेल तर त्याचा निर्णय इंडिया आघाडीतील घटक पक्ष घेतील. राज्यातही भाजपाविरोधात महाविकास आघाडी स्थापन करण्यात आलेली आहे, असे सपकाळ म्हणाले.
निवडणुका निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात झाल्या पाहिजेत, पण मागील काही निवडणुकांमध्ये घोटाळे करण्यात आले. मतदार याद्यांमध्ये गडबड करण्यात आली. मतचोरीचा प्रकार राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केला आहे. हाच मुद्दा घेऊन राज्यात विविध पक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली. या शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षाताई गायकवाड उपस्थित होते. तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी आघाडीचा करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आघाडी वा युतीचा निर्णय राज्य स्तरावर घेतला जाणार नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.