विकास आराखडा राबवण्यास सरकारला भाग पाडणार : राज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:58 IST2026-03-21T12:57:51+5:302026-03-21T12:58:06+5:30
शिवाजीपार्क मैदानात गुरुवारी झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज यांनी ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ हे संकेतस्थळ लॉन्च केले. यात २७ मुख्य विषय व त्याअंतर्गत २५९ उपविषय दिले आहेत.

विकास आराखडा राबवण्यास सरकारला भाग पाडणार : राज
मुंबई : महाराष्ट्राचा एक नवा विकास आराखडा आखताना त्यात फक्त तज्ज्ञांचे मत न घेता जनसहभाग असावा यासाठी ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ हे संकेतस्थळ विकसित केले आहे. लोकांच्या मनातील उत्तम कल्पना व तज्ज्ञांच्या मतांचा मेळ घालत पुन्हा एक बृहद विकास आराखडा आणणार असून तो राबवण्यासाठी सरकारला भाग पाडणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले.
शिवाजीपार्क मैदानात गुरुवारी झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज यांनी ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ हे संकेतस्थळ लॉन्च केले. यात २७ मुख्य विषय व त्याअंतर्गत २५९ उपविषय दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज यांनी शुक्रवारी जनतेला पत्र लिहिले आहे. सरकारची श्रवणशक्ती कमी झाल्याने जनतेचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ज्या विषयांत कल्पना द्यायच्या आहेत त्या निवडून मत व्यक्त करा. योग्य कल्पना असल्यास व्यक्तीच्या नावासह ती व्यवस्थेला कळवू. जनतेच्या अपेक्षांचे, मतांचे आम्ही वाहक होऊ, असे त्यांनी पत्रात म्हटले.
‘महाराष्ट्र नेक्स्ट’मधील मुख्य विषय ...
शालेय, उच्च व तंत्रशिक्षण सुधारणा, शहरांचा शाश्वत विकास, शेती, आरोग्य सेवा व सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, रोजगार व रोजगार निर्मिती, क्षेत्रनिहाय औद्योगिक धोरण, आदिवासी विकास, पर्यटन विकास, सिंचन, जलव्यवस्थापन व जलसुरक्षा, सर्वसमावेशक आणि सशक्त महिला व बाल विकास, पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा, क्रीडा व युवा विकास, कायदा व सुव्यवस्था आदींचा समावेश आहे.