Will the influence of Tawde, Gavit and Deodhar be seen in Delhi? | तावडे, गावित, देवधरांचा प्रभाव दिल्लीत दिसणार?

तावडे, गावित, देवधरांचा प्रभाव दिल्लीत दिसणार?

टेकचंद सोनवणे ।

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील नेत्यांना महत्त्वाची पदे देण्यात आली नसली तरी विनोद तावडे व नंदुरबारच्या खासदार हिना गावित मिळालेल्या जबाबदारीवरून समाधानी आहेत. तावडे व सुनील देवधर राष्ट्रीय सचिव तर गावित यांना राष्ट्रीय प्रवक्तेपद दिले आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय असताना तावडे यांना दिल्लीतील कामाचा अनुभव आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, विद्यापीठ अनुदान आयोगापासून इतर सर्व प्रमुख शैक्षणिक संस्थांशी त्यांचा दिल्लीत संपर्क आला. तावडे म्हणाले, ‘‘पक्षाने नवी जबाबदारी दिली आहे. ती जरूर पार पाडेन. पक्षाध्यक्षांकडे भेटीची वेळ मागितली आहे. लवकरच दिल्लीत येईन.’’ हिना गावित म्हणाल्या, ‘‘माझ्यासाठी ही जबाबदारी काहीशी अनपेक्षित होती. पक्षात राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच मला संधी देण्यात आली आहे.’’ नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदानंतर त्यांनी प्रदेश स्तरावरही काम केले.

पद नव्हे पक्षनिष्ठा महत्त्वाची -जाजू
श्याम जाजू हे २०१४ पासून भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. ते दिल्लीचे प्रभारीही होते. दिल्लीत विधानसभा वगळल्या तर लोकसभा आणि महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. जाजू हे मूळचे नाशिकचे. जाजू म्हणाले, ‘‘मी भाजपचा सैनिक आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडेन.

डिमोशन नाही प्रमोशन- रहाटकर
२०१४ पासून भाजपच्या महिला शाखेच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या डॉ. विजया रहाटकर यांना नवीन टीममध्ये सचिव करण्यात आले आहे. त्या म्हणाल्या, ‘‘पक्षाने दिलेली जबाबदारी मी निष्ठेने पार पाडणार आहे. माझे डिमोशन नाही, मला प्रमोशन मिळाले, असे मी समजते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Will the influence of Tawde, Gavit and Deodhar be seen in Delhi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.