भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघड करणार का? - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 04:45 PM2019-08-20T16:45:09+5:302019-08-20T16:45:19+5:30

भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर खुली चर्चा करायला आपण तयार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी तयार राहावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

Will Government open curuption cases against those who enter in BJP ? - Dhananjay Munde | भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघड करणार का? - धनंजय मुंडे

भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघड करणार का? - धनंजय मुंडे

Next

कारंजा लाड (वाशिम) : कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री राहिलेले विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, लक्ष्मण ढोबळे या नेतेमंडळीवर भ्रष्टाचाराचे आरोप सत्ताधाऱ्यांनी केले होते. या तिघांनी भाजपात प्रवेश घेताच आरोपांचे सत्र थांबविण्यात आले. संबंधितांनी खरोखरच भ्रष्टाचार केला असेल तर त्यांचे पितळ भाजपा आता उघडे पाडणार का, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. कारंजा येथील विद्याभारती महाविद्यालयासमोरच्या प्रांगणात मंगळवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. भाजपा सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर खुली चर्चा करायला आपण तयार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी तयार राहावे, असे आवाहनही मुंडे यांनी यावेळी केले.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवस्वराज्य यात्रेचे प्रमुख संयोजक तथा खासदार डॉ. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे, डॉ. श्याम जाधव नाईक, संतोष कोरपे, प्रकाश गजभिये, संजय खोडके, संग्राम गावंडे, महेबुब शेख, माधवराव अंभोरे, अंकुश देशमुख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना मुंडे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेत लाखो विहिरी, शेततळे उभारण्यात आल्याचे सांगितले; मात्र या विहिरी कुणालाच दिसत नसल्याने त्या कदाचित गुप्त विहिरी असाव्या, ज्या केवळ भाजपाच्याच कार्यकर्त्यांना दिसतात, असा टोल मुंडे यांनी यावेळी लगावला. जलयुक्त शिवार अभियान, वृक्षलागवड योजना सपशेल अपयशी ठरली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ठणकावून सांगतात, की ३८ कोटी वृक्ष लावण्यात आली; परंतु हे वृक्ष भाजपाच्या पुण्यवंत कार्यकर्त्यांनाच दिसत असतील, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. 
याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजीत पवार म्हणाले, विद्यमान सरकारच्या काळात एकट्या महाराष्ट्रात १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. त्याचे पाप भाजपा सरकारला निश्चितपणे लागणार असल्याचे अजीत पवार म्हणाले. भाजपा सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला आता सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच कंबर कसून कामाला लागावे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. समारोपीय भाषणातून त्यांनी राज्यातील युती सरकारच्या धोरणावर तिखट शब्दांत टिका केली.

Web Title: Will Government open curuption cases against those who enter in BJP ? - Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.